‘हजार वर्षात शाहरुख खान होणे नाही…..’
तारीफ पे तारीफ….कौतुकचं कौतुक हा तर चित्रपटसृष्टीचा अलिखित नियमच आहे. तेथील जिने का फंडा आहे. ट्रायलच्या वेळेस पिक्चर पाहण्यापेक्षा व्हाॅटसअपवर नजर असणारे पिक्चर संपल्यावर ‘काय छान चित्रपट बनवलाय ‘, ‘नक्कीच हिट होणार ‘ अशी ठरलेली वाक्य बोलतात आणि लिफ्टकडे सटकतात. तात्पर्य, मनोरंजन क्षेत्रात दुसर्याचं जमेल तसं, जमेल तिथे कौतुक करायला अनेकांना आवडतं. असं कर हे सांगावे लागत नाही..तरी एकादं कौतुक भारी वाटतं. ते कौतुक न वाटता त्यात काही वास्तव वाटते.(shah rukh khan)
राहुल देव शाहरुख खानबद्दल (shah rukh khan) बोललाय ते असंच आहे..हजार वर्षात शाहरुख खान होणे नाही, या त्याच्या विधानावर ‘पब्लिकची मते ‘ मागितली तर बाजूने जास्त तर विरोधात कमी मते पडतील. त्यावरुन कदाचित वाद निर्माण होऊन दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद, राजेश खन्ना, इतकेच नव्हे तर अमिताभ बच्चनचा विसर पडला की काय असा जोरदार मुद्दा उपस्थित करण्यात येईल. त्यांचे श्रेष्ठत्व मान्य करीतच शाहरुख खान ग्रेट आहे. प्रत्येकाची आपली एक ओळख आणि ताकद असतेच. शाहरुख अर्थात एसआरकेची जास्तच आहे. त्याचे आकर्षण टिकून आहे. त्याच्या अनेक चित्रपटांच्या पूर्वप्रसिध्दीच्या पत्रकार परिषदेत मी कायमच अनुभवलयं, तो एकटा दीड तासही उत्तरे देऊ शकतो. प्रश्न कोणता का ना असेना. शाहरुख फ्रंटफूटवर असतो. ‘रा.वन’ चित्रपटाची वडाळ्यातील डोम थिएटरमधील पत्रकार परिषदेत तो मला नेहमीपेक्षाही जास्त फोकस वाटला.
तो(shah rukh khan) फक्त अभिनेता नाही. कलाकार नाही. अगदी सुरुवातीला राज कंवर दिग्दर्शित ‘दीवाना’मध्ये पन्नासच्या दशकातील दिलीप कुमारची नक्कल केली इतकेच. पण अब्बास मुस्तान दिग्दर्शित ‘बाजीगर’ची नकारात्मक व्यक्तीरेखा साकारण्याचे धाडस त्याने दाखवले. यश चोप्रा दिग्दर्शित ‘डर’मध्येही असाच होता. पिक्चर रिलीज होताच त्याने चक्क नायकावर (सन्नी देवल) मात केली आणि स्टार झाला तो कायमचाच.
कार्पोरेट युगातील ‘बेस्ट प्राॅडक्ट ‘ म्हणून स्वत:भोवतीचे वलय कसे कायमच विणत राह्यचे, स्वत:ला सतत कसे फोकसमध्ये ठेवायचे याचा तो ‘बेस्ट सेल ‘ आहे. आय ॲम द बेस्ट हा त्याचा बाणा आहे..त्यालाही आयुष्यात/ कारकिर्दीत चढउतार, तणाव, अडथळे अनुभवावे लागले. त्यात तो कोलमडून गेला नाही. ते त्या त्या वेळेस ‘मागील रिळात ‘ ठेवून तो पुढे चालत राहिला. ड्रग्ज प्रकरणात त्याचा मुलगा आर्यन खानला झालेली अटक, त्या प्रकरणात मिडियातून त्याची काळवंडलेली प्रतिमा हे त्याच्या आयुष्यातील मोठे संकट. महिनाभर यावर उलटसुलट वादग्रस्त बातम्या येत होत्या.
