‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
एक ओरीजनल हॉलीवूड सिनेमा: तीन हिंदी कॉपीड सिनेमे!
हॉलीवूडच्या चित्रपटावरून कॉपी करून हिंदीमध्ये चित्रपट बनवणे आपल्याकडे नवीन नाही अगदी पूर्वीपासून हे चालू आहे. ‘सेवन सामुराई’ हे प्रेरणा स्त्रोत म्हणून आपल्याकडे ‘मेरा गाव मेरा देश’ पासून ‘शोले’ पर्यंत अनेक चित्रपट तयार झाले. एखाद्या कादंबरीवरून चित्रपट बनणे हे देखील आपल्याकडे नवीन नाही. शरदचंद्र यांच्या ‘देवदास’ या कादंबरीवर भारतातील अनेक भाषांमधून उत्तम चित्रपट तयार झाले. नव्वदच्या दशकामध्ये हॉलिवूडच्या एका चित्रपटावरून इन्स्पायर होऊन चक्क तीन सिनेमे(movies) दहा महिन्याच्या अंतराने रिलीज झाले होते!
त्या काळात ऑफिशियल कॉपीराईट घेऊन ऑफिशियल रिमेक करण्याचा ट्रेंड सेट झाला नव्हता त्यामुळे असला प्रकार घडला असावा. दुसरी गोष्ट म्हणजे या तीनही चित्रपटाच्या निर्माता दिग्दर्शकांनाही कथानक इतके आवडले असावे की त्यांनी आपण या कथानकाला आपल्या पद्धतीने पडद्यावर आणू हा आत्मविश्वास आला असावा. कोणते होते हे तीन चित्रपट(movies)? काय होत हा नक्की किस्सा?
नॅन्सी प्राईस यांची एक कादंबरी ‘स्लीपिंग विथ द एनीमी’ १९८७ साली प्रकाशित झाली होती. या कादंबरीने पाश्चात्त्य देशांमध्ये मोठी खळबळ उडवून दिली होती. याच कादंबरीवर १९९१ साली हॉलीवुडमध्ये याच नावाने एक चित्रपट(movies) आला होता. जोसेफ रुबेन दिग्दर्शित या सिनेमात ज्युलिया रॉबर्ट, पॅट्रीक बर्गीन केल्विन अँडरसन आणि एलिझाबेथ लॉरेन्स यांच्या भूमिका होत्या. एका तर्कट, तापट आणि विकृत मनोवृत्तीच्या पुरुषाकडून एका स्त्रीला होणारा त्रास हा विषय यामध्ये मांडला होता. या हॉलीवूड सिनेमाची प्रेरणा घेवून आपल्याकडे तीन हिंदी सिनेमे पाठोपाठ आले.
या सिरीज मधील पहिला चित्रपट(movies) डेविड धवन यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपट होता ‘याराना’. ऋषी कपूर, माधुरी दीक्षित आणि राज बब्बर या कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. यात राज बब्बरने रंगवलेला जेबी खतरनाक होता. तो अतिशय स्त्रीलंपट असतो आणि तो माधुरीच्या मागावर असतो. माधुरी त्याच्यापासून दूर जाते आणि ऋषी कपूरशी लग्न करते पण तरी हा त्यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा येतो आणि वादळ निर्माण करतो.
‘याराना’ हा चित्रपट फारसा वेळ चालला नाही. २० ऑक्टोबर १९९५ या दिवशी हा चित्रपट(movies) प्रदर्शित झाला. याच दिवशी मेगाब्लॉक बस्टर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. ‘याराना’ चित्रपट आज आठवतो तो केवळ यातील ‘मेरा पिया घर आया’ या कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेल्या गाण्यासाठी आणि माधुरीच्या डान्ससाठी. या चित्रपटाला संगीत अनु मलिक यांचे होते. ‘मेरा पिरा पिया घर आया’ या गाण्याची चाल अनुमलिकने सही सही चोरली होती. नुसरत फतेह अली खान यांच्या एका रचनेवर हे गीत स्वरबद्ध केले होते.
यानंतर पाचच महिन्यांनी १५ मार्च १९९६ रोजी याच कथानकावरील पार्थो घोष दिग्दर्शित ‘अग्निसाक्षी’ हा चित्रपट(movies) प्रदर्शित झाला. या चित्रपटात नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ आणि मनीषा कोइराला यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात नाना पाटेकर यांनी सॅडीस्ट भूमिका केली होती. सबंध चित्रपटांमध्ये नानाचा टेररनेस जाणवत होता. या भूमिकेसाठी नाना पाटेकरला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील जबरदस्त बिजनेस केला.
कविता कृष्णमूर्तीने गायलेले ‘यारा दिल लगाना’ हे गाणे त्या काळात प्रचंड गाजले होते. यानंतर पाच महिन्यांनी ५ जुलै १९९६ रोजी ‘दरार’ हा याच स्टोरी लाईन वरील चित्रपट प्रदर्शित झाला. हा सिनेमा देखील स्लीपिंग विथ द एनिमी या चित्रपटावरच आधारित होता. या चित्रपटात(movies) अरबाज खान ,ऋषी कपूर आणि जुही चावला यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आमीर खानचा भाऊ अरबाज खानचा हा पहिलाच चित्रपट होता. अब्बास मस्तान यांनी या चित्रपटातील दिग्दर्शन केले होते. या सिनेमातील भूमिकेसाठी अरबाज खान याला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
तीनही सिनेमाचा एकच प्लॉट असल्याने कोणता दिग्दर्शक त्याला कशी ट्रीटमेंट देतो यावर सिनेमाचे यश अवलंबून होते आणि या तीनही चित्रपटात(movies) बाजी मारली ती ‘अग्निसाक्षी’ या चित्रपटाने. ‘याराना’ चित्रपटातील ‘मेरा पिया घर आया’ हे गाणे त्या काळात खूप गाजले होते.
========
हे देखील वाचा : शशी कपूरचा पहिला सुपरहिट सिनेमा
========
गंमत म्हणजे ‘अग्निसाक्षी’ ची भूमिका आधी माधुरी दीक्षितला ऑफर झाली होती पण भूमिकेतील साधर्म्य असल्याने तिने ती भूमिका केली नाही. तसेच मनीषाची भूमिका जुही चावला देखील ऑफर झाली होती तिने देखील त्याच कारणाने ही भूमिका नाकारली होती. नाना पाटेकरची भूमिका आधी शाहरुख खानला देखील ऑफर करण्यात आली होती. पण तोवर शाहरुखने निगेटिव्ह भूमिका करणे बंद केले होते कारण त्याचा डीडीएलजे हा चित्रपट(movies) प्रदर्शित झाला होता आणि सुपरहिट झाला होता. त्यामुळे पुन्हा त्याने निगेटिव्ह भूमिकाकडे वळण्याचे टाळले!
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी