‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘या’ अभिनेत्याने साकारली होती रेपिस्ट ‘बलात्कारी’ भूमिका!
भारतीय सिनेमाच्या इतिहासात दिलीप कुमार यांच्या नावाची चर्चा आज देखील प्रामुख्याने चित्रपट रसिकांमध्ये होत असते. ५५ वर्षाच्या कला जीवनात केवळ ६४ भूमिका करणाऱ्या दिलीप कुमारने हरेक भूमिकेमध्ये एक वेगळा रंग भरला होता. त्यांनी ट्रॅजिक, कॉमेडी, ॲक्शन, इमोशन सर्व प्रकारचे चित्रपट केले. एका चित्रपटात त्यांनी निगेटिव्ह शेडची भूमिका केली होती. इतकी की त्यांना चक्क रेपिस्ट बलात्कारी दाखवले होते. खरंतर अशा प्रकारच्या भूमिका करणं म्हणजे करिअरमध्ये मोठा अडथळा असू शकतो. पण ही रिस्क स्वीकारून दिलीप कुमारने ही भूमिका केली होती. (Amar movie)
अर्थात या भूमिकेला प्रेक्षकांनी मात्र अजिबात स्वीकारले नाही. चित्रपट सुपरफ्लॉप झाला. पण आज इतक्या वर्षानंतर आपण जेव्हा हा चित्रपट पाहतो; त्यावेळी दिग्दर्शक आणि अभिनेत्यांच्या अभिनय शैलीने आणि यातील थॉट प्रोसेसने आपण प्रभावित होतो. कुठलीही व्यक्ती ही शंभर टक्के प्रामाणिक नसते, नीतीमान नसते. ती माणूस असते. तिच्यात अनेक कमजोरी असतात. तिच्यातही उणीवा असतात आणि अशा या नाजूक क्षणी कधी कधी ही व्यक्ती ढासळूही शकते. हे यातून त्यांना दाखवायचं होतं. अर्थात त्या काळातल्या प्रेक्षकांना सिनेमातील हा विचार अजिबात पटला नाही आणि सिनेमा ग्रेट डिझास्टर झाला. कोणता होता हा चित्रपट? आणि काय होता नेमका किस्सा ?
दिग्दर्शक मेहबूब यांनी १९५४ साली दिलीप कुमार, मधुबाला आणि निम्मी यांना घेऊन एक चित्रपट बनवला होता ‘अमर’ (Amar movie). या चित्रपटात दिलीप कुमारने अमरनाथ नावाच्या एका वकिलाची भूमिका केली होती. अमरचे लग्न अंजू (मधुबाला) सोबत ठरलेले असते. अंजू पुरोगामी विचारांची विदेशात शिकून आलेली मुलगी असते आणि सामाजिक कार्यात तिला रस असतो. याच गावात सोनिया (निम्मी) नावाची एक गरीब मुलगी राहत असते. तिचे वडील अपंग असतात गावातील गुंड संकट (जयंत) सोनियाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेवून तिला त्रास देत असतो. त्याची तिच्यावर वाईट नजत असते.
एकदा सोनिया आणि अमरची भेट होती आणि पहिल्या भेटीतच सोनिया अमरला आपलं हृदय देऊन बसते पण ती आपलं प्रेम कधीच व्यक्त करत नाही. गुंड संकट सोनियावर दिवसेंदिवस दबाव आणत असतो या दबावाला कंटाळून एक दिवस ती घरातून बाहेर पडते. परंतु त्या रात्री मोठे वादळ आणि पाऊस होतो आणि या वादळात ती नकळतपणे अमरच्या बंगलात घुसते. पावसात नखशिखांत भिजलेल्या सोनियाला पाहून अमरचा ताबा सुटतो आणि एका बेसावध क्षणी तो तिच्यावर चक्क बलात्कार करतो. अमरच्या या कृतीने सोनियादेखील पूर्णपणे हादरून जाते. पुढे यातून सोनिया गर्भवती राहते.
आपल्याकडून अनवधानाने झालेल्या चुकीचे गिल्ट अमरला दिवस-रात्र छळत असते तो आपल्या होणाऱ्या पत्नी अंजूला हे सांगू इच्छित असतो पण त्याची हिंमत होत नाही. सोनिया लग्नाच्या आधीच गर्भवती होते हे गावात सर्वाना कळते आणि तिला गावकऱ्यांच्या टीकेला बळी पडावे लागते. संकट मात्र हे सर्व अचंबित होवून पाहत असतो. तो खात्री करतो की सोनियाला गर्भवती करणारा कोण आहे जेव्हा त्याला कळते हे कृत्य अमरने केले आहे तो त्याला मारायला धावतो. नेमक्या त्याच वेळी नेमके सोनिया तिथे येते.
अमर आणि संकट यांच्यात हातापायी होते आणि त्यात हातातील चाकू स्वतःलाच लागल्यामुळे संकट मरतो. अमर तिथून निघून जातो पण सोनिया तिथे थांबते. लोकांना वाटते सोनियानेच संकटचा खून केला. पोलीस तिला पकडून घेऊन जातात. केस उभी राहते. सोनियाच्या बाजूने अमर कोर्टात उभा राहतो आणि तो तिला सही सलामत यातून सोडवतो. परंतु त्याच्या असे लक्षात येते त्याने या केसमधून सोडवलेले असले तरी या सर्व कृत्याचा गुन्हेगार तो स्वतःच आहे. कारण गावात तिची गरोदरपणामुळे प्रचंड बेअब्रू झालेली असते. शेवटी जज समोर अमर (Amar movie) आपल्या गुन्ह्याची जाहीर कबुली देतो आणि सोनियाला आपलंस करतो. अंजू त्यांच्या मार्गातून स्वत:हून बाजूला जाते!
==========
हे देखील वाचा : दिलीप कुमार आणि सायरा बानू यांची भन्नाट लव्ह स्टोरी!
==========
काळाच्या मानाने हा विषय खूप धीट आणि पुढचा होता. माणूस कितीतरी मोठा असला तरी तो देव नसतो. त्याच्याकडून चुका होऊ शकतात. हेच यातून दिग्दर्शकाला दाखवायचं होतं. पण लोकांना दिलीप कुमारची बलात्कारी रेपिस्टची भूमिका अजिबात आवडली नाही. सिनेमा पहिल्या आठवड्यातच सुपरफ्लॉप झाला. आज ‘अमर’ (Amar movie) आपल्याला आठवतो तो केवळ त्यातील सुंदर गाण्यांमुळे.
लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातील गाणी खरोखरच लाजवाब होती. गाणी शकील बदायुनी यांनी लिहिली होती तर संगीत नौशादनी यांचे होते. इन्साफ का मंदीर है ये भगवान का घर है (रफी) ,जाने वाले से मुलाकात ना होने पायी (लता) न मिलता गम तो बरबादी के अफसाने कहा जाते (लता) न शिकवा है न कोई गिला है (लता) तेरे सदके बलम करे कोई गम (लता) खामोश ही खेवनहार (लता) आज अमर प्रदर्शित होऊन सत्तर वर्ष होत आहेत. दिग्दर्शक महबूब काळाच्या किती पुढचे चित्रपट काढत होते हे यातून आपल्या लक्षात येईल!