मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
‘इंटरनॅशनल खिलाडी’ पंचवीशीचा !
‘पिक्चरच्या जगात’ यशाचे फंडेही अनेक. त्यातीलच एक ब्रॅण्ड नेम. अथवा फ्रेन्चाईजी. अक्षयकुमार आणि खिलाडी असेच सुपरहिट नाते. एकाच नाण्याच्या दोन बाजू. हे नाते किती घट्ट तर त्याचे एक दोन नव्हे तर चक्क आठ साहसी खिलाडी रुपेरी पडद्यावर आले. आणि त्यातीलच उमेश मेहरा दिग्दर्शित ‘इंटरनॅशनल खिलाडी’ (मुंबई रिलीज २६ मार्च १९९९) ची चक्क पंचवीस वर्ष पूर्ण झाली देखील. हा चित्रपट ‘खिलाडी 420’ चा सिक्वेल. (International Khiladi)
‘खिलाडी’ खेळाची सुरुवात अब्बास मुस्तान दिग्दर्शित ‘खिलाडी’ ने (१९९२)च्या यशाने झाली. हा चित्रपट रवि टंडन दिग्दर्शित ‘खेल खेल मे’ (१९७४) या रहस्यरंजक चित्रपटाची रिमेक होता. त्यात ऋषि कपूर, नीतू सिंग व राकेश रोशन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. याचे राहुल देव बर्मनचे संगीत आजही सुपरहिट..’खिलाडी ‘मध्ये अक्षयकुमार, आयेशा जुल्का आणि दीपक तिजोरी होते. अक्षयकुमारने राज एन. सिप्पी दिग्दर्शित ‘सौगंध’ (१९९०) पासून करियर सुरु केली. मला आठवतय, पुणे शहरातील या चित्रपटाच्या शूटिंग रिपोर्टींगसाठी मुंबईतील आम्हा सिनेपत्रकारांचा दौरा झाला असता आम्ही अक्षयकुमारपेक्षा राखी, मुकेश खन्ना यांच्यावर जास्त ‘फोकस ‘ ठेवला.
अक्षयकुमारचे नवखेपण असं काही जाणवत होते की, त्याच्या संवादफेकीत काही सुधारणा होईल असं वाटलं नव्हते. त्या काळात प्रत्यक्ष चित्रपटसृष्टीत भटकंती करणारे आम्ही सिनेपत्रकार नवीन चेहर्यांशीही संवाद साधत असू, काय सांगावे, उद्या हाच चेहरा ‘स्टार ‘ व्हायचा. सिनेमाचं जग म्हणजे सापसिडीचा खेळ. पिक्चर हिट तो सगळचं फिट्ट. अक्षयकुमारचा ‘मिस्टर बाॅण्ड ‘ही फ्लाॅप ठरला. पण ‘खिलाडी’ त्याला फळला. चित्रपटाची निर्मिती व्हीनस कॅसेट कंपनीची असल्याने गीत संगीत व नृत्याला साहजिकच महत्व. (International Khiladi)
जतिन ललितच्या संगीतातील वादा रहा सनम, क्या खबर थी जाना ही गाणी लोकप्रिय झाली आणि ‘खिलाडी ‘ही रौप्य महोत्सवी ठरला. अक्षयकुमार ॲक्शन दृश्यात छा गया. नव्वदच्या दशकात आपल्याकडे कार्पोरेट युग मुरत होते. एकाद्या वस्तूचे ब्रॅण्डींग, फ्रेन्चाईजी या गोष्टीना महत्व येत होते. त्याचा प्रभाव चित्रपटावरही पडला. अक्षयकुमार आणि खिलाडी हे समीकरण याच काळाचे देणे. मार्केटिंग फंडाने त्यात सातत्य ठेवले. अक्षयकुमारला एक इमेज दिली. ती त्याला चिकटली.
समीर माल्कन दिग्दर्शित ‘मै खिलाडी तू अनाडी’ ( शिल्पा शेट्टीसोबतचे माॅरीशसच्या प्रसन्न समुद्र किनाऱ्यावरील चुरा के दिल मेरा हे मोहक मादक गाणे नेत्रदीपक ठरले..), त्यानंतर उमेश मेहरा दिग्दर्शित ‘सबसे बडा खिलाडी’ (नायिका ममता कुलकर्णी), उमेश मेहरा दिग्दर्शित ‘खिलाडीयों का खिलाडी ‘ ( रेखासोबतची अक्षयकुमारची प्रणय दृश्य फार गाजली. तरी बरं अक्षयकुमारची तेव्हाची प्रेयसी रविना टंडन यात नायिका होती), डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘मिस्टर अॅण्ड मिसेस खिलाडी’ ( जुही चावला नायिका), उमेश मेहरा दिग्दर्शित ‘इंटरनॅशनल खिलाडी ‘ ( ट्विंकल खन्ना नायिका, तीच मग त्याची पत्नी झाली. सिनेमा असे बरेच काही देत असतो, ते असेही असते. (International Khiladi)
या चित्रपटात मुकेश खन्ना, गुलशन ग्रोव्हर, रजत बेदी, जाॅनी लिव्हर, गजेंद्र चौहान, अवतार गिल, विवेक वासवानी यांच्याही भूमिका. )., नीरज व्होरा दिग्दर्शित ‘खिलाडी 420’ ( नायिका महिमा चौधरी) आणि आशिष आर. मोहन दिग्दर्शित ‘खिलाडी 786’ ( नायिका असिन आणि जोडीला मिथुन चक्रवर्ती). अक्षयकुमारचे चक्क आठ खिलाडी. एकच कलाकार असा चित्रपटाच्या नावात एकच काॅमन शब्द घेऊन चक्क आठ चित्रपटात दिसतो ही कमालच. एवढ्यावरच हा खेळ थांबत नाही. एका उपग्रह वाहिनीवरही ‘फियर फॅक्टर खतरोंके खिलाडी ‘ अशा साहसी खेळीने हे वैशिष्ट्य घराघरात पोहचले.(International Khiladi)
=========
हे देखील वाचा : एकाच सिनेमाचे दोन रिमेक: एक सुपरहिट तर दुसरा सुपर फ्लॉप !
=========
प्रत्येक ‘खिलाडी ‘ अक्षयकुमारची लोकप्रिय वाढवणारा आणि त्याला ‘खान’दानी हिरोंच्या स्पर्धेत टिकवणारा ठरला. त्यातील एका ‘खिलाडी’ची यशस्वी पंचवीशी हेच विशेष. अक्षयकुमार नव्हे ‘खिलाडी’ कुमार असे त्याच्याबद्दल उगाच कौतुकाने म्हणत नाहीत? आपला फिटनेस, सेक्सी लूक, स्त्री प्रेक्षकांतील आकर्षण, मिडियातील स्पेस हे सगळेच टिकवण्यात हा ‘खिलाडी’ यशस्वी ठरलाय. चित्रपटाच्या जगात यश हेच सर्वात मोठे चलनी नाणे, तोच ‘सबसे बडा खिलाडी ‘ अक्षयकुमार.