हसता हसता “बीवी नंबर वन”ला २५ वर्ष झाली देखिल…
काही काही दिग्दर्शकांनी “पब्लिकचे मनसोक्त मनमुराद मनोरंजन” करण्याचा जणू विडाच उचलला होता. पिक्चर म्हणजे फुल्ल एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट हेच त्यांचे बोधवाक्य त्यांना जमले की आपल्या पिक्चरच्या यशाच्या प्रगती पुस्तकात तब्बल नव्वद टक्के गुण मिळवले. (आपले सर्वच्या सर्व चित्रपट यशस्वी ठरलेत वा ठरतील असा शंभर टक्के दावा कोणीही फिल्मवाला करीत नाही. कारण पिक्चर हिट की फ्लाॅप याचा अंतिम निर्णय फक्त आणि फक्त पब्लिक घेतो याची त्यांना पुरेपूर कल्पना आहे). (David Dhawan)
सत्तर व ऐंशीच्या दशकात मनमोहन देसाई “फुल्ल एंटरटेनमेंट” देत, नव्वदच्या दशकात डेव्हिड धवनला (David Dhawan) त्यांचा वारसदार मानले गेले. ( योगायोग असा की मनमोहन देसाई यांनी आपल्या एम के डी फिल्म या बॅनरखालील ‘दीवाना मस्ताना‘ या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी डेव्हिड धवनला साईन केले. दुर्दैवाने पिक्चरचा मुहूर्त होण्यापूर्वीच मनजींचे खेतवाडीतील प्रताप निवास या आपल्या निवासस्थानातील गच्चीतून पडून अपघाती निधन झाले. ) अनिझ बज्मी, रोहित शेट्टी यांनाही मनजी आणि मग डेव्हिड धवनचे वारसदार मानले जाते. अर्थात, त्यांनी आपल्या ‘स्टोरीचा स्कोप’ जास्त लॅव्हिश व खर्चिक केला.
याच डेव्हिड धवन (David Dhawan) दिग्दर्शित “बीवी नंबर वन” ( मुंबईत रिलीज २८ मे १९९९) च्या प्रदर्शनास चक्क पंचवीस वर्ष पूर्ण झाली देखिल. हसता हसता पुरेवाट करीत करीतच इतकी वर्ष झाली हो. पहिल्यांदा आपण हा सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये खचाखच हाऊसफुल्ल गर्दीत तुफान हसत खेळत एन्जाॅय केला. मग चॅनेलवर पाहू लागलो. आता यू ट्यूबवर एन्जाॅय करतोय. असे धमाल पिक्चर कधीही कुठूनही पहावेत नि फ्रेश व्हावे. तणाव दूर करण्याचे काम असे मजेशीर चित्रपट करतात.
खरं तर हा कमल हसनची भूमिका असलेल्या आणि बालू महेंद्र दिग्दर्शित ‘साथी लीलावती‘ या मनोरंजन तमिळ भाषेतील चित्रपटाची रिमेक. निर्माता वासु भगनानी याने हिंदीत रिमेक करताना मल्टी स्टार कास्ट कलरफुल चित्रपट केला. थीम तशी अपेक्षित वळणे घेणारी पण त्यात रंजकता भरण्याचे डेव्हिड धवनचे कसब महत्वाचे. तसा तो राजा बाबू, साजन चले ससुराल, कुली नंबर वन, हीरो नंबर वन इत्यादी मसालेदार मनोरंजक चित्रपटाच्या यशाने एस्टॅब्लिश झालेला दिग्दर्शक.
गोविंदाची त्याची जोडी एकदम फिट्ट व हिट. गोविंदा सेटवर खूपच उशीरा येतो आणि लवकर पळतो या त्याच्या कार्यशैलीशी जुळवून घेत घेत डेव्हिड धवनने (David Dhawan) सातत्य कायम राखले हे विशेष. ‘बीवी नंबर वन’ देखिल गोविंदाचाच. पण तो इतका बिझी की सलमान खान यात आला. त्याची नायिका म्हणून जुही चावला, ऐश्वर्य राॅय, रविना टंडन यांच्या नावांचा विचार झाल्यावर मनिषा कोईराला आली. पण अचानक तिने नकार देताच करिश्मा कपूर आली.
