‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
शैलेंद्र सिंग : टॅलेंटेड बट अनलकी सिंगर!
आपल्या पहिल्याच चित्रपटातील गाण्यांनी तमाम रसिकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या शैलेंद्र सिंग (Shailendra Singh) या पार्श्वगायकाच्या कारकीर्दीला मात्र अचानक ब्रेक लागले. खरंतर रफी- किशोर- मुकेश यांच्याशिवाय एक वेगळा स्वर म्हणून शैलेंद्र सिंग यांचा उल्लेख करावा लागेल. कारण या पैकी कुणाचीही कॉपी त्यांनी पार्श्वगायन करताना केली नव्हती. पण अतिशय गुणी गायक असलेला शैलेंद्र सिंगला (Shailendra Singh) अनपेक्षितपणे स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागली. कां? खरंतर शैलेंद्रसिंग यांना पार्श्वगायक व्हायचंच नव्हतं. ते दिसायला अतिशय हँडसम होते. सिनेमाशी त्यांच्या घरचा संबंध होता. शैलेंद्रसिंग यांचे वडील राजश्री प्रोडक्शन मध्ये पीआरओ होते.
१९७१ साली शैलेंद्रसिंग (Shailendra Singh) यांनी पुण्याच्या फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट मध्ये अभिनय शिकण्यासाठी प्रवेश घेतला. त्यांना अभिनयासोबत गाण्याची देखील आवड होती. पण त्यांना गाण्यात करिअर करायचे नव्हते! त्यांचे गाणे राज कपूर यांचे मित्र वसंत साठे यांनी ऐकलं होतं. जेव्हा राज कपूर ‘बॉबी’ या चित्रपटाची तयारी करत होते. त्यावेळेला त्यांना ऋषी कपूर साठी एका नव्या पार्श्वगायकाची गरज होती. त्याप्रमाणे त्यांनी त्याचा शोध देखील चालू केला होता. वसंत साठे यांनीच राज कपूरला शैलेंद्र सिंग(Shailendra Singh) यांचे नाव सुचवले. राजकपूर यांनी शैलंद सिंग ला पुण्याहून बोलावून घेतले. त्यांनी त्याचा आवाज ऐकला आणि त्यांना आवडला.
अशा पद्धतीने ‘बॉबी’ या चित्रपटातील सर्व गाणी शैलेंद्र सिंग यांना गायला मिळाली. पहिलाच ब्रेक तो देखील आर के फिल्म्स मध्ये! ऋषी कपूर साठी शैलेंद्र सिंग (Shailendra Singh) हे कॉम्बिनेशन तेंव्हाच सुरू झालं. यानंतर रफूचक्कर, खेल खेल में या चित्रपटात देखील शैलेंद्रने ऋषीसाठी पार्श्वगायन केले. ‘जहरीला इन्सान’ या सिनेमात दोन गाणी शैलेंद्र सिंग यांनी गायली होती परंतु त्यानंतर म्युझिशियनचा संप सुरू झाला. हा संप तीन महिने चालला. शैलेंद्र तेंव्हा शोज करत होता. संपानंतर त्या गाण्याच्या रेकॉर्डिंग साठी किशोर कुमार ला बोलावले आणि गाणे रेकॉर्ड झाले . गाणे होते ‘ओ हंसिनी मेरी हंसिनी….’ आज ‘जहरीला इन्सान’ हा चित्रपट कोणाला दाखवत नाही पण हे गाणं सर्वांना आठवते. या गाण्यानंतर ऋषी कपूर साठी आता किशोर कुमारचा स्वर वापरला जाऊ लागला आणि शैलेंद्र सिंग (Shailendra Singh) यांचा स्वर सहाजिकच मागे पडू लागला.
दरम्यानच्या काळात शैलेंद्र सिंग (Shailendra Singh) यांची राजेंद्र कुमार यांच्या सोबत भेट झाली तेव्हा राजेंद्र कुमार यांचे बंधू नरेश कुमार एक चित्रपट बनवत होते तो होता ‘दो जासूस’. या चित्रपटात खरंतर राज कपूर आणि राजेंद्र कुमार यांच्यावर पूर्ण फोकस होता परंतु नायक म्हणून शैलेंद्र सिंगची निवड केली. शैलेंद्र सिंगला एक्टिंग आवडत होतीच त्याचा ओढा अभिनयाकडे वाढू लागला.
========
हे देखील वाचा : देव आनंदच्या सिनेमाला सेंसर बोर्डाने सुचवले ७२ कट्स…
========
आता गायन आणि अभिनय या दोन्ही डगरीवर पाय ठेवून चालायचं कठीण होतं. तो ‘दो जासूस’ या चित्रपटानंतर शैलेंद्र सिंग (Shailendra Singh) यांनी ‘एग्रीमेंट’, ‘जहरिली’ या चित्रपटात देखील कामे केले पण हे चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी होऊ शकले नाही. खरं तर शैलेंद्रसिंग अतिशय हँडसम होते पण तरीही नायक म्हणून फारसे स्वीकारले गेले नाही. कदाचित नायक की पार्श्वगायक या दोन्ही क्षेत्रात त्यांनी करीअर करायचे ठरवल्याने कुठेच ते व्यवस्थित लक्ष देवू शकले नाही. त्यात पुन्हा संगीत क्षेत्रातील राजकारण देखील आले. त्यांची पार्श्वगायकाची कारकीर्द हळूहळू कमी होत गेली. एक गुणी गायक अशा पद्धतीने मागे पडत गेला.पार्श्वगायक तलत महमूद आणि मुकेश यांनी देखील रुपेरी पडद्यावर अभिनेता बनण्याचा प्रयत्न केला होता पण ते देखील अयशस्वी ठरले. १९९३ साली शैलेंद्र सिंगला मधुमेहामुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागले. परंतु इंडस्ट्रीमध्ये त्याच्या प्रकृतीबद्दल नाना प्रकारच्या अफवा पसरल्या आणि शैलेंद्रसिंग यांचे उरले सुरले करिअर देखील संपुष्टात आले.
शैलेंद्र सिंग (Shailendra Singh) यांची सांगीतिक कारकीर्द जरी छोटी असली तरी काही गाण्यासाठी मात्र त्यांना आठवावे लागेल. होगा तुमसे प्यारा कौन (जमाने को दिखाना है) मेरी दिलरुबा तुझको आना पडेगा (तराना) कई दिन से मुझे (अखियों के झरोको से) प्यार में कभी कभी ऐसा हो जाता है (चलते चलते), मै शायर तो नही (बॉबी) तुमको मेरे दिल ने पुकारा है (रफू चक्कर) तेरी रब ने बना दी जोडी (सुहाग) जाने दो ना (सागर)