‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
‘प्रेम त्रिकोणा’ची गोष्ट, माधुरी दीक्षित हुकमी प्रेयसी
आजच्या माधुरी दीक्षितच्या(Madhuri dixit) वाढदिवसानिमित्त काही वेगळे सांगितल्याने तुम्हाला नक्कीच आवडेल. आजच्या तिच्या वाढदिवशी तिचे कायमस्वरुपी हास्य, तिचे यशस्वी चित्रपट, तिची धक धक नृत्य, तिच्या लोकप्रिय गाण्याची बहार, हिंदी चित्रपटसृष्टीत राहूनही मराठीशी तिने जपलेले नाते अशा तिच्या अनेक गोष्टींवर आज ‘फोकस ‘ पडणारच, आपण तिच्या अनेक खासियतींमधील अशाच एका विशेष गोष्टीची तारीफ करुयात.
माधुरी दीक्षित नेने(Madhuri dixit) हिने कळत नकळतपणे अनेक विक्रम घडवलेत. विक्रम आपोआप घडतात म्हणा, मोडण्यासाठी असतात म्हणा, मग तेही विक्रम मोडले जातात म्हणा… हे होतच राहते आणि व्हायलाही हवे. आपल्या देशातील तळागाळातील माणसांपर्यंत पोहचलेल्या चित्रपट व क्रिकेट या अतिशय लोकप्रिय क्षेत्रात तर कशा कशाचेही विक्रम घडत असतात. अगदीच उघड उघड घडत नसतील तर ते घडलेत असे सामोरे आणावे लागते. नेहमीच यशाच्या गोष्टींना वलय असते.
सिनेमाच्या जगात काही योगायोग अगदी नकळतपणे होतात, म्हणूनच तर त्यात गंमत आहे. त्यात चाहतेही खूश. अशीच एक गोष्ट म्हणजे, माधुरी दीक्षितने एक दोन नव्हे, तर चक्क ‘प्रेम त्रिकोणाची थीम’ असलेल्या चक्क पाच चित्रपटात भूमिका सकरल्या आहेत. एकाच वेळेस दोन नायकांनी रुपेरी पडद्यावर तिच्यावर प्रेम करावे असेच तिचे ग्लॅमरस व्यक्तिमत्व आहेच म्हणा. पटकथाकार उगाच गोष्ट लिहीत नाहीत आणि दिग्दर्शक ही उगाच कॅमेरा व संकलन यावर मेहनत घेत नाहीत. कुछ तो होता है.
होय माधुरी दीक्षितची(Madhuri dixit) भूमिका असलेल्या मोजून पाच प्रेमाचा प्रेम त्रिकोण होता. अर्थात लव्ह ट्रॅन्गल. गल्ला पेटीवरील हुकमी फंडा. हा ही एक म्हटलात तर फिल्मी विक्रमच आणि तो जर माधुरी दीक्षितबद्दल आणि तेही ‘चित्रपटातील प्रेमाच्या गोष्टीबद्दल’ असेल तर त्यात एखादा विक्रमचा योगायोग आजच्या तिच्या वाढदिवसानिमित्त साध्य करायलाच हवा.
एव्हाना तुमच्या डोळ्यासमोर सुधाकर बोकाडे निर्मित आणि लाॅरेन्स डिसोझा दिग्दर्शित ‘साजन‘ (१९९१) हा प्रेमपट नक्कीच आला असेल. देखा है पहिली बार साजन की ऑखो मे प्यार, अंधेरीतील सेठ स्टुडिओतील या गाण्याच्या शूटिंग रिपोर्टींगसाठी निर्माता सुधाकर बोकाडे याने मुंबईतील आम्हा सिनेपत्रकारांना आवर्जून बोलावले असता माधुरीची नृत्यातील मेहनत लाईव्ह अनुभवली. कलाकार उगाच मोठा होत नाही. संजय दत्त व सलमान खान हे यातील दोन कोन होते. यातील लोकप्रिय गाण्यांमुळे एका पिढीतील चित्रपट पुढील दोन पिढ्या ओलांडूनही आपले अस्तित्व टिकवून आहे. बहुत प्यार करते है तुमको सनम, तुझे मिलने की तमन्ना है, मै शायर हू मै तेरी शायरी ही ‘साजन’ मधील गाणी आजही लोकप्रिय आहेत. या गाण्यांनी या चित्रपटातील प्रेमाच्या गोडवा जपलाय.
