‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘कर्ज’ चित्रपटातील ही भूमिका करताना सिमी गरेवाल का नाराज होती?
शो मन सुभाष घई यांनी १९८० साली ‘कर्ज’ (Karz) हा म्युझिकल हिट चित्रपट दिग्दर्शित केला होता हा सिनेमा आज देखील एक कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जातो. या चित्रपटातील हरेक व्यक्तीरेखेला सुभाष घई यांनी एक वेगळा रंग दिला. या चित्रपटातील कामिनी वर्मा ही भूमिका अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी केली होती. काहीशी ग्रे छटा असलेली ही खलनायकी भूमिका करायला सिमी गरेवाल यांनी सुरुवातीला नकार दिला होता. याचे कारण सिमीला स्वत: च्या इमेजवर vampचा शिक्का नको होता कारण तोपर्यंत सिमी अभिनेत्रीच्या भूमिका करत होती. त्यामुळे तिने नकार दिला. मग सुभाष घई कसा मिळवला तिचा होकार? कसे राजी केले? खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे.
अभिनेत्री सिमी गरेवाल साठच्या दशकाच्या सुरुवातीला हिंदी सिनेमाच्या दुनियेत आली. तीन देवीयां, आदमी, साथी, दो बदन, जोहर मेहमूद इन गोवा हे तिचे चित्रपट चांगलेच गाजले. ‘साथी’ आणि ‘दो बदन’ या चित्रपटातील भूमिकांसाठी तिला फिल्मफेअरचे पुरस्कार देखील मिळाले. या दशकात तिने अनेक चित्रपटातून भूमिका केल्या असल्या तरी तिला खरी आयडेंटिटी मिळाली राज कपूरच्या ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटापासून. यात तिने रंगवलेली टीचरची भूमिका आणि पौगंडावस्थेतील मुलांमध्ये असलेले स्त्रीच्या शरीराचे आकर्षण ही खूप चांगली भूमिका तिच्या वाट्याला आली होती.
यानंतर सिमी गरेवाल यांनी Conrod Rooks यांनी दिग्दर्शित केलेल्या १९७२ साली आलेल्या ‘सिद्धार्थ’ या इंडो अमेरिकन चित्रपटात शशी कपूरसोबत भूमिका केली. या सिनेमात तिने चक्क एक न्यूड सीन दिला होता. त्या काळाच्या मानाने ते फार मोठे धाडस होते. पण या भूमिकांमुळे सिमी गरेवालची इमेज बॉलीवूडमध्ये वेगळीच झाली आणि तिला नॉर्मल नायिकांच्या भूमिका मिळाल्याच नाहीत.
याच काळात १९७७ साली सुभाष घई यांनी आपल्या आगामी चित्रपटात तिला काहीशी खलनायकी भूमिका ऑफर केली. सिमी गरेवालने भूमिका ऐकल्यानंतर सुभाष घई यांना नकार दिला. ‘मी अशा प्रकारच्या कुठल्याही भूमिका करून माझे करिअर बरबाद करून घेणार नाही’ असे स्पष्ट सांगितले. सुभाष घई यांनी तिला हरतऱ्हेने समजावून सांगितले कारण त्यांच्या मनात या भूमिकेसाठी सिमी गरेवाल शिवाय दुसऱ्या कुठल्या अभिनेत्रीचा विचार येतच नव्हता.
तब्बल एक वर्षभर सुभाष घई तिला कन्व्हेन्स करत राहिले. परंतु सिमी आपल्या निर्णयावर ठाम होती. शेवटी सुभाष घई यांनी इमोशनल हत्यार काढले. त्यांनी एक दिवस तिला सांगितले, ”जर माझ्या चित्रपटात तुम्ही भूमिका करणार नसाल तर माझ्या मागच्या १८ महिन्याची मेहनत वाया जाईल. कामिनीच्या भूमिकेसाठी मी दुसऱ्या कुठल्या अभिनेत्रीचा विचार करूच शकत नाही. आणि तुमचा नकार असेल तर हा चित्रपटाचा प्रोजेक्टच मी बंद करून टाकेल!” ही मात्रा काहीशी लागू झाली आणि चित्रपटाची शूटिंग सुरू झाले.
========
हे देखील वाचा : गिरीशमुळे नसीरुद्दीन शाहांना मिळाला पहिला ब्रेक
========
पण शूटिंगच्या दरम्यान देखील आपण काहीतरी मोठी चूक करत आहोत असेच वाटत होते. ही भूमिका आपण करायला नको असे वाटत होते. तिच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी देखील तिला या भूमिकेपासून लांब राहा असेच सांगितले म्हणून तिने पुन्हा एकदा सुभाष घई यांना सांगितले की, ”मी तुमच्या चित्रपटात काम करते आहे. परंतु या भूमिकेतचा व्हीलनचा टोन थोडासा कमी करा.” त्यावर सुभाष घई म्हणाले, ”जर तसे केले तर सिनेमातील या कॅरेक्टरचा इम्पॅक्टच कमी होईल. त्यामुळे तू अजिबात असा कुठलाही विचार मनात आणू नकोस. ही भूमिका आणि हा चित्रपट तुला खऱ्या अर्थाने नाव मिळवून देईल हे लक्षात ठेव.” (Karz)
शेवटी द्विधा मनस्थितीतच सिमी गरेवालने हा (Karz) चित्रपट पूर्ण केला. ११ जून १९८० या दिवशी ‘कर्ज’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवशीपासून या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठा पाठिंबा दिला. सिमी गरेवालच्या भूमिकेचे देखील सर्वांनी कौतुक केले. तिला या भूमिकेसाठी फिल्फेअरचे नामांकन मिळाले. तिच्या आयुष्यातील हा एक माइल स्टोन सिनेमा बनला!