‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
अमिताभ बच्चन यांना पहिले फिल्मफेअर अवॉर्ड कधी मिळाले?
ही भूमिका होती अँथनी गोन्सालवीसची! इंटरटेनमेंट मसाला सिनेमाचा बाप म्हणून ज्या सिनेमाचा कायम उल्लेख होतो त्या ‘अमर अकबर अँथनी’(Anthony) या चित्रपटाबद्दल जितकं लिहाल जितकं वाचाल तितकं कमीच आहे. हा सिनेमा अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण असा आहे. याच सिनेमातील भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना त्यांच्या आयुष्यातील पहिले फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले होते. ही भूमिका होती अँथनी गोन्सालवीसची. या भूमिकेला हे नाव कसं मिळालं? त्याची देखील एक स्टोरी आहे.
या सिनेमाचे दिग्दर्शक मनमोहन देसाई हे पक्के व्यवसायिक होते. पब्लिकची नाडी त्यांना बरोबर कळाली होती. एका सिनेमात तीन नायक आणि तिघेही वेगवेगळ्या धर्माचे. एक हिंदू एक मुस्लिम आणि एक ख्रिश्चन. ही त्यांची मांडणी जबरदस्त होती. आज जर हा चित्रपट बनला असता तर कदाचित बेस्ट नॅशनल इंटिग्रेशन फिल्म म्हणून त्याला सन्मान मिळाला असता! मनोरंजनाच्या जबरा मुशीत बनलेला हा चित्रपट पब्लिकने जबरदस्त डोक्यावर घेतला होता. या सिनेमाची कथा मनमोहन देसाई यांना एका वर्तमानपत्रातील बातमी वाचून सुचली होते. एक व्यक्ती आपल्या तीन लहान मुलांना बागेत सोडून देऊन स्वत: आत्महत्या करतो अशी एक बातमी त्यांनी पेपरमध्ये वाचली आणि त्यांच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले आणि इथूनच या चित्रपटाचा जन्म झाला.
अमिताभने रंगवलेल्या कॅरेक्टरचे नाव आधी अँथनी(Anthony) फर्नांडिस असे होते. गीतकार आनंद बक्षी यांनी त्या कॅरेक्टरसाठी गाणे देखील लिहिले होते. ‘माय नेम इज अँथनी(Anthony) फर्नांडिस’ पण यातील फर्नांडिस हा शब्द मीटरमध्ये बसत नव्हता. त्यामुळे हे आडनाव बदलायचे ठरवले. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि गीतकार आनंद बक्षी यावर विचार करू लागले. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की हिंदी सिनेमाच्या दुनियेत चाळीस आणि पन्नासच्या दशकात अँथनी गोन्सालवीस नावाचे एक गोव्याकडून आलेले म्युझिक अरेंजर होते. ते नाव सर्वांना पसंत पडले. या महान म्युझिक अरेंजरला या निमित्ताने पुन्हा एकदा आठवले जाईल म्हणून कॅरेक्टरचे नाव अँथनी गोन्सालवीस असे ठेवले आणि गाण्यात तो शब्द टाकण्यात आला.
“माय नेम इज अँथनी गोन्सालवीस मै दुनिया में अकेला हू
दिल भी खाली घर भी है खाली इसमे रहेगी कोई किस्मत वाली
हे जिसे मेरी याद आये जब चाहे चली आये
रुपनगर प्रेम गली खोली नंबर चारसो बीस एक्स्क्यूज मी प्लीज….” गाणं सुपरहिट झालं!
या चित्रपटात विनोद खन्ना याने अमर ही व्यक्तिरेखा रंगवली होती. खरंतर स्क्रिप्टच्याप्रमाणे विनोद खन्नाला या चित्रपटात नायिका नव्हती कारण यातील त्याची भूमिका हि एका रफ टफ पोलीस अधिकाऱ्याची असल्यामुळे प्रेम गाणी यासाठी हे कॅरेक्टर नव्हतेच. पण जेव्हा विनोद खन्नाला हि नायिकेची बातमी कळाली तेव्हा त्याने हट्टाने आपल्यासाठी हीरोइन मागून घेतली. ऐन वेळेला आता कुणाला साईन करायचे? हा प्रश्न पडला. मनमोहन देसाई यांच्या ‘परवरिश’ आणि अमर अकबर अँथनी‘(Anthony) या दोन्ही सिनेमांची शूटिंग एकाच वेळी एकाच स्टुडीओत चालू होते. ‘परवरिश’ या चित्रपटात शबाना आजमी काम करत होती.
मनमोहन देसाई यांनी तिलाच विनोद खन्नाची नायिका म्हणून चित्रपटात घेतले. हा चित्रपट १९७६ साली तयार झाला होता पण त्या काळात देशात आणीबाणी चालू होती. सेंसर बोर्डाने मारधाड असलेल्या सिनेमाला बऱ्यापैकी अडवले होते. त्यामुळे हा सिनेमा बनल्यानंतर जवळपास एक वर्षांनी रिलीज झाला.
========
हे देखील वाचा : मैत्री: अभिनय सम्राट दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांची!
========
मार्च १९७७ मध्ये भारतात नवीन सरकार सत्तेवर आले. आणीबाणीचा अमल बंद झाला आणि मनमोहन देसाई यांचा चित्रपट प्रदर्शनाचा उपवास संपला. त्यांचे लागोपाठ चार सिनेमे प्रदर्शित झाले आणि सुपर हिट झाले. जे सिनेमे होते ‘धरम वीर’, ‘चाचा भतीजा’, ’परवरीश’ आणि ‘अमर अकबर अँथनी’(Anthony) हा मसाला एंटरटेनमेंट चित्रपट २७ मे १९७७ रोजी प्रदर्शित झाला. अमिताभच्या भूमिकेची प्रचंड तारीफ झाली आणि त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट नायकाचा फिल्मफेअर पुरस्कार त्याला मिळाला.