‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
हिंदी चित्रपटसृष्टीतील हा पहिला युध्दपट
… अब तुम्हारे हवाले वतन साथियो
चित्रपटाच्या क्लायमॅक्सला हे गाणे पडद्यावर येते आणि चित्रपटगृहातील प्रेक्षक भावनाविवश होत असतानाच त्यांच्यातील देशभक्तीची भावना विलक्षण जागी होते. चित्रपटाचा योग्य असा परिणाम झालेला दिसत असतो. असा एकाद्या चित्रपटाच्या गाण्याने शेवट करायचा अशी पूर्वी कल्पनाच सुचणे अवघड होते. पण तसे झाले आणि चेतन आनंद दिग्दर्शित ‘हकिकत’ (मुंबईत रिलीज २० एप्रिल १९६४. मेन थिएटर राॅक्सी)च्या विलक्षण प्रभावाने प्रेक्षक अंतर्मुख झाले. हिंदी चित्रपटसृष्टीतील हा पहिला युध्दपट. (First War Movie)
त्याला साठ वर्ष पूर्ण होत असतानाही त्या चित्रपटाचा ठसा कायम आहे. हा एक क्लासिक चित्रपट म्हणून ओळखला जातो. १९६२ साली भारत आणि चीन यांच्यातील युध्दावर आधारित हा चित्रपट आहे. आपण यावर चित्रपट निर्माण करावा असे चेतन आनंदना वाटले. पण युध्दासारख्या वास्तव घटनांवर आधारित चित्रपट निर्माण करायचा तर शासनाची परवानगी हवी आणि युध्दपट निर्माण करायचा तर तसे बजेट हवे. सुदैवाने चेतन आनंदना दोन्हीत प्रयत्नपूर्वक का होईना पण यश प्राप्त झाले. तेव्हाच्या पंजाब सरकारकडून आर्थिक मदत झाली तर केंद्र शासनाकडून लडाख येथे चित्रीकरणाला परवानगी मिळाली.
या चित्रपटासाठी चेतन आनंदने आपली हिमालय फिल्म ही चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली. एका चित्रपट निर्मितीत असे अनेक लहान मोठे घटक असतात. तोपर्यंत चेतन आनंद यांनी नीचा नगर ( १९५६), अफसर (१९५०), आंधिया ( १९५२), टॅक्सी ड्रायव्हर ( १९५४), फंटूश ( १९५६), अर्पण ( १९५७), किनारे किनारे ( १९६३) या चित्रपटांचे दिग्दर्शन करताना विषयाची विविधता जपली होती. चित्रपट माध्यमाची उत्तम जाण व सामाजिक भान असलेले दिग्दर्शक ही त्यांची ओळख होती. कलाकारांची निवड ही महत्वाची गोष्ट. (First War Movie)
या चित्रपटासाठी विजय आनंद कास्टिंग दिग्दर्शक होता. तोपर्यंत त्याने स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेले नौ दो ग्यारह (१९५७), काला बाजार (१९६०) , ‘तेरे घर के सामने’ (१९६३) प्रदर्शित झाले होते. आणि कलाकारांच्या निवडीत विजय आनंद फार हुशार होते ( या तीनही चित्रपटात देव आनंद नायक असला तरी अन्य कलाकार व देव आनंदची व्यक्तिरेखा यात विजय आनंद टच दिसतो). चेतन आनंद व विजय आनंदने ‘हकिकत ‘चे कलाकार निश्चित केले. बलराज साहनी, जयंत असे अनुभवी, धर्मेंद्रसारखा तोपर्यंत चित्रपटसृष्टीत हळूहळू जम बसवत असलेला कलाकार, खुद्द विजय आनंद याबरोबरच नवखा संजय खान, सुधीर, इंद्राणी मुखर्जी यांच्यासह प्रिया राजवंश. तेव्हा ती इंग्लंडची रहिवाशी होती, तिकडे Royal Academy of Dramatic art यात कार्यरत होती, अभिनयाची आवड होती आणि आपणास हिंदी चित्रपटात काम करायचयं असे तिने चेतन आनंद वगैरेना पत्र लिहिले होते. चेतन आनंदनी तिला प्रतिसाद दिला आणि ती मुंबईत आली.(First War Movie)
शूटिंगची तयारी, कलाकारांची निवड हे होत असतानाच कैफी आझमी यांच्या गीतांना मदन मोहनचे संगीत, गाण्याचे रेकाॅर्डिंग हे सगळे झाले. मदन मोहननी दिल्लीत एका हाॅटेलमध्ये भूपिंदर सिंगला गिटार वाजवताना पाहिले. त्याला मुंबईत मोहम्मद रफींसोबत हो के मजबूर हमे हे गाणे गायला बोलावले. पण चारच ओळींची संधी मिळाल्याने तो नाखूष होता. चित्रपटातही त्याला छोटीशी भूमिका मिळाली. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनच्या कलाकारांना या चित्रपटात मानधनाशिवाय काम करायचे ठरवले. चेतन आनंद याचवेळी नवकेतन फिल्मच्या “गाईड “वरही काम करीत होते. दोन्ही चित्रपट भिन्न स्वरुपाचे. आवाका वेगळा. हे लक्षात घेऊन त्यांनी ‘गाईड ‘चे दिग्दर्शन सोडले आणि आपले सगळे लक्ष ‘हकिकत ‘वर केन्द्रित केले. ते झाले ते अतिशय चांगलेच झाले.
