दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
चक्क दोन मध्यंतर रसिकांना आवडली
राज कपूरचे तुमचे सर्वात आवडते रुप कोणते असे कोणी विचारता क्षणीच मी उत्तर देतो, दिग्दर्शक राज कपूर! समोरच्याच्या चेहर्यावरचा आश्चर्याचा भाव लपत नाही. ‘अभिनेता’ राज कपूर (Raj Kapoor) असं मी म्हणेन अशी त्याची अपेक्षा असते. सर्वप्रथम त्याच्यातील दिग्दर्शक महत्वाचा, त्याच्यातील दिग्दर्शकाच्या मनात कथाआशय निश्चित होत जाताना त्याच्यातील निर्माता, थीमनुसार कलाकारांची निवड, तंत्रज्ञांची निवड अशा अनेक गोष्टींसह तो कार्यरत होणे अगदी स्वाभाविक. राज कपूरचा शोध कधीच न संपणारा आणि ग्लॅमर व गाॅसिप्सपेक्षाही खूपच मोठा “अभ्यासाचा विषय” आहे…आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीही अभ्यासाच्या खूप गोष्टी आहेत.
असाच त्याचा दिग्दर्शक म्हणून अभ्यासावा असा चित्रपट “संगम“. निर्माता राज कपूरच्या आर. के. फिल्म बॅनरखालील आर. के. स्टुडिओचा हा पहिला रंगीत चित्रपट आणि दिग्दर्शक राज कपूरने (Raj Kapoor) हा चित्रपट चक्क दोन मध्यंतरसह पडद्यावर साकारला. चित्रपट रसिकांनी हे दोन मध्यंतर स्वीकारले. पण तेही एकदाच हेही सांगायला हवेच. चित्रपटाच्या जगातील एक वेगळाच भन्नाट विक्रम.
राज कपूर निर्मित, दिग्दर्शित, संकलित आणि अभिनित ‘संगम’ ( रिलीज १८ जून १९६४) आणि ‘मेरा नाम जोकर‘ ( रिलीज १८ डिसेंबर १९७०) आणि सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन‘ ( रिलीज ५ ऑगस्ट १९९४). हे तीन दोन मध्यंतरचे चित्रपट. तुम्ही हे तीनही चित्रपट पाहिले असणार. “संगम” यशस्वी प्रदर्शनास साठ वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून हा फोकस आणि यापैकी फक्त आणि फक्त ‘संगम’ फस्ट रनला रौप्यमहोत्सवी यशाच्या आठवड्यापर्यंत दोन मध्यंतरचा चित्रपट म्हणूनच रसिकांनी एन्जाॅय केला. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर अप्सरा होते. खरं तर मूळ लॅमिन्टन थिएटर ( ते इंग्रजकालीन होते) पाडून त्या जागी उभे राहिलेल्या अप्सराचे ‘संगम’च्या राज कपूर ‘शोमनशीप स्टाईल’ प्रीमियरने भव्य उदघाटन झाले. तात्कालिक चित्रपट समीक्षकांना फर्स्ट डे फर्स्ट शोला खास आमंत्रित केले असता पुरण पोळीचे जेवण होते असे त्या काळातील सिनेपत्रकार जिभेवर गोड चव ठेवून सांगत.
त्या काळात मोठ्या चित्रपटांच्या प्रीमियरच्या वेळी थिएटरबाहेर आणि अगदी पलीकडच्या फुटपाथवरही ‘फिल्म दीवाने’ आपल्या आवडत्या स्टारचे दूरुन का होईना पण दर्शन घडावे म्हणून पोलिसांची लाठी खावूनही खचाखच गर्दी करीत. चित्रपट फॅन्सच्या अशाच अफाट क्रेझवर आपल्या देशात चित्रपट समाजाच्या अगदी खालच्या माणसापर्यंत पोहचला.
