दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
एक भूमिका नाकारली आणि फिल्मी करिअरच संपुष्टात आले!
अगदी मोजक्याच सिनेमात काम करून रुपेरी पडद्यावरून गायब झालेल्या अनेक अभिनेत्री आहेत त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे जाहिदा!(Zaheeda) आजच्या पिढीला हे नाव माहीत असणे शक्यच नाही. कारण ती मोजून चार सिनेमांमध्ये झळकली होती. त्यापैकी दोन चित्रपटात तिचा नायक देव आनंद होता. ‘प्रेम पुजारी’ आणि ‘गॅम्बलर’ हे त्याचे दोन सिनेमे आज देखील म्युझिकल हिट सिनेमे म्हणून लक्षात राहतात. जाहिदा ही अभिनेत्री त्यानंतर आपल्या संसारात रममाण झाली आणि आज मुंबईमध्ये सुखाने ती राहत आहे. या जाहिदा बाबतचे एक-दोन किस्से आहेत; जे खूप इंटरेस्टिंग आहेत.
मुळात जाहिदा (Zaheeda) ही एका फिल्मी परिवारातून रुपेरी पडद्यावर होती. तिची आत्या म्हणजे ख्यातनाम अभिनेत्री नर्गिस! तिचे काका म्हणजे साठ आणि सत्तरच्या दशकातील गाजलेले खलनायक अन्वर हुसेन! तिचे वडील अख्तर हुसेन हे चित्रपट निर्माते होते. नर्गिस, अन्वर हुसेन आणि अख्तर हुसेन या तिघांची आई जद्दनबाई भारतीय सिनेमातील एक मोठं नाव होतं. चाळीसच्या दशकात तिने अनेक चित्रपटांना संगीत दिले होते. अशा फिल्मी फॅमिलीतील जाहिदा चित्रपटात आली नाही तरच नवल. तिचा रुपेरी प्रवेश खरं तर गुरुदत्तच्या ‘कनीज’ या चित्रपटापासून होणार होता. परंतु गुरूच्या लहरी स्वभावामुळे या सिनेमाची काही रिळ शूट झाल्यानंतर तो डब्यात गेला. यानंतर ‘साजन की गलिया’ या चित्रपटात जाहिदाला साईन करण्यात आलं. परंतु फायनान्शिअल प्रॉब्लेममुळे हा चित्रपट देखील बनला नाही.
‘मदर इंडिया’ या चित्रपटानंतर नर्गिसने सिनेमात काम करणं थांबवलं होतं. पण तिच्या भावाची चित्रपट निर्मिती असलेल्या ‘रात और दिन’ (१९६७) या सिनेमात नर्गिसने दहा वर्षानंतर पुन्हा एकदा पुनरागमन केले होते. या सिनेमाच्या शूटिंग चालू असताना त्या सेटवर एकदा जाहिदा (Zaheeda) गेली होती. याच स्टुडिओच्या दुसऱ्या फ्लोअरवर देव आनंद यांच्या ‘तीन देवीया’ या चित्रपटाचे शूटिंग चालू होते. लंच ब्रेक मध्ये देव आनंद नर्गिसला भेटण्यासाठी सेटवर आले. तिथे त्यांची नजर जाहिदावर पडली. जाहिदाच्या मोहक सौंदर्याने देव आनंद अक्षरशः घायाळ झाले. त्यांनी लगेच तिला चित्रपटात काम करणार का? असे विचारले तिने होकार दिला. देव आनंदने आपल्या ‘प्रेम पुजारी’ या चित्रपटासाठी तिला लगेच सेकंड लीड म्हणून साइन केले. पहिलाच सिनेमा तो देखील नवकेतन बॅनरचा त्यामुळे जाहिदा सातवे आसमान पर होती! पण या सिनेमाची प्रगती खूपच मंद गतीने होत होती. एकतर देव आनंदचा दिग्दर्शनाचा हा पहिलाच प्रयोग होता. या सिनेमाची शूटिंग भारताच्या बाहेर होणार होते . त्यामुळे देखील चित्रपट बनायला वेळ लागत होता.
