मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
‘वह कौन थी ?’ चित्रपटात केवढे तरी टर्न आणि ट्विस्ट
पिक्चरची सुरुवातच केवढी तरी थरारक आणि रोमहर्षक. पडद्यावर नजर खिळवणारी. डाॅ. आनंद (मनोजकुमार) एका गावातील निर्मनुष्य रस्त्याने आपली गाडी चालवत संध्याकाळी उशीरा घरी निघालेत. आकाशात काळेकुट्ट ढग दाटलेत. तेवढ्यात काळोख पडून जोरदार पाऊस सुरु होतो. रस्त्यावर खड्डे पडलेत. तो खराब झालाय, कशी बशी गाडी चालवत असतानाच मुसळधार पावसात गाडीसमोर एक सफेद कपड्यातील युवती (साधना) दिसताच डाॅ. आनंद गाडी थांबवून तिची विचारपूस करतो. एवढ्या रात्री आणि भर पावसात ती काय करतेय, तिला कुठे जायचयं, तिला कुठे सोडू का ? असे आनंद तिला विचारतो आणि आपल्या गाडीत बसायला सांगतो. ती बसताच गाडीच्या काचेवरील व्हायपर बंद पडतात. मग समोरचा रस्त्याही नीट दिसत नाही. त्यावर ती म्हणते, मला सगळे दिसतेय. मी रस्ता सांगते. आनंद गाडी सुरु करतो आणि थोड्याच वेळात तिच्या हाताला लागलेले रक्त पाहून तो दचकतो. यावर ती सांगते, मी चित्र काढत होते. त्याचा हा रंग लागलाय. गाडी अनेक वळणे घेत घेत जाते आणि ती युवती एका ठिकाणी गाडी थांबवायला सांगते. ते स्मशान असते. ती युवती गाडीतून उतरताच काच स्वच्छ होते, वायपर सुरु होतात आणि त्या स्मशानाचे दरवाजे आपोआप उघडताच डाॅ. आनंद दचकतो. थोडासा घाबरतोही. ती युवती स्मशानात आत आत जाते आणि दिसेनाशी होते. (Hindi Movie)
डाॅ. आनंदच्या मनात प्रश्न येतो, “वह कौन थी?” ७ फेब्रुवारी १९६४ रोजी मुंबईत ‘वह कौन थी ?’ प्रदर्शित झाला त्यास साठ वर्ष पूर्ण झाल्यावरही या रहस्यरंजक सायकॉलॉजिकल थरारपटाची गाणी एकाद्या संध्याकाळी शांत वातावरणात अथवा गाडी चालवत असताना गाडीतील टेपरेकॉर्डरवर ऐकली तरी केवढा तरी आनंद मिळतो. पिक्चर भयपट आणि त्यात संगीत हळुवार एक वेगळेच रसायन यात जमून आले आहे. ‘वह कौन थी’ (इंग्रजीत ‘वो कौन थी?’) त्या काळातील अतिशय उत्तम व प्रभावी थरारपट. चित्रपटाचे लेखन ध्रुव चटर्जी यांचे तर दिग्दर्शन राज खोसला यांचे. चित्रपटाची निर्मिती एन. एन. सिप्पी यांची. छायाचित्रणकार के. एच. कपाडिया. चित्रपट कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट असल्याचा या भयपटाला भरपूर फायदाच झाला.
चित्रपटात केवढे तरी टर्न आणि ट्विस्ट. त्या युवतीचे नाव संध्या. ती डाॅ. आनंदला पुन्हा दिसते आणि मग भेटतेही. असे काहीही होत नाही, हा भ्रम आहे अशी डाॅ. आनंदची समजून काढली जाते. डाॅ.आनंदचा लांबचा भाऊ रमेश (प्रेम चोप्रा) याचा या सगळ्यात काही कुटील डाव असतो का? संध्यासारखीच दिसणारी तिची जुळी बहिण असते हा आणखीन एक धक्का. डाॅ. आनंदवर त्याची मैत्रीण सीमा (हेलन) ची विशेष मर्जी असते. अशा अनेक गोष्टींनी चित्रपटाचा उत्तरार्ध घडत जातो. तात्कालिक समिक्षकांना हा उत्तरार्ध फारसा रोचक वा रंजक वाटला नाही. चित्रपट रसिकांना त्यात काहीच वावगं वाटले नाही. त्यांना या चित्रपटातील रहस्य, मालमत्तेची हाव हे आवडले. चित्रपट सुपरहिट ठरला. तेच तर हवे असते. मुंबईत गिरगावातील सेन्ट्रल थिएटरमध्ये पंचवीस आठवड्यांचे रौप्यमहोत्सवी यश संपादले. चित्रपटात के. एन. सिंग, राज मेहरा, धुमाळ, प्रवीण चौधरी, मोहन चोटी, रत्नमाला, पाॅल शर्मा इत्यादींच्याही भूमिका.(Hindi Movie)
खरं तर ही कथा गुरुदत्तकडे होती. तोच यावर चित्रपट निर्मिती करणार होता. पण काही कारणास्तव ते घडले नाही. राज खोसलाना हे माहित होते. त्यांनी गुरुदत्तकडून ही गोष्ट घेतली आणि आपल्याला हवी तशा स्वरुपात ध्रुव चटर्जीकडून पटकथा रचून घेतली. चित्रपट मनोरंजक करण्यासाठी अशा अनेक क्लुप्त्या वापरल्या जातात. दिग्दर्शकाचे आपले एक व्हीजन असते. प्रेक्षकांपर्यंत चित्रपट नेताना काही हुकमी फंडे असतातच.
कोणते यश कोणाला कसे पावेल हे कधीच सांगता येत नाही. राज खोसला यांनी ‘नायिकाप्रधान रहस्यरंजक चित्रपटा’साठी साधनाची केलेली निवड महत्वाची. तोपर्यंत साधनाला विजय आनंद दिग्दर्शित ‘हम दोनो’, एस. एच. रवैल दिग्दर्शित ‘मेरे मेहबूब ‘ यांच्या यशाने साधना फाॅर्मात होतीच. वह कौन थीच्या यशाने साधनाला एस्टॅब्लिज केले. सिनेमाच्या जगात यश हेच चलनी नाणे असते. १९६४ सालीच साधनाचे ‘वह कौन थी?’ आणि ‘राजकुमार ‘ शम्मी कपूर नायक), ‘दुल्हा दुल्हन’ (राज कपूर नायक. साधनाला अजिबात शोभला नाही हो. हसं झाले) आले. राज खोसला यांनीच मग आपल्या दिग्दर्शनातील ‘मेरा साया’ (१९६६) आणि ‘अनिता'(१९६७) या रहस्यरंजक चित्रपटात पुन्हा साधनालाच नायिका केले. ‘मेरा साया ‘ हा राजा परांजपे दिग्दर्शित ‘पाठलाग’ (१९६४) या मराठी चित्रपटाची रिमेक…(Hindi Movie)
मनोजकुमारच्या निवडीबद्दल अनेकांचे प्रश्नचिन्ह होते. पण राज खोसला ठाम होते. दिग्दर्शकाला चित्रपट कागदावर आणि कलाकार निवडीत दिसतो तो हा असा. या चित्रपटापासून मनोजकुमार कॅमेरामनच्या मागे उभे राहून समोरचे दृश्य कसे दिसते, कसे चित्रीत होते हे जाणून घेऊ लागला आणि त्यातूनच त्याचा स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शक म्हणून वाटचाल करण्याचा विचार सुरु झाला. ‘पडद्यामागच्या गोष्टी’ अशाही असतात. प्रेम चोप्राच्या कारकीर्दाची ही सुरुवात होती. त्याने पंजाबी चित्रपटात भूमिका साकारली होती. हिंदीतही कामे मिळत असली तरी भारी मौका हवा होता. कलाकार असाच घडत असतो. हा चित्रपट त्याने स्वीकारताच काही बडे फिल्मवाले नाराज झाले म्हणे. ते म्हणे प्रेम चोप्राला हीरो म्हणून ब्रेक देणार होते. काहीतरीच काय ? पण अशा स्टोरीज जन्माला येतातच.
संगीतकार मदन मोहन यांच्यासाठी या चित्रपटाचे सिल्व्हर ज्युबिली हिट यश खूपच महत्वाचे. गाणी हिट ( अगदी आजही) पण पिक्चर फ्लाॅप असे मदन मोहनच्या नशिबी कायमच आले. त्यातून या चित्रपटाने मोठाच दिलासा दिली. राजा मेहंदी अली खान यांची गीते व मदन मोहनचे संगीत. लता मंगेशकर, आशा भोसले, महेंद्र कपूर हे गायक आणि राज खोसला यांचे गाण्यांचे अतिशय उत्तम असे रुपेरी पडद्यावरील सादरीकरण अर्थात टेकिंग असा सगळा सूर जमल्यावर काय हो? लग जा गले फिर से हंसी रात हो ना हो, जो हमने दास्ता हमने सुनाई आप क्यू रोये?, शोख नजर की बिजलिया, नैना बरसे रिमझिम रिमझिम, छोड कर तेरे प्यार का दामन…प्रत्येक गाणे पिक्चरचा भयप्रद मूड कायम ठेवतेय. यातही एक विशेष गोष्ट, लग जा गले…ची चाल राज खोसलांनी चक्क पाच वेळा नाकारली. एन.एन. सिप्पीही नकोच म्हणत होते. मदन मोहन यांना मात्र विश्वास होता, हे गाणे वर्षानुवर्ष लोकप्रिय असेल. तस्सेच घडले. पण मनोजकुमारला या गाण्याचे महत्व पटल्याने ते चित्रपट समाविष्ट झाले. ( कालांतराने तो चित्रपट संगीताचे उत्तम भान असलेला दिग्दर्शक म्हणून ओळखला गेला) . या कालखंडातील अनेक चित्रपटाच्या वेळेस पद्मनाभ हे राज खोसला यांचे सहाय्यक दिग्दर्शक होते. कालांतराने राज खोसला फिल्मच्या ‘दो चोर ‘( १९७३) पासून ते स्वतंत्र दिग्दर्शक झाले.(Hindi Movie)
=============
हे देखील वाचा : ‘सरफरोश’ सिनेमातील बाला ठाकूर गेला तरी कुठे ?
=============
फार पूर्वीचे रहस्यरंजक चित्रपटात छान ‘चकमा ‘ असत. प्रेक्षकांच्या मेंदूला खाद्य मिळे. विशेष उल्लेखनीय गोष्ट, त्या काळात फारशा तांत्रिक सुविधा नसूनही थरार छान निर्माण होई. अखेरपर्यंत सस्पेन्स कायम राही. कधी तो फारसा रोचक नसे, तरी त्याबाबत हरकत नसे. गीत संगीत अशा रहस्यरंजक चित्रपटांची मोठीच ताकद असे. आणि हे भयपट मुख्य प्रवाहात गणले जात. महल, बीस साल बाद, कोहरा अशी वाटचाल वो कौन थीच्या यशाने आणखीन रुळली. भूत बंगला, मेरा साया, गुमनाम साधारण याच काळातील चित्रपट.(Hindi Movie)
सत्तरच्या दशकात भूतपटांचे पेटंट जणू रामसे ब्रदर्सनी घेतले आणि ‘दो गज जमीन के नीचे ‘, ‘अंधेरा ‘, ‘दरवाजा ‘, ‘पुरानी हवेही ‘ असे अनेक हाॅररपट पडद्यावर आणले. ती अक्राळविक्राळ भूते होती. त्यात अजिबात तर्कसंगती नसे. त्याही पिक्चरचा मोठाच प्रेक्षकवर्ग निर्माण झाला हेही खरेच म्हणा. प्रत्येक प्रकारच्या चित्रपटांना आपल्या देशात प्रेक्षक नक्कीच आहे.आणि म्हणूनच तर सत्तरच्या दशकात मॅटीनी शोला, गल्ली चित्रपटात मग व्हिडिओवर ‘वह कौन थी?’ सारखे चित्रपट पुढील पिढीतील रसिकांसमोर येत राहिले. ते आवडले जाऊ लागले. राज खोसला यांचा दिग्दर्शनीय प्रवास सस्पेन्स चित्रपट ( वो कौन थी, मेरा साया), सामाजिक चित्रपट ( दो रास्ते), प्रेमपट ( प्रेम कहानी), डाकूपट ( मेरा गाव मेरा देश) इत्यादी इत्यादी चित्रपटांचा आहे. वो कौन थी? दिग्दर्शकाचा चित्रपट आहे. प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यात आहे. तेच तर महत्वाचे असते.