‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘दो कलिया’ आणि दक्षिणेचा हिंदीवरच्या प्रभावाचा फ्लॅशबॅक…
“यश हेच चलनी नाणे” अशा मनोरंजन विश्वाच्या अलिखित नियमानुसार बरेच काही घडते…. बाहुबली ( पहिला व दुसरा), कांतारा, आरआरआर, ॲनिमल असे काही पडदाभर महामनोरंजन करणारे दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट हिंदीतही डब होऊन आले आणि फर्स्ट शोपासूनच रसिकांचा जबरदस्त उत्फूर्त प्रतिसाद मिळताच अड्ड्यावरील गप्पांपासून सोशल मिडियातील चर्चेपर्यंत सगळेच वातावरण बदलले, एव्हाना ते स्थिरही झालेय. पॅन इंडिया चित्रपट निर्मितीच्या आजच्या ग्लोबल युगात दक्षिणेकडील कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम या सर्व अथवा एक दोन आणि जोडीला हिंदी अशा भाषेत डब करीत चित्रपट प्रदर्शित होणार हे आता सांगावे लागत नाही. पूर्वी मात्र दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट हिंदीत डब करीत प्रदर्शित होण्याला मुख्य प्रवाहात फारसे स्थान नव्हतेच ( अपवाद मणि रत्नम दिग्दर्शित अंजली, रोजा असे काही चित्रपट). आणि असे अनेक डब चित्रपट पोस्टर्सपासूनच भडक वाटत..(do kaliyan)
दक्षिणेकडील चित्रपट निर्मिती संस्थांचा हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवास हा खूपच मोठा फ्लॅशबॅक आहे. अगदी पन्नास, साठ, सत्तरच्या दशकापासूनचा आहे. आणि तोही खणखणीत यशस्वी आहे. त्यात दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांची हिंदीत रिमेक आहे, कौटुंबिक सामाजिक गोष्टी आहेत. भाषेची अडचण असूनही तिकडचे अनेक दिग्दर्शक हिंदीत आले. कधी दक्षिणेकडील एकादी नायिकाही आली. पण जवळपास सगळेच शूटिंग चेन्नई ( तेव्हाचे मद्रास), हैदराबाद, बंगलोर, त्रिवेंद्रम येथील भव्य दिव्य दिमाखदार ऐसपैस स्टुडिओत आणि आऊटडोअर्सला झाले आहे. तेही व्यक्तशीरपणा, कामाची शिस्त व नियोजन, प्रदर्शनाची तारीख निश्चित करुन आणि जनसामान्यांपर्यंत विविध माध्यमांतून या चित्रपटातील गाणी पोहचवून हे चित्रपट प्रदर्शित होत. उगाच, दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट निर्मिती बळकट झाली नाही? फोकस्ड वाटचाल हीच त्यांची ताकद. चित्रपट एके चित्रपट हाच त्यांचा बाणा.
आणि असाच एक सुपर हिट चित्रपट ” दो कलिया “(do kaliyan) ( रिलीज १ मार्च १९६९).
.
