दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
परवीन बाबीचं चरित्र साकारणार तृप्ती डिमरी…
परवीन बाबीकडे ग्लॅमरस रुपडं होतं, झीनत अमानच्या स्पर्धेत टिच्चून टिकून होती, यश चोप्रा, मनोजकुमार, मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, रवि टंडन, रमेश बहेल, राज एन. सिप्पी अशा सत्तरच्या दशकातील आघाडीच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटात काम करीत होती, शशी कपूर, धर्मेंद्र, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन अशा टाॅपच्या हीरोंची नायिका झाली. अमेरिकेतील टाईम मॅगझिनच्या कव्हरवर झळकली ही त्या काळातील “ब्रेकिंग न्यूज” आजही त्या मुखपृष्ठासह चर्चेत असते (या बातमीने चक्क मुद्रित माध्यम ते डिजिटल माध्यम असा प्रवास केलाय) असं सगळं असूनही परवीन बाबीला मानसिक शांततेसाठी विदेशी जावे लागले, (आज त्या मानसिक शांततेची गरज अनेक क्षेत्रातील स्पर्धात्मक वातावरणात अनेकांना हवीशी झाली आहे) ती अचानक पडद्याआड गेल्यावर तिच्या अफेअर्समुळे ती कायम चर्चेत राहिली. (Tripti Dimri)
सेलिब्रिटीजची अफेअर्स, लग्न, घटस्फोट, विवाहबाह्य संबंध, पार्टी कल्चर या मसालेदार मनोरंजक न्यूज स्टोरीज अधिकाधिक लाईक्स, काॅमेन्ट्स मिळवतात आणि व्हायरल होतात. अनेक कलाकारांचे अस्तित्व सोशल मिडियापुरतेच राहिलयं. कबीर बेदी, महेश भट्ट, डॅनी डेन्झोपा हे विवाहित पुरुष तिचे खास मित्र असल्याचे गाॅसिप्स मॅगझिनमधून केवढं रंगवून लिहिलं गेले. गुळगुळीत, चकचकीत कागदावरील हे खमंग, चविष्ट गाॅसिप्स मग अन्य भाषेतून पसरले, फोफावले. महेश भट्टचा ‘अर्थ‘ हा चित्रपट त्याच्या परवीन बाबीशी असलेल्या नात्यावरचाच होता. हा निव्वळ योगायोग नाही.
अशी परवीन बाबी कालांतराने परतली ती विचित्र अवतारात, बेढब झालेली, केस विस्तारलेले, हे सगळेच कसं तरी करुन सावरुन तिने आता आम्हा काही निवडक सिनेपत्रकारांना मुलाखती दिल्या (तत्क्षणी माझ्या मनात तिचं बी. आर. इशारा दिग्दर्शित “चरित्र” या तिच्या पहिल्या चित्रपटापासूनचे ग्लॅमरस रुपडं येत होते. क्रिकेटपटू सलिम दुराणी यात तिचा नायक होता आणि एकदा सेटवर ती फलंदाजी करताना सलिम दुराणी विकेट किपींग करीत होता. क्रिकेटर हीरो बनल्यावर काय काय करावे लागेल सांगता येत नाही),
…….आणि मग तिचा मृत्यूही धक्कादायक ठरला. जुहूच्या कालूमल इस्टेट या इमारतीतील तिच्या घराच्या दरवाजाला लावलेली वृत्तपत्रे आणि दूध काढली गेली नाहीत म्हणून पोलीसांना तिचा दरवाजा तोडावा लागला… अशा परवीन बाबीच्या आयुष्यावर आधारित निर्माण होत असलेल्या बायोपिकमध्ये उर्वशी रौतेला परवीन बाबी साकारतेय आणि कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तिने याची झलक दाखवली ही बातमी आता विसरा. खुद्द उर्वशी रौतेला देखिल ही बातमी विसरली असेल. तसं तर आपण व इतरांनी आठवणीत ठेवावे असे कितीसं काम आजचे कलाकार (त्यांना सेलिब्रिटीज म्हणतात) करतात? (Tripti Dimri)