राज कपूर (Raj Kapoor), वैजयंतीमाला आणि राजेंद्रकुमार या तीन स्टारभोवतीचा प्रेमाचा श्रवणीय गीत संगीतमय उत्कट आणि असोशीने भरलेला त्रिकोण आणि त्यातच युरोपचे दिलखुलास आणि भरभरून दर्शन हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य. एकूण चोवीस रिळांचा चित्रपट आहे म्हणजे २३८ मिनिटे. पडद्यावर पहिल्या मध्यंतराला आले, First Intermission आणि नंतरच्या मध्यंतराला आले, Second Intermission. दोन मध्यंतरमुळे थिएटरचे कॅन्टीन अधिक फायद्यात राहिले असेल, थिएटरबाहेरचा वडापाववाला अधिक सुखावला असेल असा काही निष्कर्ष तुम्ही काढलात तरी चालेल. याचे कारण म्हणजे, चालणारा चित्रपट अशा आजूबाजूच्या लहान मोठ्या उद्योगानाही जगवतो.
त्या काळात याच सिंगल स्क्रीन थिएटर्समधील वेफर किती महाग यावर चर्चा होत नसे. ( काही वर्षांपूर्वी पाॅपकाॅर्नची झाली म्हणून म्हटलं) चित्रपटावर भरभरून बोलण्याचे ते युग होते. अप्सरा थिएटरमध्ये ‘संगम’चे दिवसा तीन खेळ होत आणि त्याच्या वेळा होत्या, सकाळी अकरा वाजता, दुपारी साडेतीन आणि रात्री आठ वाजता. तर लालबागच्या जयहिंद चित्रपटगृहात ‘संगम’साठी वेळा होत्या, सकाळी पावणेआठ, दुपारी बारा, संध्याकाळी सव्वाचार आणि रात्री साडेआठ. पारंपरिक वेळेपेक्षा वेगळ्याच. पण पिक्चर हिट होताच स्वीकारल्या गेल्या. मुंबईत तेव्हा “सातच्या आत घरात” अशी संस्कृती होती. मुंबईची सीमा प्रामुख्याने वांद्र्यापर्यंत होती. अंधेरीत मोठ्याच प्रमाणावर म्हशींचे गोठे होते.
गोरेगाव जणू गाव वाटे. ठाणे अगदीच दूरवरचे वाटे. शहरात संध्याकाळी दिवे लावण्यासाठी व सकाळी बंद करण्यासाठी कर्मचारी येई. ट्राम बंद होत होती. ॲम्बॅसेडर टॅक्सी, घोडागाडी, बेस्ट बस मोठ्याच प्रमाणावर असे..घरात जावू देत संपूर्ण चाळीत एक दूरध्वनी अर्थात फोन हे श्रीमंतीचे मानले. सरळ, शांत, साधे व आदर्शवादी असे जगणे होते. “संगम”ची कथा विस्तार नाट्यमय असल्याने या चित्रपटाची लांबी बरीच लांबली… दोन मित्र एक प्रेयसी या प्रेम त्रिकोणात समज, गैरसमज, नाट्य, चढउतार होते. आणि त्यानेच या चित्रपटाचा मोठा प्रवास सुखकर केला.
या चित्रपटाचे लेखन इंदर राज आनंद यांचे तर गीते शैलेन्द्र आणि हसरत जयपुरी यांची असून संगीत शंकर जयकिसन यांचे आहे. प्रत्येक गाणे कथेत नाट्य निर्माण करते. हर दिल जो प्यार करेगा, बोल राधा बोल संगम होगा की नही, ये मेरा प्रेम पत्र पढकर, ओ मेरे सनम, मै क्या करु राम मुझे बुढ्ढा मिल गया, दोस्त दोस्त ना रहा ही या चित्रपटातील गाणी आजही लोकप्रिय आहेत.
