‘बॉबी’ चित्रपटाला संगीत द्यायला संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी का नकार दिला होता?
आर के फिल्म या चित्र संस्थेचा ‘बॉबी’ हा चित्रपट १९७३ साली प्रदर्शित झाला. हा चित्रपट अनेक अर्थाने बॉलिवूडचा चेहरा मेहरा बदलवणारा ठरला. या सिनेमाला संगीत संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल (laxmikant pyarelal) यांनी दिले होते. आर के फिल्म्समधील हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. राज कपूरच्या चित्रपटांना संगीत देता यावं ही प्रत्येक संगीतकाराची मनापासून इच्छा असायची. त्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न देखील चालू असायचा. पण जेव्हा ‘बॉबी’ या चित्रपटाचे संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना देण्याचा निर्णय झाला; तेव्हा या संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीने सुरुवातीला नम्र नकार दिला होता. त्यांच्या या नकाराचे राजकपूरला देखील खूप आश्चर्य वाटले होते. जिथे प्रत्येक संगीतकाराची आर के फिल्म्सला म्युझिक देता यावे यासाठी होड असायची त्या वेळी चक्क नकार? का संगीत द्यायला तयार नव्हते लक्ष्मीकांत प्यारेलाल? काय होतं नक्की कारण होते?
१९७२ साली संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल (laxmikant pyarelal) एका ट्रायल शो साठी गेले होते. मध्यंतरामध्ये त्यांना गायक मुकेश भेटले. मुकेश अतिशय आनंदी होते. ते म्हणाले, ”मी तुम्हाला एक खुशखबरी देणार आहे.” एल पी म्हणाले, ”काय?” मुकेश म्हणाले,” राज कपूर एक नवीन चित्रपट तयार करत आहेत आणि या चित्रपटाला तुम्ही संगीत देणार आहात!!” लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल या दोघांना हा एक सुखद धक्का तर होताच पण दोघांच्या तोंडातून एकदम एक शब्द बाहेर आला, ”नाही. नाही. नको. नकोच.” मुकेश यांना खूप आश्चर्य वाटले. ते म्हणाले, ”का?” त्यावर लक्ष्मीकांत म्हणाले “गेल्या वर्षीच संगीतकार जयकिशन यांचे अकाली निधन झाले आहे. संगीतकार शंकर आता एकटे पडलेले आहेत.
१९४९ पासून संगीतकार शंकर जयकिशन आणि आर के फिल्म यांचे खूप मोठे असोसिएशन आहे. ते आर केचे अविभाज्य घटक आहेत. आज जय किशन नाहीत. त्यामुळे राज कपूर संगीतकार बदलत आहेत. पण आम्हाला या सिच्युएशनचा फायदा घ्यावा वाटत नाही. कारण आर के आणि शंकर जयकिशन हे समीकरण इतकं घट्ट आहे की ते कोणीच तोडू शकत नाही. आम्ही देखील सुरुवातीला इथे आल्यानंतर काही काळ शंकर जयकिशन यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम केले आहे. आज शंकर एकटे पडले आहेत. त्यांना डावलून राजकपूर यांच्या चित्रपटाला आम्ही संगीत देणे आम्हाला प्रशस्त वाटत नाही.” गायक मुकेश यांनी राज कपूर यांना जेव्हा एल पीचा हा निर्णय कळवला तेव्हा त्यांना देखील खूप वाईट वाटले. त्यांनी मुकेशच्या पुन्हा एकदा भेटायला सांगितले
मुकेश पुन्हा संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल (laxmikant pyarelal) यांना भेटले आणि म्हणाले, ”हे पहा राज कपूरचे दोन चित्रपट लागोपाठ फ्लॉप झाले आहेत. ‘मेरा नाम जोकर’ आणि ‘कल आज और कल’. आर के चित्रपट संस्था आता आर्थिक विवंचनेत आली आहे. आता या बॅनरकडून पूर्णतः नवीन स्टाईलने चित्रपट काढायचे राज कपूर ठरवले आहे. त्यामुळे सर्वच गोष्टी आता बदलल्या जाणार आहेत. चित्रपट तर नक्कीच बनणार आहे. राजकपूर यांच्यासाठी संगीतकार म्हणून तीन पर्याय आहेत. पहिला पर्याय तुम्ही आहात दुसरा पर्याय कल्याणजी आहे आणि तिसरा राहुल देव बर्मन आहेत. आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि राज कपूरने शंकर जयकिशन यांच्यातील शंकरकडे दुर्लक्ष केले आहे असे अजिबात समजू नका.
=======
हे देखील वाचा : दिल चाहता है: ऋतिक रोशन आऊट आमीर खान इन!
========
शंकर हे आर के कॅम्पसचे अविभाज्य घटक आहेत आणि राहतील. ‘बॉबी’ हा चित्रपट आजच्या तरुणाईला समोर ठेवून काढणार आहे. त्यामुळे त्यात सर्वच पातळीवर बदल होणार आहेत.” मुकेश यांचे हे शब्द ऐकल्यानंतर संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी विचार केला आणि चित्रपटाला संगीत द्यायचा निर्णय घेतला. लक्ष्मीकांत प्यारेलाल (laxmikant pyarelal) यांचे देखील असोसिएशन आर के फिल्मसोबत पुढे कायम राहिले. १९७७ साली आलेल्या ‘सत्यम शिवम सुंदरम’ आणि १९८२ साली आलेल्या ‘प्रेम रोग’ या चित्रपटाला त्यांचे संगीत होते. १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम ग्रंथ’ या चित्रपटाला देखील त्यांनीच स्वरबद्ध केले होते.