शम्मी कपूरने दिग्दर्शित केलेला पहिला ॲडल्ट कॉमेडी सिनेमा!
आपल्या धस मुसळ्या आणि रांगड्या प्रेमाच्या अंदाजाने साठचे दशक गाजवणाऱ्या शम्मी कपूर (Shammi Kapoor) यांचे चित्रपट सत्तरच्या दशकाच्या प्रारंभी मात्र फ्लॉप होऊ लागले. एकतर शम्मी कपूरची जाडी खूप वाढली होती त्यामुळे रोमँटिक नायक म्हणून तो शोभत नव्हते. तरीही त्यांचे त्या काळात काही चित्रपट येतच होते. अंदाज, सच्चाई, जाने अंजाने, छोटे सरकार…. पण त्यानंतर मात्र नायक पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. याच काळात त्याचे जुने मित्र एफ सी मेहरा त्याला भेटायला आले होते.
त्यांनी शम्मी कपूरला, ”आता तू कॅमेरासमोर नाही तर कॅमेऱ्याच्या मागून चित्रपटाच्या दुनियेत ये.” असे सांगितले. थोडक्यात “तू आता सिनेमा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतर” असे सांगितले. शम्मी कपूर (Shammi Kapoor) त्या वेळी आपल्या आई आणि वडिलांच्या निधनाने थोडेसे खचले होते. त्यांनी, ”विचार करून सांगतो.” असे सांगितले. एफ सी मेहरा यांनी अब्रार अल्वी यांनी लिहिलेले एक स्क्रिप्ट त्याच्या हाती सोपवली आणि विचार करून सांग असे सांगितले. शम्मी कपूरने ते स्क्रिप्ट पाहिले आणि तो जागेवर उडाला. कारण ते स्क्रिप्ट साठच्या दशकात गाजलेल्या एका हॉलीवुड सिनेमावरून घेतले होते. हा चित्रपट होता ‘इर्माला ड्यूस’.
शम्मी कपूरला हा सिनेमात्या वेळी प्रचंड आवडला होता. शम्मी कपूरला या सिनेमाच्या हिंदी रिमेक मध्ये काम देखील करायचे होते. शम्मीने १९६१ साली लंडनमध्ये ‘इर्माला ड्यूस’ हे मूळ नाटक पाहिलं होतं. १९६३ साली बिली विल्डर यांनी शर्ली मॅकलेन हिला इर्मालाच्या भूमिकेत झळकवून ‘इर्माला ड्यूस’ हा भन्नाट सिनेमा बनवला होता. जॅक लेमनला प्रमुख नायकाच्या भूमिकेत घेऊन एक अतिशय उत्कृष्ट हॉलीवूड मुव्ही बनली होती. या सिनेमात वेश्या आपला कामाचा आनंद मनमुरादपणे लुटताना दाखवले होते. त्यामुळे या चित्रपटावर त्याकाळी भारतात बंदी घातली गेली.
१९६४ साली शम्मी कपूरने (Shammi Kapoor) हा चित्रपट मुंबईत एका खाजगी शो मध्ये पाहिला. त्याला या सिनेमाचा हिंदी आवृत्ती मध्ये लेमनचा रोल करावा अशी इच्छा निर्माण झाली. पण त्याची पत्नी गीता बाली हिने मात्र या चित्रपटाबद्दल आपले फारसे चांगले मत व्यक्त केले नाही. ती म्हणाली, ”भारतीय प्रेक्षकांच्या नजरेमध्ये हा सिनेमा थोडा जास्तच अश्लील आहे. त्यामुळे या सिनेमाच्या भानगडीत न पडलेले बरे!” नंतर शम्मी कपूर हा विषय विसरून गेला.
त्यानंतर १९७३ साली पुन्हा एकदा एफ सी मेहरा यांनी याच ‘इर्माला ड्यूस’चा हिंदी व्हर्शन करण्यासाठीचा ड्राफ्ट शम्मी कपूरसमोर ठेवला होता. शम्मी कपूर आता हा चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी तयार झाला. कारण या सिनेमातील नायकाची भूमिका त्याला आता शोभणारी नव्हती म्हणून त्याने संजीव कुमारला दिली. खरंतर यातील मुख्य नायिकेच्याच्या भूमिकेसाठी त्याला मुमताज हवी होती. मुमताज या भूमिकेसाठी परफेक्ट चॉईस होती. तिचा रसरशीत लचकदार कमनीय बांधा आणि लटके झटके या भूमिकेसाठी अगदी परफेक्ट होते.
पण मुमताज त्यावेळी मयूर वाधवानी सोबत लग्न करून चित्रपट संन्यास घेण्याचा विचारात होती. त्यामुळे तिने हा चित्रपट नाकारला. नंतर या भूमिकेसाठी झीनत अमानची निवड झाली आणि काय परफेक्ट भूमिका केली या चित्रपटामध्ये! या चित्रपटात शम्मी कपूरने (Shammi Kapoor) देखील एक भूमिका केली होती. एकूणच हा सिनेमा थोडासा भारतीय प्रेक्षकांसाठी हा एक बोल्ड कल्चरल शॉक होता.
या चित्रपटाला आर डी बर्मन यांचे जबरदस्त म्युझिक होते. चित्रपटातील चारही गाणी जबरदस्त होती. यातील म्युझिकमध्ये आर डी यांनी प्रचंड प्रयोग केले होते. ‘आया हु मै तुझको ले जाऊंगा अपने साथ तेरा हाथ थाम के, गोया के चुनां के, चोरी चोरी सोला सिंगार करूंगी ही गाणी त्यांचे ऑर्केस्ट्रेशन जबरा होते. हा चित्रपट खरंतर चालला देखील असता. पण शम्मी कपूरचे (Shammi Kapoor) दुर्दैव असेल की हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच काही महिने मूळ ‘इर्माला ड्यूस’ या इंग्रजी सिनेमावर घातलेली बंदी आपल्या देशात दहा वर्षानंतर उठवण्यात आली आणि हा इंग्रजी चित्रपट भारतभर प्रदर्शित झाला.
========
हे देखील वाचा : शशी कपूरचा पहिला सुपरहिट सिनेमा
========
आता मूळ इंग्रजी चित्रपट पाहायला मिळतो; म्हटल्यानंतर हा डुप्लिकेट सिनेमा कोण पाहणार? म्हणून या चित्रपटाला प्रेक्षकांनी अजिबात दाद दिली नाही. शम्मी कपूरचा (Shammi Kapoor) हा डायरेक्शनचा पहिला सिनेमा होता आणि खरोखरच त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शन अतिशय सुंदर केले होते. विशेषतः गाण्याचे चित्रीकरण करण्यासाठी त्याने विजय आनंद गोल्डी स्टाइल वापरली होती. या चित्रपटातील गाणी पाहताना तुम्हाला वारंवार ‘तिसरी मंजिल’ या चित्रपटातील गाणी पाहतो आहेत असा अनुभव येईल. शम्मी कपूरसाठी (Shammi Kapoor) हा चित्रपट खूप महत्त्वाचा होता. २००७ साली त्याने बीबीसीला एक मुलाखत दिली होती त्यात त्यांनी या सिनेमाच्या मेकिंगची ही गोष्ट सांगितली होती!