डॉक्टर आणि किरवंताच्या लढाईत कोण जिंकणार? ‘लाईफलाईन’ चा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित
डॉक्टरांचे आधुनिक विचार आणि किरवंतामध्ये खोलवर रुजलेली परंपरेची मुळे या दोघांमधील वैचारिक तफावत दाखवणारा ‘लाईफलाईन‘ चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. टिझर पाहून अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यातील जबरदस्त जुगलबंदी पाहाण्यासाठी प्रेक्षक आतुर असतानाच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अशोक सराफ, माधव अभ्यंकर, भरत दाभोळकर, हेमांगी कवी, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, सुश्रुत मंकणी, अवधूत गुप्ते यांच्या उपस्थितीत नुकताच ‘लाईफलाईन‘ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला.( Marathi Movie Lifeline Trailer)
ट्रेलरमध्ये डॉक्टर आणि किरवंताची लढाई दाखवण्यात आली असून ज्ञान आणि विज्ञान एकत्र आले तर कित्येक गरजूंचे प्राण वाचू शकतील, या मताचे डॉक्टर आहेत तर माणसाच्या आयुष्यात दोनच जण महत्वाचे असतात, एक भगवंत जो जन्म देऊन खाली पाठवतो आणि दुसरा किरवंत जो निरोप देऊन वर पाठवतो, या विचारसरणीचे किरवंत आहेत. त्यामुळे या लढाईत कोण जिंकणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, आयुष्याचा प्रवास संपतो तेव्हा एका नवीन आयुष्याचा प्रवास सुरु होतो, याची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे.
क्रिसेंडो एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘लाईफलाईन‘ चित्रपटाचे दिग्दर्शन साहिल शिरवईकर यांनी केले असून कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहेत. तर अशोक पत्की यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटातील गाणी अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी गायली आहेत. लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट चित्रपटाचे निर्माते आहेत.(Marathi Movie Lifeline Trailer)
===============================
===============================
‘ज्यावेळी साहिलने मला चित्रपटाबद्दल सांगितले, त्यावेळी स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी त्याला पहिला प्रश्न विचारला किरवंताची व्यक्तिरेखा कोण साकारणार आहे, त्यावेळी त्याने माधव अभ्यंकर यांचे नाव घेतले. तिथेच मला या मुलाची समज कळली. मला हा विषय आवडला. प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडणारा हा चित्रपट आहे. एक तरूण दिग्दर्शक असा चित्रपट बनवतोय, ही निश्चितच कौतुकाची बाब आहे.’ अशा भावना यावेळी अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या. ‘लाईफलाईन‘ चित्रपट येत्या २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.