पती व पत्नी संबंधावरील “आविष्कार”ची पन्नाशी वैशिष्ट्यपूर्ण
पती व पत्नी यांच्या नातेसंबंधांवर लेख, कथा, कादंबरी, नाटक, चित्रपट, मालिका, वेबसिरिज अशा सगळ्याच माध्यमातून अनेक वर्ष सतत पाहिले जातेय. कधी त्यात ‘वो’ देखील येतो, असतो. म्हणजे पतीची मैत्रिण वा पत्नीचा मित्र. कधी विवाहबाह्य संबंध तर कधी काॅन्ट्रॅक्ट मॅरेज अशी उपकथानके. त्यातच घटस्फोट, दुसरं लग्न असे आणखीन काही प्रकार.
दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांची पती व पत्नी यांच्या नातेसंबंधांवरील “चित्रपट त्रयी” (ट्रायोलाॅजी) यात विशेष उल्लेखनीय. अमर आणि मानसी हे त्यांच्या या “चित्रपट त्रयीतील” पती व पत्नी. ‘अनुभव‘ (१९७१) या चित्रपटात अमर (संजीवकुमार), मानसी (तनुजा) हे पती पत्नी आणि तिचा मित्र शशी भूषण (दिनेश ठाकूर). ‘आविष्कार‘ (मुंबईत रिलीज १४ जून १९७४) या चित्रपटात अमर (राजेश खन्ना), मानसी (शर्मिला टागोर) हे पती पत्नी व अमरची कार्यालयातील मैत्रिण रिहा (मिन्ना जोहर), मानसीचा परिचित सुनील (देवेंद्र खंडेलवाल) यांच्याभोवती कथाआशय. ‘गृहप्रवेश‘ (१९७९) मध्ये अमर (संजीवकुमार) व मानसी (शर्मिला टागोर) हे पती पत्नी आणि अमरची मैत्रिण सपना (सारीका) यांच्याभोवती कथाआशय. (Rajesh Khanna)
‘आविष्कार’च्या मुंबईतील प्रदर्शनास पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत हे विशेष. या चित्रपटाची बासू भट्टाचार्य यांनी पूर्वतयारी सुरु केली तेव्हा मानसीच्या भूमिकेसाठी शर्मिला टागोरला घ्यावे असे थीमनुसार निश्चित केले आणि त्यानुसार ते “दाग”(१९७३) च्या सेटवर शर्मिला टागोरला भेटायला गेले. तेव्हा त्यांनी अमरच्या भूमिकेसाठी राजेश खन्ना (Rajesh Khanna) योग्य ठरेल असे म्हणताच शर्मिला टागोरने त्यांना म्हटलं, तो तर याच सेटवर आहे. त्यानुसार ते राजेश खन्नाला भेटले. त्याने अतिशय आवडीने हा चित्रपट साईन केला आणि आपल्या अतिशय बिझी शेड्युलमधून (त्याची डायरी वर्ष दीड वर्ष फुल्ल आहे, सगळ्याच तारखा दिल्या गेल्यात हे त्या काळातील हुकमी वाक्य. सुपर स्टार होता हो तो). राजेश खन्नाने या चित्रपटाला जास्त महत्व दिल्याचे चित्रपटसृष्टीत अनेकांच्या लक्षात आले आणि आश्चर्यही वाटले.
त्याच वेळेस राजेश खन्ना आपले मित्र निर्माता व दिग्दर्शक शक्ती सामंता यांच्या ‘अजनबी’, मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘रोटी’, जे. ओम प्रकाश दिग्दर्शित ‘आप की कसम’ या चित्रपटातही काम करत होता. शक्ती सामंता असेच एके दिवशी राजेश खन्नाला भेटण्यासाठी “आविष्कार”च्या सेटवर गेले, तेव्हा तो नेहमीपेक्षा जास्त प्रसन्न मूडमध्ये दिसला. यावर तो म्हणाला, नेहमीच्या रोमॅन्टीक भूमिका, मसालेदार मनोरंजन यापेक्षा काही वेगळे करावे म्हणून मी या चित्रपटात काम करतोय. मला काही बदल हवाय आणि तोच मला हा चित्रपट देतोय. राजेश खन्नामधील “कलावंता”ची गरज शक्ती सामंता यांनी जाणली आणि त्यांची ही भेट त्या काळात चित्रपट मिडियात खूप चर्चेत होती.