‘संगम’ निर्मितच्या काळात राज कपूरमधला रोमॅन्टीझम वैजयंतीमालाच्या छान सहवासात अधिकच खुलला, फुलला. तो तिच्या प्रेमात पडला आणि ही “ब्रेकिंग न्यूज” समजताच राज कपूरची (Raj Kapoor) पत्नी कृष्णा कपूर आपल्या तीनही मुलांना ( रणधीर, ऋषि व राजीव) घेऊन मरीन ड्राईव्हवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राह्यला गेली हे गाॅसिप्स भारी हाॅट ठरले. तीन चार दिवसानंतर तिचा राग मावळला. राज कपूर (Raj Kapoor) ही नरमला ( खरंच की काय?). ‘संगम’ म्हटलं की ही गोष्ट देखिल सांगावी लागतेच. हेही राज कपूरचे यश? सुरुवातीस या चित्रपटाचे नाव ‘घरोंदा‘ होते आणि आपल्या मित्राच्या भूमिकेसाठी राज कपूरने दिलीप कुमारला ऑफर दिली. काही कारणास्तव जमलं नाही म्हणून राजेंद्र कुमार.
या यशानंतर ‘चोवीस तास सिनेमा’मय असलेले व्यक्तिमत्व म्हणजे राज कपूर असे कौतुकाने म्हटले जाते त्याच राज कपूरने ‘मेरा नाम जोकर’ घडवला. पुन्हा थीमनुसार ( की सर्कसमुळे) लांबी अबब म्हणावी अशी खूप मोठी आणि त्यामुळे पुन्हा दोन मध्यंतरचा चित्रपट. ‘जोकर’ त्याचा खूप महत्वाकांक्षी चित्रपट आणि चित्रपटाच्या थीममध्ये सर्कसला भरपूर फूटेज, ( जणू पडद्यावर सर्कस दाखवण्यासाठी हा चित्रपट आहे. ) जोडीला एकाच चित्रपटात तीन प्रेमकथा ( एक शालेय वयातील, ती भूमिका ऋषि कपूरने साकारलीय) इतके सगळे असल्यावर चित्रपटाची लांबी खूप वाढणारच. सुरुवातीला या चित्रपटाची लांबी ४ तास आणि ४३ मिनिटे ( दोन मध्यंतर) अशी इतकी होती. हा चित्रपट प्रदर्शित करताना तो ४ तास ९ मिनिटे ( दोन मध्यंतर ) अशा अवधीने पडद्यावर आला. फस्ट डे फर्स्ट शोपासूनच तो पडला पडला अशी जोरदार आवई उठली आणि त्याची लांबी कमी करुन ती १७८ मिनिटे ( एक मध्यंतर) अशी करण्यात आली. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर नाॅव्हेल्टी होते. आज यूट्युबवर मूळचा चार तासाचा ‘जोकर’ आहे. आपण तो एन्जाॅय करु शकता. एकदा पहाच.
‘हम आपके है कौन’ आम्हा समिक्षकांना लिबर्टी थिएटरमध्ये पब्लिकसोबतच फर्स्ट डे फर्स्ट शो दाखविला. राजश्री प्राॅडक्सन्सचा चित्रपट असल्याने फॅमिली क्राऊड खूप होता. वातावरणात उत्साह होता. नवीन चित्रपटाच्या पहिल्या दिवशीचे फिल गुड वातावरण खूप महत्त्वाचे असते. त्यातून ‘पिक्चर ‘बद्दल रसिकांना कितपत उत्सुकता आहे याचे कळत नकळतपणे उत्तर मिळते. राजश्री प्राॅडक्सन्सच्या वतीने सुरुवातीला प्रत्येक शहरात एकाच थिएटरमध्ये सिनेमा रिलीज केला होता. ही सकारात्मक बिझनेस टॅक्टीज होती.
========
हे देखील वाचा : सिर्फ तुम… सुश्मिता सेनच्या आकर्षक नृत्य सौंदर्याची पंचवीशी
========
सिनेमा सुरु होताना सेन्सॉर प्रमाणपत्रावर सवयीनुसार नजर टाकली आणि २३ रिळे असे वाचून आश्चर्य वाटलं. दिग्दर्शक सूरजकुमार बडजात्या याने इतके काय बरे मांडलय हा प्रश्न कुतूहल वाढवणारा होता आणि तासाभराने पडद्यावर आले ते First Intermission यावरुन ओळखले या चित्रपटाला दोन मध्यंतर आहेत. म्हणजे प्राॅडक्सन्सकडून आम्हा मिडियाला दोनदा नाश्ता मिळणार.