डेव्हिड धवनची ती फेवरेट. एकेक कलाकार निश्चित करताना ‘अदलाबदल’ होतच असते. रंभा नाही म्हणाली म्हणून तब्बू, बाॅबी देओल, सुनील शेट्टी बिझी म्हणून सैफ अली खान. चित्रपट निर्मितीत हे अगदी स्वाभाविक असतेच. कोणासाठी थांबताच येत नाही. त्यात चित्रपट शूटिंगचे मोठे सत्र फ्लोरिडा, मिआमी येथे. उर्वरित चित्रीकरण मुंबई व दिल्लीत.
थीम थोडक्यात सांगायची तर, प्रेम ( सलमान खान) आपली पत्नी पूजा (करिश्मा कपूर) आणि दोन मुलांसह सुखाचा संसार करत असतानाच प्रेम आपल्या कार्यालयात नवीन भरती झालेल्या माॅडर्न रुपाली वालिया (सुश्मिता सेन)च्या रुपावर भाळतो, फिदा होतो आणि पारंपरिक, धार्मिक, गृहकृत्यदक्ष पत्नी पूजाला सोडून रुपालीसोबत राह्यचा निर्णय घेतो.आपला पती आपलाच व्हावा यासाठी पूजा डाॅ. लखन खुराना (अनिल कपूर) यांचे मार्गदर्शन व मदत घेऊन आपणही माॅडर्न बनते. त्यात ती यशस्वी ठरते आणि प्रेम परत तिच्याकडे येतो. रुपाली आता आपल्या पहिला बाॅयफ्रेन्ड दीपक शर्मा (सैफ अली खान)कडे जायचा निर्णय घेते पण तो आता लव्हलीचा ( तब्बू) झालेला असतो. या गोंधळात ज्या मजेशीर गोष्टी घडतात व रंगतात म्हणजे बीवी नंबर वन. म्हटलतं तर यात बघण्यासारखे काय काय होते? तर अतिशयोक्तीपूर्ण प्रसंग. त्यात गंमत येते.
=========
हे देखील वाचा : दिग्दर्शक महेश भट्टची सर्वोत्तम कलाकृती
=========
अन्नू मलिकच्या संगीताने अधिकच रंगत आणली. बीवी नंबर वन (पार्श्वगायक अभिजीत व सुषमा श्रेष्ठ), चुनरी चुनरी ( अभिजीत व अनुराधा श्रीराम), हाय हाय मिरची (अलका याज्ञिक व सुखविंदर सिंग), इश्क सोना है ( शंकर महादेवन व हेमा सरदेसाई) या लोकप्रिय गाण्यांच्या कॅसेट, सीडीची धडाक्यात विक्री झाली. सुपरहिट गाणी चित्रपटाची गर्दी कायमच वाढवतात. लोकप्रिय गाण्यामुळेच अनेक चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिले गेलेत. छायाचित्रणकार के. एस. प्रकाशराव, संकलक ए. मुथ्यु व तरुण कृपलानी यांनी आपली करामत दाखवून चित्रपट अधिकाधिक रंजक केला.
असे पिक्चर फुल्ल एंटरटेनमेंट वा टाईमपास करतात. ते पडद्यावर ठेवूनच थिएटरबाहेर पडायचे असते. डेव्हिड धवनच्या (David Dhawan) पिक्चर्सकडून तीच तर अपेक्षा होती. मग तो चित्रपट हिंदीतील एखाद्या चित्रपटाची रिमेक असो वा दक्षिण भारतीय प्रादेशिक भाषेतील चित्रपटाची रिमेक असो, तो मूळात संकलक असल्याने ( ‘सारांश’चा संकलक तोच होता) पटकथेवर भरपूर काम करायचा आणि मग शूटिंगचा फंडा….यशामागे अशा अनेक गोष्टी असतात. बीवी नंबर वन म्हणून यशस्वी ठरला.