‘दास्तान’ पिक्चर फ्लाॅप नि गाडी हिट असा हा फंडा
पिक्चर पडद्यावर आला, पहिल्या शो ला हाऊसफुल्ल गर्दी झाली तरी तो पब्लिकने नाकारला, त्याच्यावर कायमचा फ्लाॅपचा शिक्का बसला, ज्यांनी रिकाम्या थेटरात कंटाळा करत करत चित्रपट पाहिला आणि तो पडद्यावर ठेवूनच बाहेर पडले, थेटरातील रिळे गोडाऊनमध्ये गेली, म्हणजे त्याची गोष्ट संपली असे होत नाही.’पडलेल्या चित्रपटां’ च्या गोष्टीही रंजक असतात. अनेक वर्ष चघळल्या, सांगितल्या जातात. आपल्याकडच्या चित्रपट संस्कृतीचे हेही वेगळेपण आहे. आपल्या देशात हिंदीसह मराठी, गुजराती, कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलगू इत्यादी अनेक प्रादेशिक भाषेतील चित्रपट समाजाच्या अगदी खालच्या माणसापर्यंत पोहचलाय आणि त्यात अशा झक्कास गोष्टी देखील रुजल्यात. बी.आर. चोप्रा निर्मित आणि दिग्दर्शित ‘दास्तान’ (Dastan) (रिलीज ३ मार्च १९७२) या चित्रपटाबाबत अगदी हेच झाले आहे.
या चित्रपटाच्या प्रदर्शनास यशस्वी बावन्न वर्षे पूर्ण झाली तरी तो विविध कारणास्तव ‘फोकस’मध्ये आहे. याच दिवशी प्रदर्शित झालेल्या मेहमूद व एन.सी. सिप्पी निर्मित व एस. रामनाथन दिग्दर्शित ‘बाॅम्बे टू गोवा’ ची एंटरटेनमेंटची गाडी मात्र आजही सुरु आहे. एकाच शुक्रवारी हे दोन चित्रपट प्रदर्शित होताना पहिल्या दिवसापुरते ‘दास्तान’चे (Dastan) पारडे जड होते. रसिकांनी ‘बाॅम्बे टू गोवा’च्या बाजूने कौल दिला. मी कायमच म्हणतो, कोणता चित्रपट डोक्यात नी डोक्यावर घ्यायचा याचा निर्णय प्रेक्षकांनाच घेऊ देत. (आजच्या कार्पोरेट युगाला उगाच वाटतं, मोठ मोठ्या जाहिराती, मुलाखती आणि उत्पन्नाचे फुगवलेले आकडे दिल्याने पिक्चर हिटचा समज होतो.) दिलीपकुमारची दुहेरी भूमिका असलेला ‘दास्तान’ तर रसिकांनी पूर्णपणे नाकारला.
चाणक्य दिग्दर्शित ‘राम और श्याम’ (१९६७) मधील दिलीपकुमारचा डबल रोल लोकप्रिय ठरल्यानंतरचा हा चित्रपट. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर नाॅव्हेल्टी होते आणि फस्ट डे फर्स्ट शोपासूनच रसिकांनी आपली निराशा व्यक्त केली. त्यांना चित्रपटात काहीच दम दिसेना. बी. आर. चोप्रा यांनी आपल्याच ‘अफसाना’ (१९५१) या सुपर हिट चित्रपटाची रिमेक म्हणून ‘दास्तान’ (Dastan) ची अतिशय जोरदार पूर्व प्रसिध्दीने निर्मिती केली. मूळ चित्रपटात अशोक कुमार डबल रोलमध्ये होते. घोषणेपासूनच ‘दास्तान’ चर्चेत राहिला. बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘नया दौर’ (१९५७) मध्ये दिलीप कुमारने भूमिका साकारली होती आणि चित्रपट यशस्वी ठरला होता. ‘दास्तान’ ची नायिका म्हणून शर्मिला टागोरची निवड झाली म्हणून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
शर्मिला टागोर खास करुन शशी कपूर (वक्त, आमने सामने वगैरे), धर्मेंद्र (यकिन, मेरे हमदम मेरे दोस्त, देवर इत्यादी), राजेश खन्ना (आराधना, अमर प्रेम वगैरे), यांची नायिका म्हणून ओळखली जाणारी. पण त्या काळातील अनेक अभिनेत्रींप्रमाणेच शर्मिला टागोरला दिलीपकुमारची नायिका बनण्याची महत्त्वाकांक्षा असणारच. ‘दास्तान’ (Dastan) मुळे ती पूर्ण झाली. (आत्माराम दिग्दर्शित ‘यह गुलिस्ता हमारा’ मुळे देव आनंदची नायिका बनण्याचे तिचे स्वप्न पूर्ण तर झाले, तोही पिक्चर फ्लाॅप. अरेरे ! शर्मिला टागोरची ही स्वप्ने रसिकांनी पूर्ण होऊ दिली नाहीत.) यांच्यासह बिंदू, आय. एस. जोहर, मदनपुरी, सचिन पिळगावकर (यांनी बालपणीच्या दिलीप कुमारची दुहेरी भूमिका साकारली), मनमोहन कृष्ण, गोपीकृष्ण, पद्मा खन्ना आणि प्रेम चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका.