या काळात त्याच्यातील पित्याची किती नि कशी घालमेल झाली असेल याचा विचारच न केलेला बरा. ‘तो शाहरुख खान(shah rukh khan) असल्याची मोठीच किंमत देत होता’. या काळात त्याने गप्प बसून ते नकारात्मक वातावरण निघून जाण्याला महत्व दिले. त्याने पूर्ण संयम बाळगला. आणि ते सर्व सावट दूर झाल्यावर आपल्या वाढदिवसानिमित्त मन्नतबाहेर जमलेल्या ‘फॅन्स’च्या अफाट गर्दीला त्याने दर्शन घडवले. अनेक वर्षांची ही जणू ‘बेस्ट स्टोरी’. प्रत्येक वर्षी इदलाही त्याच्या दर्शनासाठी मन्नतबाहेर त्याच्या चाहत्यांची अफाट गर्दी होतेच. लोकप्रियतेचा हा उच्चांक आहे. विशेष उल्लेखनीय गोष्ट, देशाच्या विविध भागातून त्याचे चाहते या आनंदासाठी येतात. आणि त्यातूनच ‘फॅन’ या चित्रपटाचे कथासूत्र सुचल्याचे आणि मग कल्पनाविस्तार केल्याचे चित्रपट पाहताना दिसते.
शाहरुख (shah rukh khan) नव्वदच्या दशकात दूरदर्शनकडून हिंदी चित्रपटात आला तेव्हाच आपल्या देशात जागतिकीकरण व खुली अर्थव्यवस्था यांचे आगमन झाले. कार्पोरेट युगात आपण प्रवेश केला. ग्लोबल युगातील डिजिटल पिढीची ती सुरुवात होती. शाहरुख खान त्याच वातावरणात फिट्ट बसला. विशेषत: यशराज फिल्म्सच्या आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ‘ ( २० ऑक्टोबर १९९५ रोजी प्रदर्शित. दिवाळीचा पाडवा होता.) पासून ‘शाहरुख खान पर्व’ सुरु झाले. हा चित्रपट आजही दक्षिण मध्य मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात मॅटीनी शोला चक्क सुरु आहे. हा विश्व विक्रम ठरावा.
जगभरातील अनेक देशात हिंदी चित्रपट प्रदर्शित होण्यास आता वेग आला ( यशराज फिल्मचे विदेशात वितरण कार्यालय आता सुरु झाले). पाठोपाठ मल्टीप्लेक्स युग आले आणि त्या कल्चरला शाहरुख खान (shah rukh khan) फिट्ट बसला. मल्टीप्लेक्स म्हणजे, महागडे तिकीट, पाॅपकाॅर्न, पार्किंग आणि पेप्सी. तात्पर्य आता चित्रपट ही नवश्रीमंत व उच्चभ्रू क्लासची करमणूक होत गेली. खरं तर आपल्या देशात सिंगल स्क्रीन थिएटर्समधील स्वप्नाळू, आशावादी, पडद्यावरील हीरोच्या एन्ट्रीला थेटरात टाळ्या आणि शिट्ट्या वाजवणाऱ्या पब्लिकने चित्रपट जगवला, रुजवला, वाढवला. पण काळासोबत बदल होत असतोच, त्या प्रवासाचा शाहरुख खान साथीदार, भागीदार व साक्षीदार आहे.
=======
हे देखील वाचा : गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार गौरव
=======
अतिशय मोजक्याच चित्रपटात काम करत करत त्याने आपला ओव्हर एक्स्पोज टाळलाय. त्याच वेळेस तो अनेक जाहिरातीतून घराघरात पोहचत असतो. दिसत असतो. आयपीएल क्रिकेट संघाचा मालक ( कोलकत्ता नाईट रायडर्स) ही त्याची व्यवसाय वृध्दी. शाहरुख खानने (shah rukh khan) अभिनेता व व्यावसायिक असा दोन्हीत उत्तम जम बसवून जणू एक आदर्श निर्माण केला. बरं, इंग्लिश बाबू देशी मेम, गुड्डू, त्रिमूर्ती अशा फ्लाॅप चित्रपटात आपण होतो याची खुद्द त्याला व त्याच्या चाहत्यांना अजिबात आठवण येणार नाही असा आपल्या यशाचा उत्तुंग डोलारा त्याने उभा केलाय.
शाहरुख खान (shah rukh khan) एकच असू शकतो, एकच घडू शकतो. तुम्ही यू ट्यूबवर फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्यातील वा अन्य इव्हेन्टसमधील त्याचा हजरजबाबीपणा बघा. पुन्हा पुन्हा पाहतानाही अजिबात कंटाळा येणार नाही. उलट, शाहरुख एवढी एनर्जी आणतो कुठून असाच प्रश्न पडेल. आपण शाहरुख खान आहोत हे तो स्वतः विसरत नाही आणि इतरांनाही त्याचा विसर पडू देत नाही… शाहरुख खान न संपणारा विषय. म्हणूनच हजार वर्षात शाहरुख खान होणे नाही हे अतिशयोक्तीपूर्ण वाक्यही पटते हो. तर मग आणखीन काय हवे?