‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
फिल्मी अड्ड्यावरील चर्चेतील फिल्म
नातं मैत्रीचे असो, रक्ताचे असो, सख्ख्या शेजाऱ्यांशी असो वा पती पत्नीचे असो, कोणत्याही प्रकारचा संशय म्हणजे मोठ्याच संकटांना आमंत्रण. एक प्रकारचा राक्षसच. सगळं नातचं विस्कटून टाकणारा. कमल भटनागर (राजेश खन्ना) आणि सुनीता (मुमताज) यांच्या अतिशय आनंदी, सुखकारक, मनमुराद अशा प्रेम विवाहातील संसारात असाच एक संशय निर्माण होतो. आपली पत्नी आणि आपल्या शेजारच्या बंगल्यात राहणारा मोहन (संजीवकुमार) यांच्यातील नाते हे निखळ मैत्रीचे नसून त्यात काही मर्यादा ओलांडल्यात असा कमलला आलेला संशय दिवसेंदिवस बळावतो.(FIlm)
छोट्या छोट्या गोष्टींतून तो वेगळे अर्थ, गैरसमज काढतो. एका कौटुंबिक पार्टीत सुनीता ‘चोरी चोरी चुपके चुपके…’ गाते तेव्हा मोहन सतार वादनातून तिला साथ देतो तेव्हा तर कमलची खात्रीच पटते की, आपण कामानिमित्त घराबाहेर असल्यावर मोहन सुनीताला भेटायला घरी येतो. एकदा रात्री त्याला आपल्या बंगल्याबाहेरुन कोणी पळून गेल्याचेही दिसते. त्याच्या मनात “संशयाचे भूत” घट्ट होते. तो यावरुन सुनीताशी वादही घालतो. एकदा तो असाच बंगल्याबाहेर पडणार्याला (रणजीत) पकडतो तेव्हा तो सांगतो, मी मोहनच्या बायकोला चोरुन भेटायला येतो. मोहन व सुनिता यांचे नाते भावा बहिणीसारखे आहे. तू उगाच संशय घेतोस. एव्हाना बराच उशीर झालेला असतो.
जे. ओम प्रकाश निर्मित व दिग्दर्शित “आप की कसम” (मुंबईत रिलीज ३ मे १९७४) च्या मुंबईतील प्रदर्शनास पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. (गुगलवरची १७ एप्रिल १९७४ ही तारीख दिल्लीतील रिलीजची. त्या काळात टप्प्याटप्प्यावर चित्रपट प्रदर्शित होत.)
आजच्या काळात हीच कथा कदाचित वेगळे वळण घेईल. (चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा खून केला अथवा प्रियकराच्या मदतीने पतीचा खून. अशा बातम्या आपण अधूनमधून वाचतो.) पन्नास वर्षांपूर्वी अशी ‘संशयाची गोष्ट’ रुपेरी पडद्यावर साकारणे हे विशेषच होते. जे. ओम प्रकाश हे साठच्या दशकापासूनच निर्माते म्हणून कार्यरत. (FIlm)
आस का पंछी, आई मिलन की बेला, आया सावन झुम के, आंखो आंखो मे इत्यादी चित्रपटांची निर्मिती केल्यावर ते “आप की कसम” पासून चित्रपट दिग्दर्शनात उतरले आणि पहिल्याच चित्रपटात धाडसी थीम साकारली. एका मल्याळम चित्रपटावर आधारित या चित्रपटाची गोष्ट रमेश पंत यांची तर कसदार पटकथा राम केळकर यांची. छायाचित्रणकार बी. बाबासाहेब यांचे तर संकलन प्रताप दवे यांचे. कला दिग्दर्शन सुधेन्दु राॅय यांचे. गाण्यांसाठी कश्मीरला भरपूर पसंती दिलीय आणि त्या सौंदर्यात राजेश खन्ना व मुमताज छान खुललेत. गाणी कधीही पहावीत व फ्रेश व्हावे.
राजेश खन्ना व मुमताज सुपरहिट जोडी. ‘बंधन’, ‘अपना देश’, ‘सच्चा झूठा’, ‘दुश्मन’, ‘रोटी’, ‘प्रेम कहानी’, ‘आप की कसम’, ‘आयना’ या चित्रपटात ही जोडी जमली आणि शोभली. राज खोसला दिग्दर्शित ‘दो रास्ते’ आणि मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘सच्चा झूठा’ हे चित्रपट सुरुवातीस शशी कपूरला ऑफर झाले होते पण मुमताज सी ग्रेडची अभिनेत्री म्हणून ते त्याने नाकारले.