छायाचित्रण धरम चोप्रा यांचे, तर संकलन प्राण मेहरा यांचे. साहिर यांच्या गीताना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत असा अगदी वेगळा योग. सगळे कसं छान जुळून आले. या चित्रपटाचे संगीत कल्याणजी आनंदजी यांना हवे होते, कारण तोपर्यंत त्यांनी बी.आर.चोप्रा यांच्या चित्रपटांना संगीत दिले नव्हते. तर लक्ष्मीकांत प्यारेलालही या चित्रपटासाठी प्रयत्नशील होते. कारण दिलीपकुमारच्या चित्रपटाला संगीत देण्याचा योग आला होता. चोप्रा साहेबांनी त्यांचीच निवड केली. गाणी आजही लोकप्रिय आहेत हे विशेष. पिक्चर फ्लाॅप नि गाडी हिट असा हा फंडा.
चित्रपट पूर्ण होताच याच्या गाण्याच्या तबकडी विक्रीला आल्या. त्यातील ना तू जमी के लिए (पाश्वगायक मोहम्मद रफी) हे दर्दभरे गाणे ‘ऐकता ऐकता’ लोकप्रिय झाले. दिलीप कुमार आणि मोहम्मद रफी हे अगदी हिट आणि फिट समीकरण. याशिवाय मारिया ओ स्वीट हार्ट ( महेंद्र कपूर आणि आशा भोसले), ओ हाय मै की करा, वो कोई आया ( आशा भोसले) इत्यादी गाण्यांचा चित्रपटात समावेश. बी. आर. चोप्रांच्या चित्रपटातील गाणी हा कायमच विशेष उल्लेखनीय गोष्ट. एकादा दिग्दर्शन आपल्याच सुपर हिट चित्रपटाची रिमेक करतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढलेला असतो. ‘अफसाना’चे लेखन आय. एस. जोहरचे आहे ( तोच तो अभिनेता जोहर) आणि त्यात अशोककुमार (दुहेरी भूमिका), वीणा, प्राण, कुलदीप कौर, जीवन इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. असद भोपाली यांच्या गीताना हुस्नलाल भगतराम यांचे संगीत आहे. या चित्रपटातील अभी तो मै जवान हू ( लता मंगेशकर), किस्मत बिगडी दुनिया बदली ( मुकेश) ही गाणी लोकप्रिय झाली. हा ‘अफसाना’ तमिळ चित्रपट ‘वेंडट्टा’ या चित्रपटावर बेतला होता. एकाद्या चित्रपटाची पाळेमुळे अशी रुजलेली असतात. या चित्रपटाची थीम काय ? (Dastan)
एक असतो सरळमार्गी, सत्प्रवृत्त न्यायाधीश अनिलकुमार दीवाण तर दुसरा असतो, रंगभूमीवर काम करणारा अभिनेता सुनील (दोन्ही भूमिकेत दिलीपकुमार). हा कलाकार श्रीमंत घरातला. पण अभिनयाचे त्याला विशेष आकर्षण आहे. एकदा एका हाॅटेलमध्ये या दोघांची भेट होते तेव्हा एक नाट्य घडते. अभिनेता ठरवतो की यापुढे आपण या न्यायाधिशासारखी दाढी लावून वावरायचे. त्यानुसार तो न्यायाधीश झोपला असताना त्याची दाढी सफाचट करतो आणि स्वतः खोटी दाढी लावतो. दुर्दैवाने या खोटी दाढी लावलेल्या अभिनेत्याचा अपघातात मृत्यू होतो आणि वृत्तपत्रात पहिल्या पानावर बातमी प्रसिद्ध होते, न्यायाधीशाचे अपघातात निधन.. आपल्याच निधनाचे वृत्त वाचून न्यायाधीश हादरतो. आता दाढी नसलेला न्यायाधिश आपल्या घरी येतो तेव्हा त्याला आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसतो. आपल्या निधनाचे वृत्त समजताच त्याची पत्नी माला ( बिंदू) ही आपला प्रियकर राजनसोबत ( प्रेम चोप्रा) अतिशय स्वच्छंदीपणे, मोकळेपणाने, दिलखुलासपणे मौजमजा करीत असते. वृत्तपत्रात आलेल्या न्यायाधीशाच्या निधनाचे वृत्त तिचा मोठा आधार असतो, ते सत्य आहे असा तिचा समज, पण घरातील इमानी कुत्रा मात्र आपल्या मालकाला अर्थात न्यायाधीशाला ओळखतो. क्लायमॅक्सला हा न्यायाधीश आपली बदफैली पत्नी आणि तिच्या प्रियकरावर सूड उगवतो. पुरेपूर नाट्य असलेली ही गोष्ट. पण कुठेतरी फसली. रसिकांना गुंतवून ठेवू शकली नाही.(Dastan)
‘अफसाना’ च्या काळात म्हणजे १९५१ साली रसिकांना या नाट्यात रोमहर्षकता जाणवली तशी ती १९७२ साली ‘दास्तान’ मध्ये अनुभवायला मिळाली नाही. दुसरं म्हणजे, या चित्रपटात नायिका मीना (शर्मिला टागोर) हिच्या व्यक्तिरेखेला फारसं स्थान मिळाले नाही. दिलीपकुमार व ती फार अलिप्त वाटतात. तात्पर्य, चित्रपटाने अपेक्षित आकार घेतला नाही त्यामुळे त्याचा परिणामही फसला आणि अर्थातच रसिकांनी चित्रपट नाकारला. सर्व हक्क रसिकांच्या स्वाधीन.