दक्षिणेकडील एव्हीएम प्राॅडक्सन्स या प्रतिष्ठित चित्रपट निर्मिती संस्थेचा हा चित्रपट. एम. मुरुगन आणि एस. मुरुगन हे निर्माते आणि आर. कृष्णन व एस. पंजू हे दिग्दर्शक. मूळ तमिळ चित्रपटाचेच हे दिग्दर्शक. तर कथा जावर सीताराम यांची. दोन जुळ्या बहिणींची ही गोष्ट. गंगा व जमुना अशी त्यांची नावे. नीतू सिंग तेव्हा बालकलाकार होती. तेव्हाचे तिचे नाव बेबी सोनिया. ( वारीस इत्यादी चित्रपटातूनही तिने भूमिका साकारलीय) तिच्या अदाकारीची बेहद्द तारीफ झाली. नायिका माला सिन्हा. त्या काळातील एक आघाडीची अभिनेत्री. तर नायक विश्वजीत. हा कायमच नशीबवान मानला गेला. अनेक बड्या अभिनेत्री त्याला ‘रुपेरी पडद्यावरील प्रेयसी म्हणून लाभल्या ‘ आणि सुमधूर गीत संगीतही मिळाले. या रोमॅन्टीक जोडीसह या चित्रपटात मेहमूद, हिरालाल, उमेश शर्मा इत्यादी. साहिर यांच्या गीतांना रवि यांच्या संगीतातील बच्चे मन के सच्चे, तुम्हारी नजर क्यू खफा हो गई ही गाणी लोकप्रिय झाली. चित्रपट चांगलाच प्रतिसाद मिळवत असतानाच “बजाव पुंगी हटाव लूंगी” अशी जोरदार घोषणा देत मुंबईत दक्षिण भारतीयांच्या विरोधात शिवसेनेचा प्रचंड मोठा मोर्चा निघाला आणि जोरदार तीव्र आंदोलनही झाले. त्यात जाळपोळ वगैरेही झाली आणि त्याचाच एक भाग म्हणून “दो कलिया “(do kaliyan) या चित्रपटाचे मुंबई व ठाणे शहरातील प्रदर्शन काही दिवस थांबवण्यात आले. यासाठीही ” दो कलिया ” हा चित्रपट चर्चेत राहिला. नंतर मॅटीनी शोला गाण्यांच्या लोकप्रियतेवर उत्तम प्रतिसाद मिळत राहिला.
=========
हे देखील वाचा : तळागाळातील माणसांपर्यंत त्यांचा चित्रपट पोहचला…
=========
‘दो कलिया’ची(do kaliyan) निर्मिती करणाऱ्या एव्हीएमने हम पंछी एक डाल के ( १९५७) हिंदीत पाऊल टाकून बराच काळ हिंदी चित्रपट निर्मितीचे सातत्य ठेवले. भाभी, पूजा के फूल, मेहरबान, मै सुंदर हू हे त्यांचे विशेष आभार चित्रपट. त्या काळातील दक्षिणेकडील काही चित्रपट निर्मिती संस्था सांगायच्या तर, जेमिनी ( १९४८ च्या ‘कल्पना ‘पासून ते हिंदी चित्रपट निर्मितीत उतरले. त्यानंतर चंद्रलेखा वगैरे अनेक चित्रपट झालेच. पण त्यांच्या एस. एस. वासन दिग्दर्शित ‘ इन्सानियत ‘ चित्रपटात दिलीपकुमार व देव आनंद आणि ‘पैगाम ‘मध्ये दिलीपकुमार व राजकुमार एकत्र ही त्या काळातील अतिशय बहुचर्चित गोष्ट होती), प्रसाद प्राॅडक्सन्स ( १९५० च्या ‘मिस मेरी’पासून हिंदीत. त्यानंतर शारदा, छोटी बहेन, बेटी बेटे, ससुराल, हमराही, दादी मां, मिलन, राजा और रंक, जीने की राह, शादी के बाद, उधार की जिंदगी, एक दुजे के लिए इत्यादी), सुरेश प्राॅडक्सन्स ( प्रेम नगर, दिलदार, दिल और दिलदार, बंदीश, तोहफा, मकसद इत्यादी), बी. नागी रेड्डी ( राम और श्याम, कहानी घर घर की, ज्युली, स्वर्ग नरक, यही है जिंदगी इत्यादी), चिन्नाप्पा देवर फिल्म ( हाथी मेरे साथी, जानवर और इन्सान, गाय और गौरी, मेरा रक्षक इत्यादी).
साधारण ऐंशीच्या दशकाच्या अखेरीपर्यंत दक्षिणेकडील चित्रपट निर्मिती संस्थांची हिंदीतील वाटचाल जोरात होती. त्यानंतर त्याचे स्वरुप बदलत बदलत आजपर्यंत सुरु आहे.
‘दो कलिया ‘ (do kaliyan) `त्यातील महत्वाचा. त्याच्या प्रदर्शनास पंचावन्न वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हा फ्लॅशबॅक.