या काळात निर्माते एल वी लछमन यांनी जाहिदाला (Zaheeda) ‘अनोखी रात’ या चित्रपटासाठी विचारले. या सिनेमात तिचा नायक संजीव कुमार होता. संजीव कुमार त्यावेळेला बी ग्रेड सिनेमाचा कलाकार म्हणून ओळखला जायचा. जाहीदाने सुरुवातीला संजीव कुमार सोबत काम करायला नकार दिला पण नंतर तिला कळाले की या सिनेमाची कथा ऋषिकेश मुखर्जी यांनी लिहिली आहे आणि चित्रपटाचे दिग्दर्शन असित सेन करणार आहेत म्हणून तिने तो सिनेमा साइन केला. ‘प्रेम पुजारी’ खरं तर तिचा पहिला चित्रपट पण ‘अनोखी रात’ आधी तयार झाला आणि ‘प्रेम पुजारी’च्या दोन वर्षा आधीच रिलीज पण झाला. पण ‘अनोखी रात’ला फारसं यश मिळालं नाही. प्रेम पुजारी मात्र मोठा गाजावाजा करून रिलीज झाला. जाहिदाची यातील भूमिका सर्वांना आवडली.
जाहिदा (Zaheeda) आणि देव आनंद यांचे ट्युनिंग या काळात खूप चांगले जमले होत. देवआनंद देखील जाहिदाला पहिल्याच भेटीत आवडला होता. एकदा तिने देव आनंदला विचारले, ”तुझ्या वाढदिवसाला मी काय गिफ्ट देऊ?” तेव्हा त्याने, ”मला एक छानसा स्वेटर तुझ्या हाताने विणून दे!” असे सांगितले. जाहिदाने दिवस रात्र जागून हा स्वेटर विणला. या स्वेटरचा गळा तिला विणताना थोडा त्रास होत होता म्हणून तिने आपली आत्या नर्गिसची मदत घेतली. नर्गिसने या स्वेटरचा गळा विणला होता. जो व्ही शेप होता. देवआनंदला हे गिफ्ट खूपच आवडले. त्याने हे स्वेटर ‘ज्वेल थीफ’ चित्रपटात ‘ये दिल ना होता बेचारा’ या गाण्यात वापरले होते. (आता पुन्हा जेंव्हा हे गाणे तुम्ही पहाल तेंव्हा हा स्वेटर बघा!) देवआनंदच्या २६ सप्टेंबर या वाढदिवसाच्या नंतर काही दिवसातच नऊ ऑक्टोबरला जाहिदाचा वाढदिवस आला. तेव्हा देवने तिला गोल्डन ब्रेसलेट गिफ्ट केले.
========
हे देखील वाचा : ‘कोमा’त गेलेल्या नर्गिसला सुनील दत्त ने परत आणले!
========
‘प्रेम पुजारी’ नंतर अमरजीत या दिग्दर्शकाने देव आणि जाहिदाला (Zaheeda) ‘गॅम्बलर’ या सिनेमात घेतले. या चित्रपटातील ‘चूडी नही मेरा दिल है’ हे गाणे खूप गाजले. यानंतरचा देव आनंदचा महत्त्वकांक्षी सिनेमा होता ‘हरे रामा हरे कृष्णा’. या चित्रपटात देव आनंदने जाहिदाला त्याच्या बहिणीची भूमिका ऑफर केली. परंतु जाहिदाने ही भूमिका करायला नकार दिला. ”तुझ्या बहिणीची भूमिका मी करणार नाही नायिकेची भूमिका देणार असशील तर मी करते!” असे तिने देव आनंदला सांगितलं. देव आनंद मात्र पक्का व्यावसायिक त्याने बहिणीची भूमिका झीनतअमानला दिली आणि नायिका म्हणून मुमताजला घेतले. देव आनंदला नकार दिल्यामुळे जाहिदाचे फिल्मी करिअर मात्र संपुष्टात आले. पुढे दोन-तीन सिनेमा वगळले तर तिला फारसे सिनेमे मिळाले नाही. नंतर तिने उद्योगपती केसरी नंदन सहाय यांच्यासोबत लग्न केले आणि आपल्या संसारात मग्न झाली!