लता– मदनमोहन: भावा बहिणीच्या निरागस प्रेमाची सुरीली गाथा!
संगीतकार मदन मोहन आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यामध्ये भावा बहिणीचं नातं होतं. लता मंगेशकर आपल्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा उल्लेख मदन भैया असाच करत असे. संगीतकार मदन मोहन यांनी १९५१ ते १९७५ या पंचवीस वर्षाच्या काळाच्या कालखंडत अनेक चित्रपटांना संगीत दिले परंतु त्यांच्या कोणत्याही गाण्याला फिल्मफेअर पुरस्कार (Award) मिळाला नाही हे शल्य त्यांच्या मनी कायम टोचत होते. १९७० साली त्यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘दस्तक’ या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळाले होते. पण फिल्मफेअर अवार्डपासून मदन मोहन त्यांच्या हयातीत वंचितच राहिले. याबाबतचा एक भावस्पर्शी किस्सा मदन मोहन यांनी रेडिओवरील एका कार्यक्रमात सांगितला होता.
मदन मोहन यांना पुरस्कार जरी मिळाला नसला तरी त्यांना फिल्म फेअर नामांकन तीन वेळेला मिळाले होते. सुरुवातीला १९६२ सालच्या ‘अनपढ’ या चित्रपटासाठी या चित्रपटात लताची अप्रतिम पाच सोलो गाणी होती. ‘आपकी नजरोने समझा प्यार के काबिल मुझे’, ‘वो देखो जला घर किसी का’,’ जिया ले गये हो मेरा सावरिया’, ‘है इसीमे प्यार की आबरू वो जफा करे मै वफा करू’ आणि ‘अब रंगबिरंगी राखी लेके आयी ’ मदन मोहन यांना खूप अपेक्षा होती पण अवॉर्ड मात्र संगीतकार शंकर जयकिशन यांना ‘प्रोफेसर’ या चित्रपटासाठी मिळाले.
त्यानंतर १९६४ साली ‘वह कौन थी’ या चित्रपटासाठी त्यांना नामांकन मिळाले. या चित्रपटात लताची तीन अप्रतिम सोलो गाणी होती. ‘लग जा गले के फिर ये हंसी रात हो न हो’, ‘नयना बरसे रिमझिम रिमझिम’ आणि ‘जो हमने दास्ता अपने सुनाई आप क्यू रोये’ एवढी सुंदर गाणी आणि संगीत असताना देखील अवॉर्ड (Award) मात्र संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना ‘दोस्ती’ या चित्रपटासाठी मिळाले. त्यानंतर अकरा वर्षांनी १९७५ साली ‘मौसम’ या चित्रपटासाठी त्यांना नामांकन मिळाले या चित्रपटात ‘रुके रुके से कदम’, ‘दिल ढूंढता फिर वही फुरसत के रात दिन’ आणि ‘छडी रे छडी कैसे गले मी पडी’ हि गाणी होती. पण पुरस्कार मात्र संगीतकार खय्याम यांना ‘कभी कभी’ या चित्रपटासाठी मिळाला .
१९६४ साली ‘वह कौन थी?’ या चित्रपटाला पुरस्कार मिळेल अशी खूप अपेक्षा सर्वांनाच होती पण पुरस्कार मिळाला नाही. मदन मोहन इतकेच दुःख त्यांची बहीण लता मंगेशकर यांना देखील झाले. त्या दिवशी संध्याकाळी लता मंगेशकर यांनी मदन मोहनला फोन करून त्यांचे सांत्वन केले आणि त्यांनी सांगितले, ”मदन भैया खरंतर तुम्हाला ‘वह कौन थी?’ या चित्रपटासाठी फिल्मफेअर अवॉर्ड (Award) मिळाला पाहिजे होता पण नाही मिळाला. ‘लग जा गले‘, ’नयना बरसे रिमझिम रिमझिम’ अशी अप्रतिम गाणी असताना देखील पारितोषिक नाही मिळाले याचे मला देखील खूप वाईट वाटेले. पण अवार्ड मिळालं नाही म्हणून गाण्याचं महत्त्व कमी होत नाही. त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका. हि गाणी पुढची १०० वर्षे रसिकांच्या लक्षात राहतील असे अजोड काम तुम्ही केले आहे! आयुष्यात असे प्रसंग येतच असतात.”
=========
हे देखील वाचा : जेव्हा ऋषी कपूरच्या सांगण्यावरून अमिताभला सिनेमातून काढून टाकले!
=========
लता मंगेशकरच्या सांत्वन वर संदेशानंतर मदन मोहन लताला म्हणाले, ”माझ्यासाठी तुमच्या मनाला दुःख झाले. माझ्या करीता तुमच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. मला वाटतं याच्यापेक्षा दुसरं कुठलं मोठ अवार्ड नसेल. आज मला जगातील सर्वोत्तम गायिकेकडून माझ्या म्युझिकचे कौतुक झाले आहे. भले त्याला अवॉर्डची (Award) मोहर लागली नसली तरी हे अवार्ड न मिळाल्याचं माझ्या इतके दुःख तुम्हाला देखील झाले आहे. मला वाटतं यापेक्षा मला दुसरे कुठले अवार्ड नकोय. दीदी तुमचे प्रेम सदैव माझ्यासोबत असेच राहू द्या.” लता मंगेशकर आणि मदन मोहन यांच्यातील नाते इतकाच गोडवा त्यांच्या गाण्यात देखील उतरलेला आहे!