सिर्फ तुम… सुश्मिता सेनच्या आकर्षक नृत्य सौंदर्याची पंचवीशी
गीत संगीत व नृत्य आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीचे सर्वाधिक वेगळेपण आणि वैशिष्ट्य, ते ही इतके आणि असे काही चित्रपटात आठवण्यासारखं अन्य काही नव्हतेच. फक्त आणि फक्त एक फक्कडबाज, आकर्षक, दिलखुलास आणि संपूर्ण पडद्याभरचे नृत्य सौंदर्य होते…
बोनी कपूर निर्मित व सुरींदर कपूर प्रेझेंटस “सिर्फ तुम” (Sirf tum) ( मुंबईत रिलीज ११ जून १९९९. पंचवीस वर्ष पूर्ण) चित्रपट त्याच “चाली”चा. सुश्मिता सेनने अतिशय उत्फूर्तपणे साकारलेल्या “दिलबर दिलबर” या नृत्य गीताने या चित्रपटात जान आणली. सुश्मिता सेन, चित्रपटसृष्टी आणि गाॅसिप्स मॅगझिनची सुशने १९९५ साली जगत सुंदरीचा मुकुट पटकावला आणि ती सौंदर्यवती म्हणून ओळखली गेली. ऐश्वर्या राॅयनेही तिच्याच बरोबरीने “विश्व सुंदरी”चा किताब पटकावला आणि सौंदर्य प्रसाधनांचे मार्केट एकदम जोरात चालू लागले.
शहरात ‘माॅल’ संस्कृतीची पायाभरणी होण्यापूर्वीचे ते दिवस. सुश आणि ऐश्वर्या अभिनयाच्या मेहनती दुनियेत आल्या तेव्हा “त्या माॅडेल म्हणूनच बर्या, फाडफाड इंग्लिश बोलणार्या या दोघींना हिंदीत बोलता येईल का” अशी उगाच शंका व्यक्त होत होती. अमक्याला यातलं जमेल का, तमक्याला हे येईल का अशी शंका काढणारे रिकामटेकडे मनोरंजन क्षेत्रातही आहेत. या दोघींनी अभिनेत्री म्हणूनही आपली ओळख निर्माण करण्यात यश प्राप्त केले यासाठी वेगळे पुरावे द्यायला नकोतच.
सुश्मिता सेनने एक चित्रपट प्रदर्शित होतोय तोच आणखीन दोन चित्रपट साईन करा असं या क्षेत्राला वाहून घेतले नाही. आपलं माॅडेलिंग, आपली जगभरातील भटकंती, जगभरातील साहित्याचे वाचन, आपला फिटनेस याला जास्त प्राधान्य देत देत चित्रपटात भूमिका साकारल्या. तिची उंची आणि तिचा फॅशन ड्रेस सेन्स हे कायमच “फोकस”मध्ये राहिले.
अशातच एका दुपारी सुश्मिता सेनने आपल्या वांद्र्यातील प्रशस्त घरी मुंबईतील आम्हा काही निवडक सिनेपत्रकारांसाठी टी पार्टीचे आयोजन केले होते. सुखद योग आला हो. ड्युप्लेक्स फ्लॅट. आणि तिच्या हाॅलच्या रचनेत तिच्या स्टाईलीश आवडीचा प्रत्यय आला. उंची परंतु मोजकेच स्टाईलीश फर्निचर, जगत सुंदरीचा मुकुट जिंकल्याच्या क्षणाचा भला मोठा फोटो आणि स्वत:च्या दिलखुलास पर्सनॅलिटीचा प्रत्यय देणारा फोटो या सगळ्याचे वर्णन करण्यातच मी रमलो. औपचारिक भेट असल्याने उगाच प्रश्नोत्तरे नाहीत. (आणि अशाच भेटी आठवणीत राहतात.)
“सिर्फ तुम”(Sirf tum) मधील तिचं दिलबर दिलबर नृत्य पाहण्यासाठी अनेकांनी पुन्हा पुन्हा सिंगल स्क्रीन थिएटरची वारी केली. दक्षिणेकडील दिग्दर्शक अगाथियन याने आपल्याच एका तमिळ भाषेतील चित्रपटाची ही हिंदीत रिमेक केली. संजय कपूर, प्रिया गिल (तिच्या व्यक्तिमत्वात गोडवा होता, अभिनयात समज होती, स्पर्धेत मागे पडली), मोहनिश बहेल, कादर खान, शुभा खोटे, जाॅनी लिव्हर (त्या काळात हा जवळपास प्रत्येक चित्रपटात असे), तेज सप्रू, शगुफा अली, तसेच जॅकी श्राॅफ व विशेष भूमिकेत सलमान खान “प्रेम”च्या भूमिकेत.
========
हे देखील वाचा : ‘सारा शहर मुझे लायन के नाम से जानता है……’
========
दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपटांतून प्रेमापासून काॅमेडीपर्यंत सगळेच असते तेच या ‘साऊथ इंडियन थाळी’त ! समीरच्या गीतांना नदीम श्रवणचे संगीत. पहली पहली बार मोहब्बत की है ( पार्श्वगायक अलका याज्ञिक व कुमार शानू), पंछी सूर मे गाते है (उदीत नारायण), सिर्फ तुम (अनुराधा पौडवाल), दिलबर दिलबर (अलका याज्ञिक), कभी तो कुडी फस जाऐगी (गुरुदास मान याने हे गाणे गायले आणि पडद्यावरही त्यानेच साकारले) ही सगळीच गाणी लोकप्रिय. दिलबर तर झीवरील फिलिप्स टाॅप टेनमध्येही टाॅपवर. आता मनोरंजन उपग्रह वाहिनीवरील चित्रपट गीतांचे शोजमध्ये गाण्याला स्थान मिळणे म्हणजेच ते गाणे लोकप्रिय असे हे दिवस होते आणि त्यात ‘दिलबर दिलबर’ टाॅपवर आणि सुश्मिता सेन फोकसमध्ये… पंचवीस वर्ष झाली देखिल हो.