बुध्दीमान माणूस, स्पष्टवक्ता कलाकार
आजही मला वांद्र्यातील ऐन दिवाळीतील मेहबूब स्टुडिओतील सुभाष घई निर्मित व दिग्दर्शित मुक्ता आर्ट्सच्या “कर्मा” (१९८६)चा भव्य दिमाखदार मुहूर्त आठवतोय. मिडियात मी नवीनच होते. शोमन अशी सुभाष घईची इमेज घट्ट होत असल्याचे ते दिवस होते. दिलीप कुमार, अनिल कपूर, जॅकी श्राॅफ, अनुपम खेर यांच्यासह नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) याची विशेष उत्सुकता होती.
नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) हा समांतर अथवा कलात्मक (नव प्रवाहातील) चित्रपट चळवळीतील एक हुकमी “चेहरा” या चित्रपटाच्या माहौलमध्ये कसा फिट्ट बसणार, कसा शोभून दिसणार असा प्रश्न माझ्या मनात घोळत होता…. सेटवर पाऊल टाकताच समोर भला मोठा सेट दिसला आणि त्यावर “कर्मा”चे जोरदार संवादाचे मुहूर्त दृश्य रंगले…. पारंपरिक लोकप्रिय मनोरंजक चित्रपटातून नसिरुद्दीन शाहच्या वाटचालीचा हा सुरुवातीचा काळ. आणि त्यात तो छान रुळत चाललाय हे यावेळी जाणवले.
सत्तरच्या दशकात समांतर हिंदी चित्रपटाची चळवळ रुजत असताना त्यात महत्वाचे नाव होते, नसिरुद्दीन शाह. आक्रोश, निशांत, मिर्च मसाला, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यू आता है, त्रिकाल, भवनी भवाई, जुनून, चक्र, मंडी, मोहन जोशी हाजीर हो या चित्रपटातून नसिरुद्दीन शाहची (Naseeruddin Shah) बुध्दीवादी कलाकार अशी प्रतिमा निर्माण झाली. चित्रपट समिक्षकांकडून कौतुक, देश विदेशातील अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटांचे प्रदर्शन, अनेक मानाचे पुरस्कार, चित्रपट माध्यमावर गंभीर भाष्य हे कितीही सुखकारक असले तरी “पैसा” हाही घटक महत्वाचा आणि तो मिळतो व्यावसायिक चित्रपटात काम करुन! तिकडचे एकूणच वातावरण वेगळे, मानसिकता वेगळी, कामाची पद्धत वेगळी आणि त्या सगळ्याशी जुळवून घेण्याचे कसब, कौशल्य व कसोटी हवी. …
आज नसिरुद्दीन शाहच्या वयाच्या पंचाहत्तरीचा (जन्म २० जुलै १९४९) झाला असतानाच्या टप्प्यावर बेरीज व वजाबाकी काय दिसतेय? चित्रपट अभिनयातील चतुरस्र वाटचालही पन्नास वर्षांची! नसिरुद्दीन शाहने (Naseeruddin Shah) कलात्मक चित्रपट आणि मनोरंजक चित्रपट या दोन्हीत आपला कार्यविस्तार केला, ठसा उमटवला. तसेच क्लासिक चित्रपट (कथा, जाने भी दो यारों इत्यादी), आणि समांतर व व्यावसायिक यांचा समतोल साधणाऱ्या ( अर्ध सत्य, जाने भी दो यारों, इजाज़त) अशाही चित्रपटातून काम केले. दिग्दर्शक राजीव राॅयचा तो हुकमी कलाकार चेहरा.
त्याच्या त्रिदेव, विश्वात्मा, मोहरा, असंभव या चित्रपटात नसिर आहे. राजीव राॅयच्या धमाकेदार मसालेदार चित्रपटाची प्रकृती अगदीच भिन्न. अतिरंजितपणा फार. त्यातही नसिर फिट्ट बसला. जे. पी. दत्ता दिग्दर्शित “गुलामी”मध्येही तो मिसफिट वाटला नाही आणि सिल्क स्मिताच्या आयुष्यावरील मिलन लुथरिया दिग्दर्शित “डर्टी पिक्चर“मध्येही त्याने रंग भरला. शबाना आझमी, स्मिता पाटील यांच्यासोबत काम केलेल्या नसिरने सोनम (त्रिदेव, विश्वात्मा), शिल्पा शिरोडकर (लक्ष्मण रेषा), वर्षा उसगावकर (हस्ती, शिकारी) या ग्लॅमरस अभिनेत्रींसोबतही त्याच सहजतेने काम केले.
सोनमसोबतची ओ ये ओ ये तिरछी टोपीवाले (त्रिदेव), दिल ले गयी (विश्वात्मा) ही गाणी सर्वकालीन लोकप्रिय. सोनमशी त्याची जोडी कशी शोभेल या प्रश्नाला पडद्यावर उत्तर मिळाले. गुलजार दिग्दर्शित “इजाज़त” नसिरचा हायपाॅईंट. रेखासोबत म्हणा वा रेखासमोर म्हणा नसिरुद्दीन शाहने (Naseeruddin Shah) आपलं कसदार नाणे छान लक्षवेधक ठरवले. रेखाला ही मोठीच संधी होती म्हणायचं. मला नटराज स्टुडिओतील गुलशन राॅय दिग्दर्शित “त्रिदेव“चा मुहूर्त आठवतोय. गुलशन राॅय यांच्या त्रिमूर्ती फिल्म बॅनरखाली चित्रपट निर्माण होत तर माॅडर्न मुव्हीजच्या बॅनरखाली चित्रपट वितरित होत.