चित्रपट पूर्ण होत असतानाच अब तुम्हारे हवाले वतन साथियों हे गाणे चित्रपटात नेमके कुठे असावे हा प्रश्न होता. युध्दपट असला तरी त्यात गीत संगीतासाठी योग्य जागा असे हे पटकथाकार व दिग्दर्शकाचे कसब व कौशल्य. या चित्रपटात जवानांना असलेली घराची ओढ, घरुन येणारे पत्र अशा काही जागा होत्याच. पण अब तुम्हारे.. गाणे चित्रपटाच्या अगदी शेवटी असावे, अतिशय चांगला परिणाम साध्य होईल असे कैफी आझमीचे म्हणणे होते. चेतन आनंदना ते मान्य नव्हते. हा निर्णय साहसी वाटत होता. तोपर्यंत हिंदी चित्रपट फारशी चौकट मोडत नव्हता. पण हा निर्णय योग्य ठरला. या चित्रपटाला या गाण्याने अधिकच उंचीवर नेले. आणि तेव्हापासून हे राष्ट्रभक्तीने प्रेरीत गाणे म्हणून ओळखले जाते. प्रत्येक राष्ट्रीय सणाला लाऊडस्पीकरवर हे गाणे हमखास लावले जाऊ लागले. (First War Movie)
अशा भारावलेपणाने चित्रपटगृहातून बाहेर पडलेल्या रसिकांनी या चित्रपटाचे विलक्षण कौतुक केले. माऊथ पब्लिसिटीवर हा चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचत राहिला यात आश्चर्य नाही. इतकेच नव्हे तर या चित्रपटावर त्यानंतर वारंवार मुद्रित माध्यमातून लिहिले गेले, याची गाणी रेडिओवर ऐकायला मिळत राहिली त्यामुळे हा चित्रपट पुढील पिढीतही जात राहिला. मी स्वतः सत्तरच्या दशकात मॅटीनी शोला, गल्ली चित्रपटात पुन्हा पुन्हा पाहिला. या चित्रपटाचे मेकिंगच भारावून टाकणारे आहे. हा चित्रपट कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट स्वरुपात असून या चित्रपटात तो रंग काही वेगळाच अनुभव देणारा ठरतो. विशेष: युध्दाचे प्रसंग थरारक अनुभव देतात. हा एक उत्तम आदर्श युध्दपट म्हणून गणला जातो. साठच्या दशकातील सामाजिक, सांस्कृतिक वातावरणात हा चित्रपट रसिकांना जवळचा वाटला. तात्कालिक पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना हा चित्रपट अर्पण करण्यात आला होता.(First War Movie)
==========
हे देखील वाचा : अमर सिंह चमकीलाने मोडलेला चक्क अमिताभ बच्चन यांचा ‘हा’ रेकॉर्ड
==========
या चित्रपटात बलराज साहनी ( मेजर रणजित सिंग), धर्मेंद्र ( कॅप्टन बहादूर सिंग), विजय आनंद ( मेजर प्रताप सिंग), तसेच प्रिया राजवंश, संजय खान, सुधीर, शेख मुख्तार इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील जरा सी आहट होती है ( पार्श्वगायिका लता मंगेशकर), अब तुम्हारे हवाले वतन साथियो (मोहम्मद रफी), हो के मजबूर मुझे ( मोहम्मद रफी, भूपेन्द्र सिंग), मै यह सोचकर ( मोहम्मद रफी), आई अबके साल दीवाली ( लता मंगेशकर) ही या चित्रपटातील गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत. अनेक यशस्वी चित्रपट गाण्यांच्या लोकप्रियतेने सतत पुढील पिढीला माहिती होत राहिले त्यात हा युध्दपट विशेष उल्लेखनीय आहे. १९६५ साली या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा दुसर्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. तर २०१२ साली आधुनिक तांत्रिक सोपस्काराने हा चित्रपट रंगीत करण्यात आला तरी मूळ ब्लॅक अँड व्हाईट काळातील चित्रपट ही त्याची ओळख जास्त प्रभावी आणि पहिला युध्दपट हा ठसा जास्त उल्लेखनीय.(First War Movie)
चेतन आनंद यांनी दशकभरानंतर ‘हिन्दुस्थान की कसम’ (१९७३) हा १९७१ च्या भारत व पाकिस्तान यांच्यातील युध्दावर आधारित युध्दाच्या अधिकाधिक साहसी दृश्यांचा युध्दपट दिग्दर्शित केला. पण तो ‘हकिकत ‘चा दर्जा साध्य करु शकला नाही…”हकिकत” म्हणताक्षणीच या युध्दपटातील अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात, काही भावस्पर्षी दृश्यही आठवतात आणि त्यातील गाणी ओठांवर येतात तर मग आणखीन काय हवे. चित्रपटाला साठ वर्ष पूर्ण होत असूनही हे यश कायम आहे..चेतन आनंद यांनी याशिवाय आखरी खत ( १९६६) इत्यादी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘हकिकत’ या सगळ्यात वेगळाच. त्या काळात फारश्या तांत्रिक सुविधा उपलब्ध नसूनही दर्जेदार चित्रपट पडद्यावर येत हे आवर्जून सांगायलाच हवे.