चित्रपटाला फस्ट डे फर्स्ट शोपासूनच हायफाय अथवा नवश्रीमंत रसिकांची पसंती मिळाली आणि सिनेमा सुपर हिट झाला. पण लांबी जरा जास्त आहे हे लक्षात आले आणि थोडे एडिटींग करुन काही दिवसातच चित्रपट एका मध्यंतरचा करण्यात आला. हा चित्रपट जाणीवपूर्वक ३ तास २६ मिनिटांचा करण्यात आला, याचे कारण म्हणजे, व्हिडिओ कॅसेटमध्ये सामावू शकत नाही अशीही एक चर्चा रंगली. म्हणजे हा चित्रपट व्हिडिओ चोरीला गेला तरी तो सेफ राहिल, असे व्यावसायिक गणित. म्हणजे, एकेका सिनेमामागे किती गोष्टींचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष विचार केलेला असतो हे बघा आणि तेच खरे सिनेमाचे जग आहे.
‘संगम’ काही वर्षांनी सेकंड रनला अथवा मॅटीनी शोला रिलीज होताना मात्र त्यातील काही भाग कापून एका मध्यंतरचा करण्यात आला होता. आणि एकदा यशस्वी ठरलेला चित्रपट कायमस्वरुपी लोकप्रिय असतोच. ‘जोकर ‘ला काही वर्षांनी पुन्हा पुन्हा रिलीज होताना अतिशय चांगली गर्दी होऊ लागली. ‘हीना‘ ( १९९१) च्या निमित्ताने रणधीर कपूरच्या मुलाखतीचा योग आला असता त्याने ‘जोकर ‘ने नंतरच्या काळात रिलीज होताना उत्तम व्यावसायिक यश मिळवले असे मला अगदी उत्साहात सांगितल्याचे आठवतेय. ‘हम आपके है कौन’चा काळ चॅनलच्या जगाची हळूहळू वाढ होत असतानाचा होता. अनेकदा तरी तो चॅनलवर येत असताना त्याचा टीआरपी भारी असतोच…
=========
हे देखील वाचा : पती व पत्नी संबंधावरील “आविष्कार”ची पन्नाशी वैशिष्ट्यपूर्ण
=========
या तीन चित्रपटात एक काॅमन गोष्ट आहे हे तुमच्या लक्षात आले का? तीनही चित्रपटात गीत संगीत व नृत्याला भरपूर स्कोप आहे ( हम आपके… तर संगीत की भाषा में बोलो चित्रपट आहे. पटकथेत गाण्यांना विशेष स्थान आहे) या लोकप्रिय गाण्यांनी हे एका पिढीतील चित्रपट पुढील अनेक पिढ्या ओलांडूनही फोकसमध्ये ठेवलेत…
आजच्या गतिमान युगात आपण ‘दोन मध्यंतरचा चित्रपट’ अशी कल्पना तरी करु शकतो का? त्यापेक्षा दोन भागात तो चित्रपट पाहण्याची तयारी आपण ठेवू ( “गॅन्ग्स ऑफ वासेपूर” तसाच तर होता.) राज कपूरच्या (Raj Kapoor) दिग्दर्शन व संकलनात विलक्षण आत्मविश्वास व ताकद होती म्हणूनच “दोन मध्यंतर”चा “संगम” करायचे त्याला जमले, झेपले व पेलले. राज कपूर एकच असतो, एकदाचा जन्माला येतो आणि असा कायमचाच ठसा उमटवतो. तब्बल साठ वर्षांनंतरही “संगम”ची जादू कायम आहे यात बरेच काही आलेच…