आता तुमचा प्रश्न असेल की, प्रेम त्रिकोणाची कथा असलेले दिलखुलास माधुरीचे आणखीन चार चित्रपट कोणते? थांबा थांबा सांगतो, प्रेमाची गोष्ट सहज न संपणारी असते. रमेश तलवार दिग्दर्शित ‘साहिबान‘ (१९९३. संजय दत्त व ॠषि कपूर), यश चोप्रा दिग्दर्शित ‘दिल तो पागल है‘ (१९९७, शाहरूख खान आणि करिष्मा कपूर), रिमा राकेशनाथ दिग्दर्शित ‘मोहब्बत‘ (१९९७, संजय कपूर आणि अक्षय खन्ना), लाॅरेन्स डिसोझा दिग्दर्शित ‘आरजू‘ (१९९९, अक्षयकुमार आणि सैफ अली खान).
यातील दिल तो पागल हैमध्ये ही एक नायक दोन नायिका अशी थीम आहे आणि गीत संगीत व नृत्य या माध्यमातून हा चित्रपट आकार घेतो, रंगत जातो. यात अक्षयकुमार पाहुणा कलाकार आहे. हा एक प्रकारे ऑपेरा होता. यश चोप्रा रोमॅन्टीक टच. गीत नृत्य संगीताची बहार या चित्रपटाने मुंबईत लिबर्टी थिएटरमध्ये खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले. या चित्रपटातील आनंद बक्षी यांची गीते आणि उत्तमसिंगचे तरुण संगीत यांनी या प्रेम त्रिकोणाला पंचवीस वर्षांनंतरही तरुण ठेवले आहे. ओ ढोलना, अरेरे यह क्या हुआ मुझे ना पहेचाना, दिल तो पागल है दिल दीवाना है, कोई लडका है जब भी मिलता है अशी या चित्रपटातील सर्वच गाणी लोकप्रिय आहेत. या प्रेम त्रिकोणाला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त माधुरी दीक्षित नेने हिने गाण्याच्या मुखड्यावर आपण नृत्य केल्याचे रिळ तिने सोशल मिडियात पोस्ट केले. त्याला भरभरुन लाईक्स, सकारात्मक काॅमेन्टस मिळाल्या. यश यश म्हणतात ते असेही असू शकते.
मोहब्बत आणि आरजूचे नायक माधुरी दीक्षितच्या उत्फूर्त स्क्रीन प्रेझेन्ससमोर काहीसे फिके पडले आणि या दोन्ही चित्रपटाना फारसे यश मिळाले नाही. अपयश हा ही खेळाचाच एक भाग. ‘साजन‘ची सर ‘आरजू‘ला अजिबात आली नाही, येणारही नव्हती. ‘मोहब्बत‘ हा चित्रपट राज कपूर अभिनित, निर्मित व दिग्दर्शित ‘संगम‘ (१९६४) ची फसलेली रिमेक होती. राज कपूर दिग्दर्शनीय टच कमाल असे. चोवीस तास सिनेमावर अखंड प्रचंड प्रेम करणारा माणूस हो तो. अथवा हा चित्रपट ‘संगम‘ची वाईट झेरॉक्स होती. ‘साहिबान‘ निर्मितीवस्थेत फार रखडल्याने त्यातील प्रेमाचा गोडवा आटला.
माधुरी दीक्षितच्या(Madhuri dixit) निस्सीम चाहत्यांनी एकदाच का होईना पण हे चित्रपट कदाचित पाहिले असतीलही, पण अशा प्रेमापोटी चित्रपट सुपर हिट ठरत नाही. चित्रपटात काही पाहण्यासारखे हवे.. ते काही असले तरी माधुरी दीक्षितच्या प्रोफाईलमध्ये चक्क प्रेम त्रिकोणाचे मोजून पाच चित्रपट आहेत ही मात्र माधुरीच्या फॅन्स आणि फाॅलोअर्सला सुखावणारी गोष्ट आहे आणि तेच तर महत्वाचे आहे ना? म्हटलंत तर आहे ना भारी विक्रम आणि हा विक्रम सहजी मोडला जाईल असेही वाटत नाही.
=======
हे देखील वाचा : फिल्मी अड्ड्यावरील चर्चेतील फिल्म
=======
माधुरी दीक्षितवर(Madhuri dixit) रुपेरी पडद्यावर प्रेमाची गोष्ट अशी सतत खुलत फुलत राहिली. तिच्या या पाच प्रेम त्रिकोणातील माझा अतिशय आवडता चित्रपट, ‘दिल तो पागल है‘. यू ट्यूबवर त्यातील एकादे गाणे पाहिले तरी फ्रेश व्हायला होते. दिल तो पागल है, दिल दीवाना है असे आपण सहज म्हणणारच.