परवीन बाबीचे आयुष्य जेवढे कलरफुल तेवढेच गूढ. असं आणखीन कलाकाराबाबतही कमी अधिक प्रमाणात असतेच. विशेषत: एकटीने आयुष्य जगण्याचा हक्क व हट्ट असलेल्यांबाबत कदाचित असेच असू शकते. अर्थात, त्यांच्या व्यावसायिक आयुष्याचे रसभरित चित्र आपल्या डोळ्यासमोर असते. त्यांच्या खाजगी आयुष्यातील व्दंव्द आपल्याला माहित नसते. यशस्वी अभिनेत्री खाजगी आयुष्यात खरंच आनंदात असेलच असे नसते हेच खरे. अर्थात अनेक कलाकार संपूर्ण आयुष्यात सुखी समाधानी असतात…
नव्वदच्या दशकाच्या पूर्वार्धात परवीन बाबीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट निर्माण झाला असता तर पूजा भट्ट अगदी योग्य निवड होती. पूजा भट्टकडे तसाच बोल्डपणा होता. अभिनयात ती परवीन बाबीपेक्षा सरस होती. नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात हाच चरित्रपट पडद्यावर आणला असता तर सुस्मिता सेन अचूक निवड होती. सुश्मिता सेनचा स्क्रीन प्रेझेन्स परवीन बाबीसारखाच लक्षवेधक. बरं, परवीन बाबी काय, पूजा भट्ट काय आणि सुश्मिता सेन काय या गाॅसिप्स मॅगझिनमधून कायमच चकाकत. ते काही असो, या चरित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनीच करायला हवे. कारण त्यांना कलाकार व माणूस म्हणून परवीन बाबी जास्त माहित. तिची अभिनय मर्यादा व अमर्याद वागणे यांचा समतोल त्यांनाच जास्त माहित. अर्थात, तिचं खाजगी आयुष्य कायमचेच एक गूढ.
आता तृप्ती डिमरी (Tripti Dimri) याच चरित्रपटात परवीन बाबी साकारणार अशी ब्रेकिंग न्यूज. “ॲनिमल”च्या वादळी यशाचा बाॅबी देओल व तृप्ती डिमरीला भरपूर फायदा झाला. सिनेमाच्या जगात यश हेच चलनी नाणे हे अलिखित सर्वकालीन सत्य. तृप्ती डिमरी खरेदीला जावो वा विमानतळावर पाप्पाराझी फोटोग्राफर तिच्यावर धडाधड फ्लॅश उडवणारच. ‘बॅड बाॅईज” या चित्रपटात तिचं भाव खाऊन गेली. यशाने बरेच काही मिळते. त्याच अलिखित नियमानुसार तिला “परवीन बाबी” साकारायला मिळालीय. गंमत म्हणजे, ही बातमी अतिशय वेगाने लाईक्स व काॅमेन्ट्स मिळवत असली तरी या चित्रपटाचा दिग्दर्शक कोण हे मात्र समोर आलेले नाही.
=========
हे देखील वाचा : पूर्वी श्रावण येई तो पौराणिक धार्मिक चित्रपट घेऊन
=========
परवीन बाबीच्या आयुष्यासारखेच हे घडतयं की काय? तृप्ती डिमरीला परवीन बाबी साकारण्यापूर्वी अमर अकबर ॲन्थनी, मजबूर, नमक हलाल, पुकार, महान, क्रांती, रंगबिरंगी असे अनेक चित्रपट पहावे लागतील, सत्तरच्या दशकातील गाॅसिप्स मॅगझिन चाळावी व वाचावी लागतील, यू ट्यूबवर तिच्याबद्दलची माहिती मिळवावी लागेल आणि जमलेच तर महेश भट्ट, डॅनी डेन्झोपा, कबीर बेदी यांची निदान सदिच्छा भेट घ्यावी लागेल… हे तिने स्वतःच करावे. आपल्या टीमवर अवलंबून राहू नये. कारण तृप्तीला परवीन बाबी साकारायची तर तिला तिचं आकलन होवू देत. परवीन बाबी होणे इतकं सोपे नव्हतेच आणि परवीन बाबी साकारणेही आव्हान आहे. आपण तृप्ती डिमरीला (Tripti Dimri) शुभेच्छा तर देवू शकतो.