दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
अमिताभ बच्चन आणि ‘शावा शावा’ डान्स!
करण जोहरचा २००१ साली एक महत्त्वकांक्षी चित्रपट आला होता ’केथ्रीजी’. अर्थात ‘कभी खुशी कभी गम’. हा एक मल्टीस्टारर सिनेमा होता. यात अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan), शाहरुख खान,रितिक रोशन, काजोल, राणी मुखर्जी, जया बच्चन, आलोकनाथ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट देशात आणि परदेशात प्रचंड यशस्वी झाला होता. या सिनेमातील अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित ‘शावा शावा’या गाण्याच्या निर्मितीचा किस्सा गीतकार समीर अंजान यांनी एका मुलाखतीत सांगितला होता. खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे.
या चित्रपटाला संगीत जतीन ललित यांचे असले तरी हे गाणे मात्र आदेश श्रीवास्तव यांनी स्वरबध्द केले होते. हे गाणे एका पार्टीमध्ये चित्रित करायचे होते. त्या पद्धतीने आदेश श्रीवास्तव यांनी त्याची ट्यून तयार केली आणि ती गीतकार समीर अंजान यांच्याकडे पाठवली. हे गाणे आपल्या एकट्यावर चित्रित व्हावे असे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी गीतकार समीर यांना आपल्या घरी बोलावले आणि त्यांना सांगितले की ,”तुम्ही अशा पद्धतीने गाणे लिहा की ते संपूर्ण माझ्यावर च चित्रित होईल!” त्यावर समीर म्हणाले,” पण करण जोहर यांनी मला वेगळे सांगितले आहे.” त्यावर अमिताभ बच्चन म्हणाले,” ते माझ्यावर सोडा. मी करण शी बोलून घेतो.” आता स्वत: मेगा स्टार अमिताभ असे सांगतो आहे म्हटल्यावर गीतकार समीर यांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना नजरेसमोर ठेवून गाणे लिहिले आणि म्युझिक सिटिंग करिता ते करण जोहर यांच्याकडे गेले. त्या मिटींगला अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) देखील उपस्थित होते. करण जोहर यांनी ते गाणे पाहिल्यानंतर ते म्हणाले,” अरे, मला असे गाणे नको आहे. या गाण्यांमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी, जॉनी लिव्हर सर्वच जण गातात आणि नाचतात . त्यामुळे सर्वांच्या भावना या गाण्यांमध्ये यायला पाहिजेत!”
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे म्हणणे असे होते की ते गाणे फक्त त्यांच्यावर चित्रित व्हावे. त्यावर करण जोहर यांनी सांगितले,” तुमची या चित्रपटातील भूमिका एका बिझनेस टायकून ची आहे. कल्पना करा एक मोठा बिझनेसमन पार्टीमध्ये एकटाच कसा काय करू शकतो?” ही मात्रा लागू पडली. आणि समीरला पुन्हा एकदा गाणे लिहायला सांगितले. आता समीर पुढे खूप अवघड परिस्थिती होती. कारण प्रत्येक कॅरेक्टर नुसार त्याच्या भावना या गाण्यांमध्ये येणे आवश्यक होते. समीरने ते आव्हान स्वीकारले आणि अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) , शाहरुख खान,जॉनी लिव्हर त्याचप्रमाणे राणी मुखर्जी, जया बच्चन आणि काजोल यांच्या भावना त्यांनी या गाण्यातून व्यक्त केल्या. हे गाणे सुदेश भोसले, अलका याज्ञिक, उदित नारायण, सुनिधी चौहान, आदेश श्रीवास्तव आणि स्वत: अमिताभ बच्चन यांनी गायले. तब्बल सात मिनिटांचे हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाले होते.
या चित्रपटात एकूण ११ गाणी होती. यातील शीर्षक गीत लता मंगेशकर यांनी गायले होते. तर ‘बोले चुडिया…’ हे गाणं कविता कृष्णमूर्ती ,सोनू निगम, कुमार सानू, अमित कुमार, अलका याज्ञिक यांनी गायले होते. ‘यु आर माय सोनिया’ हे गाणं अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांनी गायलं होतं आणि या गाण्याला संदेश शांडिल्य यांनी संगीत दिले होते. ‘सुरज हुआ मद्धमम चांद जलने लगा आसमा ये कैसा…’ हे गाणं अलका याग्निक आणि सोनू निगम यांनी गायलं होतं. चित्रपटात हे गाणं शाहरुख खान आणि काजोल यांच्यावर चित्रित झालं होतं. या गाण्याला स्वरबद्ध संदेश शांडिल्य यांनी केलं होतं. हे गीत अनिल पांडे यांनी लिहिलं होतं. या चित्रपटात त्यानी लिहिलेलं हे एकमेव गीत होते.
हे देखील वाचा : ‘या’ कारणामुळे काजोलने नाकारला चक्क मणीरत्नमचा चित्रपट!
बाकी सर्व गाणी समीर यांच्या लेखणीतून उतरली होती. या चित्रपटात रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आणि बंकिंमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रभक्ती गीत वापरले होते. त्यामुळे चित्रपट बऱ्यापैकी वादग्रस्त झाला होता. धर्मा प्रोडक्शन विरुद्ध अलाहाबाद
हायकोर्टामध्ये एक याचिका देखील दाखल केली होती. दिग्दर्शक करण जोहर यांचा हा दुसराच चित्रपट होता याचा पहिला चित्रपट ‘कुछ कुछ होता है’ सुपरहिट होता त्यानंतरचा हा कभी खुशी कभी गम
जगभर प्रचंड लोकप्रिय झाला.