‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘या’ रुपात माधुरी हवी होती असं आता वाटतंय का?
चित्रपटाच्या जगात ‘घडायच्या राहून गेलेल्या गोष्टी’ जास्त रंजक नि उत्सुकतापूर्ण असतात. त्या घडल्या असत्या तर… या जर तरला अर्थ असो वा नसो पण काही गोष्टी घडल्या असत्या तर आणखीनच रंगत आली असती हो…काय सांगावे, चित्रपटाच्या जगात काही वेगळीच चर्चा रंगली असती.(Madhuri)
आता हेच बघा ना, दिग्दर्शक संजय लीला भन्सालीने तब्बल पंचवीस तीस वर्षांनंतर म्हटलं त्याच्या दिग्दर्शनातील ‘खामोशी द म्युझिकल‘( १९९६) मधील अन्नीच्या आणि ‘हम दिल दे चुके सनम ‘ (१९९९) मधील नंदीनीच्या भूमिकेत माधुरी दीक्षित(Madhuri) हवी होती. एव्हाना तुमच्या डोळ्यासमोर “खामोशी“मध्ये मनिषा कोईरालाने साकारलेली अन्नी आणि ” हम दिल दे… “मध्ये ऐश्वर्या रायने खुलवलेली नंदीनी आली असेलच. ही गोष्ट इतक्यावरच थांबत नाही, विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित “1942 अ लव्ह स्टोरी” (१९९४) राजेश्वरी पाठक उर्फ रज्जो ही भूमिका माधुरी दीक्षितच साकारणार होती. त्यानुसार तिचं फोटो सेशनही झालं. त्या रुपातील तिचा फोटो सोशल मिडियात पाह्यलाही मिळतो. सोशल मिडियाचे हे देणे चांगले आहे.
नव्वदच्या दशकातील हे बहुचर्चित चित्रपट. तीनही चित्रपटांची घोषणेपासूनच रंगतदार चर्चा. तीनहीचे स्वरुप भिन्न. थीम वेगळी. तीनहीचे संगीत आजही लोकप्रिय. मनिषा कोईराला त्या काळात एकिकडे चित्रपटाच्या सेटवर येण्याजाण्याबाबत विलक्षण बेभंरवशाची म्हणून गाॅसिप्स मॅगझिनमधून गाजणारी. तिला त्याची पर्वा नव्हती. दुसरीकडे पाहावे तर तिची चित्रपटांची निवड लक्षवेधक होती. संजय लीला भन्साली, विधु विनोद चोप्रा अशा कसदार दिग्दर्शनातील चित्रपटात भूमिका मिळालीये याचाच अर्थ चित्रपटसृष्टीचा तिच्यातील गुणवत्तेवर विश्वास आहे. (Madhuri)
ऐश्वर्य रायचं प्रगती पुस्तक आपल्याला सांगायलाच नको. चित्रपटात आली तरी तिच्यातील अभिनेत्रीची ओळख व्हावी अशा संधीची गरज होतीच. तिला अभिनय येतो, नृत्यातही ती पारंगत आहे (ती फक्त आणि फक्त छान छान दिसणारी माॅडेल नाही) हे पडदाभर दाखवायची संधी हवी होतीच. संजय लीला भन्सालीने तिच्यावर विश्वास दाखवला, तिनेही आपल्या व्यक्तीरेखेवर भरपूर मेहनत घेतली आणि नंदीनी साकारत चित्रपट समीक्षक/ विश्लेषक आणि प्रेक्षक यांच्याकडून उत्तम अभिनेत्री म्हणून दाद मिळवली.
माधुरीने(Madhuri) या तीनही भूमिकेत नक्कीच रंग भरला असता. प्रकाश झा दिग्दर्शित ‘मृत्युदंड’ वगळता तिच्या वाटेला अभिनय दाखवण्याची भूमिकाच आली नाही, कायमच चेहर्यावर हसू आणि बहारदार नृत्य चापल्य हेच तिचे वैशिष्ट्य असेच नेहमी म्हटले गेले. आजही अधूनमधून असे म्हटले जाते. या भांडवलावरही तिने तब्बल चाळीस वर्ष आपले स्थान, फिटनेस, लोकप्रियता आणि मागणी टिकवलीय हे काही कमी नाही हो. रज्जो, नंदिनी, अन्नी या भूमिकेत ती एकदम फिट्ट बसली असती आणि काही चांगल्या भूमिका तिच्या खात्यात जमा झाल्या असत्या.
तसे का बरे घडले नाही? राजश्री प्राॅडक्सन्स निर्मित व सुरजकुमार बडजात्या दिग्दर्शित “हम आपके है कौन” (१९९४) साठी बरेच दिवस द्यायचे म्हणून तिने “1942 अ लव्ह स्टोरी” सोडला. ही पक्की व्यावसायिकता. समजा तिने “खामोशी द म्युझिकल ” स्वीकारला असता तर नाना पाटेकरची मुलगी म्हणून ती स्वीकारली गेली असती का हा मोठाच अवघड प्रश्न होता. बरं झालं हा योग जुळून आला नाही. ‘हम दिल दे…’च्या वेळेस तिच्या लग्नाची चर्चा जास्त होती. जणू इतर प्रश्न सुटले वा संपले आणि माधुरी(Madhuri) लग्न कधी करतेय हाच एक प्रश्न राहिला होता.
=======
हे देखील वाचा : तैमूर व जेहची आजी ‘बबिता’
=======
अमेरिकेत जाऊन तिने डाॅ. श्रीराम नेने यांच्याशी १७ ऑक्टोबर १९९९ रोजी लग्न केले याची खबर तिचा स्टार सेक्रेटरी रिक्कू राकेशनाथ याने ५ नोव्हेंबर रोजी आज तक या वाहिनीला दिली. आणि मग ती संपूर्ण मिडिया, चित्रपटसृष्टी व तिच्या आजही तिचे फॅन्स व फाॅलोअर्स असलेल्यांना समजली. माधुरी(Madhuri) रज्जो, नंदिनी साकारु शकली नाही याची तिलाही रुखरुख असेलच. तिची प्रतिमा (इमेज) आणि प्रतिभा (टॅलेंट) पाहता हे व्हायला हवे होते हो. तिच्या प्रगती पुस्तकात आणखीन काही चांगले गुण जमा झाले असते….