‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
जेव्हा किशोर कुमारचा ‘जुगाड’ अंगाशी आला !
हरफन मौला किशोर कुमार यांच्या बाबतचे अनेक किस्से आज देखील मोठ्या चवीने ऐकले जातात वाचले जातात. त्यांच्या कंजूषणाचे अनेक किस्से तर प्रचंड मशहूर आहेतच. किशोर कुमारला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा खूप राग यायचा. आम्ही काम करायचं. आम्ही पैसा कमवायचा. आणि हे इन्कम टॅक्स वाले पुन्हा आमच्याकडून टॅक्स घेणारे कोण? असं त्याला नेहमी वाटायचं. त्यामुळे टॅक्स चुकवण्याच्या अनेक क्लुप्त्या त्यांनी केल्या होत्या. यातून अनेकदा खूप मनोरंजक अशा गोष्टी घडून आल्या. जनरली टॅक्स वाचवण्यासाठी लोक अनेक वेगवेगळ्या प्रयत्न करतात पण किशोर कुमार जो प्रयत्न केला होता तो अफलातून होता. किशोर कुमार याचा पर्सनल सेक्रेटरी होता अनुप शर्मा नावाचा.(Kishor Kumar)
त्याने किशोर कुमारला सल्ला दिला,” आपण जर एखादा फ्लॉप सिनेमा निर्माण केला तर आपोआप आपटणारच. मग झालेला हा तोटा आपण आपल्या इन्कम मध्ये दाखवूत आणि आपल्याला टॅक्स कमी लागेल!” किशोर कुमार आयडिया खूप आवडली त्याने ठरवले की चला आपण आता एक फ्लॉप हिंदी सिनेमा काढू. लोक हिट सिनेमा काढण्याचे वेगवेगळे फार्मूले शोधत असतात. इथे किशोर कुमार एक फ्लॉप सिनेमा कसा काढावा याच्याबद्दल विचार करू लागला. पण नंतर त्याच्या मित्रांनी त्याला सांगितले,” तुझे हिंदी मध्ये चांगले नाव झाले आहे. विनाकारण फ्लॉप सिनेमा काढून तू तुझे नाव का खराब करतोस. त्यापेक्षा तू बंगाली भाषेत एक सिनेमा काढ. जिथे तुला कुणी फारसं ओळखत नाही आणि सिनेमा फ्लॉप झाला तर त्याची फारशी न्यूज होणार नाही. आणि त्या सिनेमाचा तोटा तू इन्कम मध्ये दाखवून तुझा टॅक्स वाचवू शकशील!” ही आयडिया त्याला आणखी आवडली. त्याने लगेच आपल्या पर्सनल सेक्रेटरी अनुप शर्मा सोबत एका कंपनीची स्थापना केली. (Kishor Kumar)
त्या फिल्म कंपनीचे नाव ठेवले के एस फिल्म. के म्हणजे किशोर कुमार आणि एस म्हणजे शर्मा. के एस फिल्म च्या वतीने त्यांनी ‘लुक्का छोरी’ नावाचा एक चित्रपट निर्माण करायचे ठरवले. या सिनेमात किशोर कुमारने डबल रोल केला होता. माला सिन्हा आणि अनिता गुहा ह्या त्याच्या चित्रपटातील दोन नायिका होत्या. सिनेमाला संगीत हेमंत कुमार यांनी दिले होते तर चित्रपटाचे दिग्दर्शन कमल मुजुमदार यांनी केले. फारसा विचार न करता किशोर कुमारने हा सिनेमा केला होता. हा सिनेमा फ्लॉप होणारच याची त्याला शंभर टक्के खात्री होती. फारसा एडिट न करता त्याने तसाच तो चित्रपट रिलीज करून टाकला. आणि काय आश्चर्य! सिनेमा सुपर डुपर हिट झाला!! १९५८ साली बंगाली भाषेत जेवढे सिनेमा तयार झाले होते त्यात सर्वाधिक यशस्वी सिनेमा लुक्का छोरी हा सिनेमा ठरला.(Kishor Kumar)
============
हे देखील वाचा : गुलजार यांचा अप्रतिम पण अनलकी चित्रपट : अचानक
============
किशोर कुमारने (Kishor Kumar) डोक्याला हात लावला. नुकसान व्हावे म्हणून काढलेला सिनेमा त्याला आणखी श्रीमंत करून गेला. आता त्याने ठरवले काही नाही की आता मी बॉलीवूड मध्ये फ्लॉप सिनेमा काढतो. तिथे तर माझा तोटा देखील मोठा असेल. त्यामुळे मला टॅक्स कमी लागेल असे म्हणून त्याने आपल्या दोन भावांसोबत एक चित्रपट निर्माण करायचे ठरवले. मधुबालाला नायिका म्हणून घेतले. सचिन देव बर्मन यांना संगीतकार म्हणून घेतले. चित्रपटाचे नाव ते ‘चलती का नाम गाडी’. या सिनेमाची कथा त्यांनी सिनेमा चालू असतानाच लिहीत गेले. याची कुठली स्क्रिप्ट तयार नव्हती. कुठलंही लॉजिक सिनेमात नव्हतं. सिनेमाचे दिग्दर्शन देखील ऐनवेळी सत्येन बोस यांना दिले. काहीही सिरीयसली न घेता त्यांनी हा सिनेमा बनवला आणि रिलीज केला. पुन्हा तोच प्रकार झाला!! ‘चलती का नाम गाडी’ सिनेमातली गाणी प्रचंड गाजली. आणि सिनेमा बंपर हिट झाला. किशोर कुमारने आता कपाळाला हात लावला. या सिनेमाचे सगळे राइट्स त्याने आपला सहाय्यक अनुप शर्मा याला देऊन टाकले आणि त्यातील एकही पैसा देणे स्वतःकडे घेतला नाही अशा प्रकारे त्याने टॅक्स वाचवण्याचा निष्फळ प्रयत्न केला.