दिलीपकुमारने दुहेरी भूमिकेतील फरक उत्तम रितीने साकारणे आणि आपल्या उत्तम अभिनयाचा प्रत्यय देणे हे या ही चित्रपटात पाहायला मिळते. त्याची नायिका बनण्याची शर्मिला टागोरची हौस पूर्ण झाली. पण कमाल केली ती प्रेम चोप्रा आणि बिंदू यांनी. दोघांची केमिस्ट्री अगदी छान जमली. बिंदूने तर जनसामान्यांना राग यावा अशा पध्दतीने या भूमिकेत रंग भरला. अगदी खुनशी कटाक्ष असो अथवा जालीम मुद्राभिनय, बिंदूने कमाल केली आहे. बिंदूने अतिशय जालीमपणे साकारलेली व्यक्तीरेखेसाठी चोप्रासाहेबांनी अगोदर आशा पारेखच्या नावाचा विचार केला.
=============
हे देखील वाचा : ‘दो कलिया’ आणि दक्षिणेचा हिंदीवरच्या प्रभावाचा फ्लॅशबॅक…
=============
दिलीपकुमारची नायिका होण्याचे तिचे दीर्घकालीन स्वप्न अशा पध्दतीने पूर्ण होत होते. पण एकिकडे आपण देव आनंद, शम्मी कपूर, शशी कपूर, मनोजकुमार, धर्मेंद्र, जितेंद्र, राजेश खन्ना यांची नायिका साकारत असताना केवळ दिलीपकुमारसोबत काम करायला मिळतेय म्हणून बदफैली स्री साकारायची ? आशा पारेखला हे पटण्यासारखे नव्हतेच आणि बिंदूसाठी परफेक्ट भूमिका होती. तिच्या कारकिर्दीतील ही एक सर्वोत्तम भूमिका ठरली. भूमिकेवर लिहिलेले असते ते करणार्याचे नाव. फक्त योग यायला हवा. तो आलाच.
‘दास्तान’ (Dastan) ला गल्ला पेटीवर यश न लाभल्याची बरीच चर्चा झाली. नेमके काय चुकले याचाही बराच उहापोह झाला (पिक्चर पडला, प्रिन्ट गोडावूनमध्ये गेली असे सगळ्याच फ्लाॅप चित्रपटाबाबत घडत नाही). बिंदूच्या अप्रतिम अदाकारीची तर नेहमीच तारीफ होत राहिली आणि ना तू जमी के लिए गाणे तर आजही लोकप्रिय आहे. कधीही ऐकावे, पहावे. बावन्न वर्षांनंतरही ‘दास्तान’ ची विशेष दखल घ्यावीशी वाटते हे तर त्याचे खूपच मोठे यश आहे आणि चित्रपटाच्या जगात यशासारखे महत्वाचे असे दुसरे काहीही नाही हो. ते हाऊसफुल्ल गर्दीतच असेल अथवा नसेल पण त्याची अशी दखल घ्यावी लागते यातही असते अथवा असू शकते. विशेष उल्लेखनीय गोष्ट, असित सेन दिग्दर्शित ‘बैराग’ (१९७६) मध्ये दिलीपकुमारची तिहेरी भूमिका होती आणि तोही दणक्यात आपटला. त्याचाही आवाज आजही येतोय. फ्लाॅप पिक्चरच्या अशा यशाच्या गोष्टी सांगायलाच हव्यात.