दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
पूर्वी श्रावण येई तो पौराणिक धार्मिक चित्रपट घेऊन
ग्रामीण भागातील अनेक खेड्यापाड्यातील सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहात बाहेर चपला काढून प्रेक्षक “जय संतोषी माँ” चित्रपट भाविकतेने पाह्यला जात ही गोष्ट चित्रपट रसिकांच्या किमान चार पिढ्यांसोबत पुढे चालत राहिलीय याची आपणास कल्पना आहेच. आपल्याकडील चित्रपट प्रेक्षक संस्कृतीतील हा एक बहुचर्चित फंडा. प्रत्येक काळाची काही वैशिष्ट्ये असतानाच आणि त्यातील पिढीला त्याचे बरेच अनुभव व आठवणी असतात… असाच एक फिल्मी फंडा पौराणिक वा धार्मिक (Religious films) चित्रपटांचा.
सत्तरच्या दशकात लहानपणी आमच्या गिरगावातील सदाशिव लेन, बनामा लेन येथे दुकानात विविध रंगाच्या राख्या दिसू लागल्या, मुगभाटात श्रीगणेश मूर्तींचे काम दिसू लागले की आम्ही समजायचो, श्रावण, भाद्रपद महिन्याचे आगमन होतेय आणि त्याच वेळेस मराठी वृत्तपत्रात शुक्रवारच्या चित्रपट सदरात पौराणिक चित्रपटाच्या बातम्या, फोटो वाचायला मिळत. प्रार्थना समाजला एखाद्या पौराणिक चित्रपटाचे होर्डींग्स दिसे आणि अशातच मॅजेस्टीक अथवा सेन्ट्रल, स्वस्तिक थिएटरला एखादा पौराणिक चित्रपट प्रदर्शित होई…. अनेक वर्षांपासूनचा हा अनुभव घेत घेत माझी पिढी वयात आली.
पौराणिक चित्रपटांची आपल्याकडची परंपरा पार अगदी मूकपटांपासूनची. जनसामान्यांना देव देवतांच्या गोष्टीत विशेष आनंद होत होता. दिग्दर्शक दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र‘ (१९१३) हा आपल्याकडील पहिला मूकपट पौराणिक आहे. त्या काळात मोहिनी भस्मासुर, लंका दहन, कृष्ण जन्म, सैरंध्री, श्री कृष्ण सुदामा, शनी प्रभाव असे अनेक पौराणिक मूकपट निर्माण होत जाताना समाजाला या दृश्य माध्यमाची हळूहळू ओळख होत गेली.
चित्रपती व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘अयोध्येचा राजा‘ (१९३२) हा आपल्याकडील पहिला मराठी बोलपट पौराणिक आहे. प्रेक्षकांना समजायला सोपी गोष्ट म्हणजेच देव देवतांच्या गोष्टी अशीच सरळ सोपी व्याख्या होती. ‘बोलू लागलेला चित्रपट’ समाजात रुजताना पौराणिक चित्रपट एक महत्वाचा घटक होता. माया मच्छिंद्र, रुक्मिणी हरण, भक्त प्रल्हाद, आकाशवाणी, कृष्णार्जुन युध्द, चंद्रसेना, कालियामर्दन, गंगावरण, गोपालकृष्ण, अकरावा अवतार, माया बाजार, गोरखनाथ, संत ज्ञानेश्वर अशा अनेक मराठी पौराणिक चित्रपटांची निर्मिती होत होत मराठी चित्रपटाचा प्रवास पुढे जात राहिला. याबरोबरच संतपट, ऐतिहासिक चित्रपट मग ग्रामीण चित्रपट वगैरेचे प्रवाह त्यात मिसळत गेले. (Religious films)
हिंदीतही पौराणिक चित्रपटांची खूपच मोठी यशस्वी वाटचाल आहे. १९३२ साली ‘भक्त प्रल्हाद‘ हा पौराणिक चित्रपट पडद्यावर आला आणि पौराणिक चित्रपटांची दीर्घकालीन परंपरा सुरु झाली. चित्रपटाच्या अभ्यासात हा फ्लॅशबॅक व फोकस खूपच महत्वाचा. आपल्या देशात चित्रपट कसा रुजला तेच यातून दिसतेय. साधारण चैत्र ते भाद्रपद या महिन्यांत हे मराठी व हिंदी पौराणिक चित्रपट प्रदर्शित होत. गिरगावातील मॅजेस्टिक थिएटरमध्ये हर हर महादेव, श्रीकृष्ण लीला अशा पौराणिक चित्रपटाच्या वेळी त्यातील अनेक दृश्यांचे उभे केलेले अतिशय ऐसपैस देखावे आजही माझ्या डोळ्यासमोर आहेत.
एकाद्या श्रीकृष्णाच्या मूर्तीची पूजाही होई. ही देखील चित्रपट संस्कृतीतील एक उल्लेखनीय गोष्ट. अनेक शहरांत, ग्रामीण भागातील सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये पौराणिक चित्रपटाच्या एखाद्या पोस्टरला हार, अगरबत्ती, नारळ फोडून पूजा हे नित्याचेच. पौराणिक चित्रपटाच्या ‘पोस्टरची पूजा’ म्हणजे जणू देव पूजाच. हवं तर याला भाबडेपण म्हणा. पण ते होते. आपल्या देशात चित्रपट फक्त पडद्यावर असतो असे नव्हे तो असा अनेक गोष्टींसह वाटचाल करतोय.
