Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

तडप तडप के इस दिल की आह निकलती रही ….
आजच्या तरुण पिढीचा लाडका गायक म्हणजे केके (KK). अगदी कमी काळात त्याने तरुणाईच्या हृदयात घर केले. त्याच्या अकाली मृत्यूने प्रत्येक जण हळहळला. त्याच्या आवाजामध्ये एक कशिश होती. एक आर्तता होती. जी श्रोत्यांच्या काळजाला भिडत असे. केकेला पहिले लोकप्रिय गीत गायला मिळाले १९९९ साली. चित्रपट होता संजय लीला भन्साली यांचा ‘हम दिल दे चुके सनम’. इस्माईल दरबार यांनी संगीत दिलेले हे गाणं होतं ‘तडप तडप के इस दिल की आह निकलती रही मुझको सजा दी प्यार ने ऐसा क्या गुन्हा किया के लुट गये हम लुट गये…’ या गाण्यातील वेदना केकेने आपल्या स्वरातून इतकी अप्रतिमरीत्या मांडली होती की या गाण्याने अक्षरशः इतिहास घडवला.

केकेच (KK) हे पहिलंच गाजलेलं गाणं होतं. ते त्याला कसं मिळालं? याची एक भन्नाट स्टोरी आहे. मुळात केके पूर्वी दिल्लीला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गाणी गात असायचा. एकदा त्याचा आवाज गायक हरिहरन यांनी ऐकला आणि ते त्याला जाऊन भेटले आणि म्हणाले, ”तू इथे काय करतोयस? तुझी खरी जागा मुंबईला आहे!” त्या रात्री केकेने ठरवले की खरोखरच आपल्या स्वराचे चीज व्हायचं असेल तर आपल्याला महानगरी गाठली पाहिजे. नंतर तो मुंबईत दाखल झाला. तिथे तो हरिहरन यांना भेटला.
हरिहरन यांनी त्याची भेट लेस्ली यांच्यासोबत करून दिली. केके यांनी लेस्लीकडे भरपूर जिंगल्स गायल्या. १९९४ ते १९९८ या चार वर्षाच्या काळात त्याने तीन हजारहून अधिक जिंगल्स गायल्या. १९९८ साली केके यांच्या आयुष्यात दोन सुखद मोड आले. याच वर्षी सोनी म्युझिक भारतामध्ये लॉन्च होणार होते. यासाठी त्यांना एक तरुण पिढीला आवडेल असा स्वर हवा होता.

सोनी म्युझिक करीताचे हे काम लेस्ली यांच्याकडेच होते. त्यांनी केकेचा (KK) आवाज सोनी म्युझिकच्या टीमला ऐकवला. त्यांना तो आवाज आवडला आणि यातूनच निर्मिती झाली केके यांच्या पहिल्या म्युझिक अल्बमची. या अल्बमचं नाव होतं ‘पल’. सोनी म्युझिकचा पहिला डेब्यू आर्टिस्ट म्हणून केकेचं नाव सर्वदूर झालं; तरी पण केकेला सिनेमात गायचं होतं. विशाल भारद्वाज यांच्यासोबत त्याची मैत्री होतीच. गुलजार यांच्या ‘माचिस’ या चित्रपटातील एका गाण्यात त्याने काही ओळी गायल्या होत्या. गाण्याचे बोल होते ‘चप्पा चप्पा चरखा चले’.

याच काळात संजय लीला भन्साळी ‘हम दिल दे चुके’ हा चित्रपट बनवत होते. या चित्रपटाला संगीत होतं इस्माईल दरबार यांचे होते . या चित्रपटाची गाणी मेहबूब यांनी लिहिली होती. मेहबूब यांनी केके (KK) चा स्वर ऐकला होता. एकदा संगीतकार ए आर रहमान मेहबूब यांना म्हणाले होते, ”केके या काळात देखील किती भावस्पर्शी आणि जीव ओतून गाणी गात असतो!” संगीतकार ए आर रहमान यांचे केकेबद्दलचे मत मेहबूब यांना देखील पटले होते. त्यांनी केकेच्या नावाची शिफारस संजय लीला भन्साळी यांच्याकडे केली आणि अशा प्रकारे या चित्रपटातील ‘तडप तडप के इस दिल की आह निकलती रहे…’ हे गाणं केके यांच्याकडे आलं आणि ते त्यांचं खऱ्या अर्थाने सिग्नेचर सॉंग बनलं.
========
हे देखील वाचा : यांचं गाणं ऐकून लता मंगेशकर झाल्या भावुक…
========
केकेची गायकीची गाडी इथून सुसाट धावू लागली. त्या काळात केके यांनी एका मुलाखतीत असं सांगितलं होतं की, “तडप तडपच्या लोकप्रियनंतर प्रत्येक संगीतकार त्यांना फोन करून सांगत असे. आप आईये ‘तडप तडप के जैसा ही गाना है!” त्यावर केके (KK) म्हणायचा, ”जर तसं असेल तर मी येणार नाही. कारण मला टाईपड सिंगर व्हायचं नाही. मला व्हर्सेटाईल सिंगर व्हायचे आहे.” केकेच्या गाण्यातील विविधता पहा ‘दस बहाने करकेले गये दिल’, आंखो मे तेरी अजब सी अजब सी, कोई कहे कहता रहे, सच कह रहा है दिवाना, आवारापन बंजारापन , इटस द टाईम टू डिस्को, ओ हमदम सोनिया रे…