चित्रपटसृष्टीतील दादा माणूस. त्यामुळेच मुहूर्ताला चित्रपटसृष्टीतील अनेक जाने माने लोक हजर दिसले आणि त्यातही सनी देओल, जॅकी श्राॅफ व माधुरी दीक्षित यांच्यासह नसिरही (Naseeruddin Shah) या वातावरणात रुळलेला दिसला. अभिनयाचे नाणे खणखणीत असल्यानेच, जगभरातील चित्रपट व साहित्य यांच्याशी संबंध असल्यानेच नसिर कधीच कुठे अवघडलेला दिसला नाही. तेव्हाच्या माझ्या शूटिंग रिपोर्टींगमध्ये मी हेच रंगवून लिहिले. एका बी ग्रेड चित्रपटाच्या दिग्दर्शकाला त्याने इंगा दाखवल्याची बातमी गाजली. व्यावसायिक चित्रपटात भूमिका साकारताना कधी पटकथेत बदल, संवाद तयार नसणे, मोठ्या स्टार्सची वाट पाहत कंटाळून जाणे, भूमिका कापली जाणे हे सगळेच स्वीकारावे लागते. अथवा याकडे दुर्लक्ष करीत काम करावे लागते. नसिरने अशा अनेक “सामान्य हिंदी चित्रपटातून ” ( जिंदा जला दूंगा वगैरे) काम केलेय.
नसिरच्या (Naseeruddin Shah) चित्रपटांची नावे सांगायची तर वो सात दिन, बेजुबान, हम पांच, जलवा, हीरो हिरालाल यापासून वेन्सडे, मान्सून वेडिंग अशी बरीच. त्या नामावलीपेक्षा त्याने मिळवलेली प्रतिष्ठा, लौकिक, विश्वासार्हता खूपच मोठी. अशा एका लेखात ते मावणारे नाही. त्याचा फिटनेस, त्याचे मनसोक्त क्रिकेट खेळणे, फिल्मी पार्ट्यातून न फिरणे, सतत मुलाखती न देणे अशा अनेक गोष्टींसह तो पंचाहत्तरीत आलाय. “यू होता तो क्या होता” (२००६) या चित्रपटाच्या त्याच्या दिग्दर्शनात कसलाच प्रभाव दिसला नाही. ते त्याचे काम नव्हे हे चित्रपटसृष्टीला व त्याला एकाच चित्रपटात समजले.
“And then one day” या आपल्या आत्मचरित्रात त्याने आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्यात. याच पुस्तकाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सत्तरच्या दशकातील राजेश खन्नाच्या चित्रपटावर कडक भाषेत वक्तव्य करीत अनेकांचा रोष ओढवून घेतला. तसा तो उगाच वादविवाद करणारा अथवा सवंग प्रसिध्दी मिळवणारा नाही. गंभीर विचारी अभिनेता हेच त्याचे ठळक वैशिष्ट्य. म्हणूनच त्याच्याबद्दल तद्दन फिल्मी किस्से कधीच नसतात. डिजिटल मिडियात म्हणूनच तो कधी जास्त दिसत नाही.
=========
हे देखील वाचा : राजेश खन्ना १८ जुलै बारावा स्मृतिदिन
=========
नसिरच्या अभिनयाची कायमच चर्चा असते, त्याचं मानधन, त्याच्या चित्रपटाचे खरे खोटे उत्पन्न, त्याची गाडी याची कधीच बातमी होत नाही हे विशेषच आहे आणि हेच व्हायला हवे. नसिरुद्दीन शाहबद्दल एक खास आठवण. तो चांगला क्रिकेट खेळतो याचा चित्रपटात उपयोग करुन घेतलाय. तोही सुनील गावसकरसोबत! कंवल शर्मा दिग्दर्शित “मालामाल“मध्ये नसिरची व्यक्तिरेखा भरपूर पैसे खर्च करणाऱ्या उद्योगपतीची आहे. त्यात तो सुनील गावसकरला आपल्यासोबत क्रिकेट खेळण्यास आणतो. याचे शूटिंग मरीन ड्राईव्हवरील पारशी नमस्कार असताना आम्हा निवडक सिनेपत्रकारांना यावेळी खास सेटवर बोलावले होते. तेव्हा सुनील गावसकर व नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांना एकत्र पाह्यचा सुखद व आठवणीत राहणारा अनुभव घेतला.
जाॅन मॅथ्यूज मथान दिग्दर्शित “सरफरोश“मधील नसीरचा गझल गायक गुलफाम हसन हा पाकिस्तानचा हेर असल्याचा धक्का चित्रपटातील उत्सुकता वाढवतो. त्याला खरं तर पोलीस इन्स्पेक्टरची सलिमची भूमिका ऑफर झाली होती. पण कितीदा पोलीस साकारायचा असे म्हणतच त्याने ती नाकारली. चित्रपटाला यशस्वी पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जुहूच्या एका मल्टीप्लेक्समध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात नसिर अगदी मनापासून खुलला. या भूमिकेने त्याला स्टार केले.
नसिरुद्दीन शाह अष्टपैलू अभिनयाचे उत्तम उदाहरण. पंचाहत्तराव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.