होमी वाडिया, चंद्रकांत या निर्मात्यांचे पौराणिक चित्रपटात केवढे तरी सातत्य आणि तीच त्यांची ठळक ओळख. होमी वाडिया यांनी श्रीराम भक्त हनुमान (१९४८), श्रीगणेश महिमा (५०), हनुमान पाताल विजय (५१), श्रीकृष्ण लीला (७२) या पौराणिक चित्रपटांची तर चंद्रकांत यांनी हरी दर्शन (७२), बजरंगबली (७६), कृष्णा कृष्णा (८६). यासह अनेक पौराणिक चित्रपट येत राहिले. गोकुल का चोर, बद्रीनाथ धाम, भगवत गीता, बाल गणेश, हनुमान, शकुंतला, भगवान परशुराम, रामायण, महाभारत, वाल्मिकी, लव कुश, वाल्मिकी, संपूर्ण रामायण, शिव महिमा, अलख निरंजन, श्रीसत्यनारायण की महापूजा, शिवमहिमा, शिर्डी के साईबाबा वगैरे वगैरे. (Religious films)
छोट्या अथवा मध्यम बजेटमधील हे चित्रपट असत. ते महत्वाचे नव्हतेच. तर अशा चित्रपटांचे सातत्य महत्वाचे. यात कोणी कलात्मक मूल्य, दिग्दर्शन टच, प्रतिकात्मक दृश्य, टाॅप ॲन्गल असे काहीही पाहत नसत. या चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग भाबडा आणि भक्तीत रमणारा. देव भक्त. सतराम रोहरा निर्मित व विजय शर्मा दिग्दर्शित ‘जय संतोषी माँ’ (मुंबईत रिलीज ३० मे १९७५) ने लोकप्रियतेत अक्षरश: प्रचंड क्रांती केली. मुंबईत अलंकार ( मॅटीनी शो), एडवर्ड (धोबीतलाव), किस्मत (प्रभादेवी) इत्यादी थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होताना जणू फार मोठे सामाजिक सांस्कृतिक वातावरण ढवळून काढणारे काही घडेल याची अजिबात कल्पनाच नव्हती.
तांत्रिकदृष्ट्या सर्वसाधारण असलेला पण गीत संगीतात सोप्या चालीने खुललेला हा चित्रपट माऊथ पब्लिसिटीवर जोरात चालू लागला. कुठे काही भक्तांनी प्रत्येक शुक्रवारी हा चित्रपट पाह्यचाच असा जणू नवस केला. कुठे थिएटरबाहेर चपला काढून आत पिक्चर पाह्यला जात. कुठे मै तो आरती उतारी रे संतोषी माता की गाण्याला प्रेक्षक उभे राहून तेही आरती गाऊ लागले. आपल्या देशातील चित्रपट प्रेक्षक संस्कृती अशी भन्नाट आहे. ती एकदा का लोकप्रियतेवर स्वार झाली की ती थांबणे अवघड. अशातच १५ ऑगस्ट १९७५ रोजी मुंबईत रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले‘ आला, सुरुवातीस नरम रिपोर्ट असलेला ‘शोले’ मग कमालीचा यशस्वी ठरला तरी जय संतोषी माँची जबरा क्रेझ कायम राहीली. इतकी की आजही या दोघांच्या तडाखेबंद यशाची तुलना होते.
पौराणिक चित्रपटांनी जे समाजात व रुपेरी पडद्यावर पेरले ते ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस रामानंद सागर यांच्या ‘रामायण‘ आणि बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत‘ या दूरदर्शनवरील पौराणिक मालिकांच्या पथ्यावर पडले. या एका मालिकेनंतर काही महिन्यातच दुसरी ही मालिका आली. सगळीकडेच रविवारी सकाळी रस्ते ओस पडू लागले. पुन्हा एकदा सामाजिक वातावरण बदलून टाकले. पौराणिक गोष्टीत ही ताकद आहे. कालांतराने तांत्रिक प्रगती होत असतानाच अनेक पौराणिक मालिका येत राहिल्या. घटोत्कच, दशावतार, कृष्ण और कंस इत्यादी ॲनिमेशनपट आले. व्हीएफएक्स आले आणि ‘आदिपुरुष’ वगैरे आले. “कल्की” देखिल त्याच वळणाचा. पौराणिक चित्रपटांचे बजेट अव्वाच्या सव्वा वाढले. त्यात मूळ गोष्टीतील आत्मा हरवला.
========
हे देखील वाचा : “क्रांतीवीर”ची तीस वर्ष !
========
त्या काळात थिएटरवरचे पौराणिक चित्रपटाचे देखावे पाहण्यातही आनंद घेण्याची एक पब्लिक संस्कृती होती. आपल्याकडील चित्रपट संस्कृती अशी सामाजिक सांस्कृतिक भावना जपणारी आहे आणि त्याला दाद द्यायलाच हवी. मल्टीप्लेक्स/ ओटीटीच्या युगात पौराणिक वा धार्मिक चित्रपट (Religious films) ही खासियत पडद्याआड गेली असली तरी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील तो एक महत्वाचा हुकमी फंडा होता. त्याचाच हा फ्लॅशबॅक.
यू ट्यूबवर उपलब्ध असलेल्या जुन्या पौराणिक चित्रपटांना आजची पिढी कदाचित दाद देणार नाही, पण एकेकाळी या चित्रपटांचा चक्क हुकमी प्रेक्षकवर्ग होता आणि तेच तर महत्वाचे. चित्रपटाच्या जगात यश हेच चलनी नाणे असते तर मग ते पौराणिक धार्मिक चित्रपटांचे का ना असेना? श्रावण महिन्यात मल्टीप्लेक्समध्ये रामायण, महाभारत, जय संतोषी मा अशा चित्रपटांचा एक महोत्सव आयोजित करायला काय हरकत आहे?