“आविष्कार”मध्ये पती व पत्नीत विनाकारण तणाव आहे. अमर एका जाहिरात एजन्सीत काम करतोय आणि नवीनच नोकरीला आलेल्या रिटाच्या सहवासात तो सुखावलाय. पण त्यात कसलाही हेतू नाही. मानसीने रिटासारखं असावे ही त्याची अपेक्षा. त्याला उगाच वाटत असते की मानसी व सुनीलमध्ये काही विशेष नाते निर्माण झालेय. या सगळ्यातून अमर व मानसीत अंतर निर्माण झालेय, तणाव आहे. आपल्या लग्नाचा वाढदिवसही ते या सगळ्यात साजरा करतात. एके दिवशी दूधवाला आला म्हणून मानसी दरवाजा उघडते तेव्हा तिला दरवाजाबाहेर अतिशय छानसा पुष्पगुच्छ दिसतो. अमरने तो ठेवून आपल्या नात्यातील तणाव कमी करण्याचा त्याचा हेतू असतो…
राजेश खन्नासाठी (Rajesh Khanna) ही अगदी वेगळीच भूमिका होती. एका दृश्यात तो व मानसी आपल्यात अंतर राखून बेडवर पडलेत. अमर सिगारेटच्या धुराच्या धुक्यातून शून्य नजरेने पाहतोय… या दृश्याचे तात्कालिक समिक्षकांनी विशेष कौतुक केले. गंभीर मुद्रेतील राजेश खन्ना हे विशेष होते. राजेश खन्नाने आपल्या कारकिर्दीत असित सेन दिग्दर्शित ‘खामोशी’ व ‘सफर’, शक्ती सामंता दिग्दर्शित ‘अमर प्रेम’, यश चोप्रा दिग्दर्शित ‘इत्तेफाक’, ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’ व ‘बावर्ची’ आणि बासू भट्टाचार्य दिग्दर्शित ‘आविष्कार’ या चित्रपटात ‘नाॅन ग्लॅमरस’ अशा वेगळ्या भूमिका साकारत आपल्यातील कसदार, अष्टपैलू अभिनेत्याचा प्रत्यय दिला.
“आविष्कार”साठी त्याने आपल्या नेहमीच्या मार्केट प्राईजपेक्षा कमी पैशात काम केल्याचेही खूप गाजले. (एका अर्थपूर्ण भूमिकेसाठी त्याने तसे केले हो. त्यात त्याचे अभिनयावरचे प्रेम दिसते. ) “आविष्कार”ची गीते कपिल कुमार व ज्ञानदेव अग्निहोत्री यांची तर संगीत कनू राॅय यांचे. हंसने की चाह ने कितना मुझे (पार्श्वगायक मन्ना डे), बाबुल मोरा नैहर छुटो ही जाए हे पारंपरिक गीत (जगजितसिंह व चित्रा सिंह), नैना है प्यासे मेरे (आशा भोसले), माॅ को पुकार के पुछे बचे ने (मन्ना डे) यांच्यासह राजेश खन्नाने (Rajesh Khanna) गद्यात सादर केलेले महाशून्य के महान विस्तार मे याचा समावेश आहे. या चित्रपटाचे संवाद ज्ञानदेव अग्निहोत्री यांचे, छायाचित्रण नंदो भट्टाचार्य यांचे तर संकलन एस. के. चक्रवर्ती यांचे.
=========
हे देखील वाचा : काय तर म्हणे, सैफ व कुणाल कपूरचा “ज्वेल थीफ”
=========
राजेश खन्ना (Rajesh Khanna) व शर्मिला टागोर ही त्या काळातील रसिकप्रिय जोडी. शक्ती सामंता दिग्दर्शित “आराधना” (१९६९) पासून छान जमली, शोभली, रसिकांना आवडली. त्यानंतर ही जोडी अमर प्रेम, सफर, त्याग, मलिक, छोटी बहू, राजा रानी व दाग या चित्रपटात एकत्र आली. ‘बदनाम फरिश्ते’ व ‘नसिब’मध्ये ते पाहुणे कलाकार म्हणून होते. शक्ती सामंता दिग्दर्शित ‘कटी पतंग’मध्येही हीच जोडी असती पण शर्मिला टागोर गरोदर असल्यानेच तिने नकार दिला. (सैफ अली खानचा जन्म तेव्हाचा). ‘छोटी बहू’मध्ये अगोदर सायरा बानू होती. पहिल्या शेड्युलनंतर तिच्या जागी शर्मिला टागोर आली. (यामुळेच राजेश खन्ना व सायरा बानू या जोडीचा ‘छोटी बहू’मधला फोटो एक्स्युझिव्हज ठरला).
‘आविष्कार’ या जोडीचा अगदी वेगळाच चित्रपट. मुंबईत मेन थिएटर रिगल व नाॅव्हेल्टी असा तो प्रदर्शित झाला. खुद्द राजेश खन्नाला (Rajesh Khanna) आपल्या कामाचे भरपूर समाधान मिळाले हे जास्त महत्वाचे… बासू भट्टाचार्य यांच्या चित्रपट दिग्दर्शनाचे प्रगती पुस्तक ‘तिसरी कसम’ ( १९६६), ‘आस्था’ ( १९९७) वगैरे चित्रपटांनी भरले आहे, ‘आविष्कार’ त्यात वेगळ्याच वळणावरचा.