अशोक राॅय दिग्दर्शित ‘चोर मचाये शोर’ च्या वेळेस मुमताजने स्वतःचे स्थान निर्माण केल्याने शशी कपूरने होकार दिला. दो रास्ते आणि सच्चा झूठा सेटवर गेले तो पर्यंत राजेश खन्ना सुपर स्टार झाला नव्हता आणि शूटिंगच्या रिकाम्या वेळेत त्याचे व मुमताजचे सूर छान जमले. यातूनच त्यांची रुपेरी पडद्यावरील रोमॅन्टीक दृश्य छान खुलत. ‘आप की कसम ‘मध्ये तर विशेषच. करवटे बदलती रहे सारी रात हम (पार्श्वगायक लता मंगेशकर व किशोरकुमार), पास नही आना दूर नही जाना (लता मंगेशकर व किशोरकुमार), कहो सुनो क्या कहा क्या सुना (लता मंगेशकर व किशोरकुमार), जय जय शिव शंकर कांटे लगे ना कंकण (लता मंगेशकर व किशोरकुमार) या गाण्यात ते फारच दिसते हो. (FIlm)
अर्थात या नात्यात विश्वास होता, आपलेपण होते. चित्रपटातील चोरी चोरी चुपके चुपके (लता मंगेशकर) व जिंदगी के सफर मे गुजर जाते है मुकाम (किशोरकुमार) ही गाणी देखील लोकप्रिय. आनंद बक्षी यांच्या गीतांना राहुल देव बर्मनचे संगीत. त्या काळात एकाच चित्रपटातील सर्वच्या सर्व गाणी लोकप्रिय हे अनेकदा घडे आणि ती गाणी पाहण्यासाठी चित्रपटगृहात पुन्हा पुन्हा जावेसे वाटे. ‘आप की कसम’ला मुंबईतील मेन थिएटर नाझमध्ये रौप्य महोत्सवी यश. “आप की कसम”चा मुहूर्त धर्मेंद्रच्या हस्ते झाला होता.
संजीवकुमारही भाव खाऊन गेला. त्याला कोणतीही व्यक्तीरेखा द्यावी. नाणे खणखणीत. अन्य भूमिकेत रहमान, दीना पाठक, ए. के. हनगल, जयश्री टी. , मुराद, ज्यु. मेहमूद, सत्येन कप्पू, केश्तो मुखर्जी, सुंदर इत्यादी. चित्रपटाच्या क्लायमॅक्स कमल व सुनिता यांच्या आता वयात आलेल्या मुलीचे लग्न आहे. त्यात बरेच नाट्य आहे. एव्हाना कमल, सुनीता व मोहन वृध्द झालेत. या मुलीची भूमिका प्रियदर्शनी हिने साकारलीय. तिचे खरे नाव प्रिया वालावलकर. दादर पोस्ट ऑफिसजवळ राहायची. या चित्रपटाची आणखीन एक वेगळी आठवण.(FIlm)
बीबीसीने त्या काळात राजेश खन्नाच्या अफाट लोकप्रियतेवर (क्रेझवर) एक माहितीपट तयार केला (त्याच्या प्रतिनिधीला राजेश खन्नाने बराच काळ ताटकळत ठेवला. तारखा रद्द केल्या यावरुन बरेच गाॅसिप्स रंगले.) त्यात कश्मीरमधील याच “आप की कसम “च्या सुनो कहो या गाण्याच्या शूटिंगच्या वेळच्या राजेश खन्ना व मुमताजच्या मुलाखती आहेत.(FIlm)
===========
हे देखील वाचा : ‘या’ दिवशी येणार बहुचर्चित ‘पंचायत’चा तिसरा सीझन
===========
“आप की कसम” एका रसिक पिढीचे वेड होते. फिल्मी अड्ड्यावर, काॅलेज कट्ट्यावर, इराणी हाॅटेलमधील पानी कम चहासोबत त्या काळातील चित्रपटांच्या गप्पा रंगताना त्यात “आप की कसम” थीमपासून गाण्यापर्यंत चर्चेत. जे. ओम प्रकाश यांचा दिग्दर्शनातील विश्वास वाढला आणि त्यानंतर त्यांनी आशा, आशिक हू बहारों का, आखिर क्यू इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. आणि गुलजार दिग्दर्शित “आंधी” चित्रपटाची निर्मिती केली. त्या काळात गोष्टीला महत्व असे आणि ती मनोरंजनाच्या माध्यमातून पडद्यावर रंगवली जाई. “आप की कसम” म्हणूनच पन्नास वर्षांनंतरही तसे व लोकप्रिय.