मैने प्यार किया….लक्ष्मीकांत बेर्डेची आठवण छान होती…
एव्हाना तुम्हालाही माहित्येय, कबूतर जा… जा… जा गाण्याने आजही लोकप्रिय असलेला राजश्री प्राॅडक्सन्स निर्मित व सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित “मैने प्यार किया” (Maine Pyar Kiya) (मुंबईत रिलीज २९ डिसेंबर १९८९) आता २३ ऑगस्टपासून अनेक शहरांतील पीव्हीआर आणि सिनेमॅक्स या मल्टीप्लेक्समध्ये पुन्हा प्रदर्शित होत आहे….कित्ती गोड गोड बातमी.
यानिमित्त काही आठवणी सांगायलाच हव्यात, आजही मला “आपल्या” लक्ष्मीकांत बेर्डेने या चित्रपटात त्याला भूमिका मिळाल्याबद्दलची एक छान आठवण सांगितली होती ती आठवतेय. लक्ष्या प्रत्येक लहान मोठी गोष्ट अगदी खुलवून रंगवून सांगे. ऐकून फ्रेश व्हायला होई.
लक्ष्मीकांत बेर्डेने सांगितले होते, एके दिवशी घरी लॅण्डलाईन फोनवर एक फोन आला, मी राजश्री प्राॅडक्सन्समधून बोलतोय, आमच्या नवीन चित्रपटात नवीन कलाकारांना संधी देत असून आपणासाठीही एक भूमिका आहे. त्यासंदर्भात आपण आमच्या प्रभादेवीतील कार्यालयात यावे…. राजश्री प्राॅडक्सन्स त्या काळात मोठ्याच प्रमाणावर नवीन चेहर्यांना संधी देत असे…. लक्ष्याला वाटले की कोणी तरी आपली मस्करी करतेय…. स्वत: लक्ष्या आवाज बदलून इतर कलाकारांना असाच फोन करायचा, नवीन कलाकार हवेत, तू प्रयत्न कर… आपण जे इतरांबरोबर करतो तेच कोणीतरी आपल्यासोबत करतोय असे समजून लक्ष्या गप्प राहिला… दोन तीनदा असाच फोन आल्यावर त्याला खात्री पटल्यावर पटली, ही थट्टा मस्करी नाही. ही खरोखरची ऑफर आहे… लक्ष्या त्यानुसार राजश्री प्राॅडक्सन्सच्या प्रभादेवीच्या कार्यालयात गेला आणि सूरजकुमार बडजात्याची त्याने भेट घेतली…त्याची गुणवत्तेवर निवड झाली.
“मैने प्यार किया” (Maine Pyar Kiya)च्या अशा अनेक आठवणी. दिग्दर्शक म्हणून सूरजकुमार बडजात्याचा हा पहिलाच चित्रपट. सलमान खान व भाग्यश्री पटवर्धन यांच्यावर अंधेरीतील नटराज स्टुडिओत प्रशस्त घराच्या सेटवर चित्रपटाचे पहिले चित्रीकरण सत्र सुरु असतानाच आम्हा सिनेपत्रकारांना सेटवर शूटिंग रिपोर्टींगसाठी आमंत्रित करताना चार दिवसाचे वेळापत्रक दिले. त्या काळात अशा पध्दतीने आम्हा सिनेपत्रकारांना आवर्जून सेटवर शूटिंग रिपोर्टींगला जायचे योग येत (आता राहिल्या त्या केवळ आठवणी) आणि त्या चार दिवसात कधीही जायची सोय असल्याने तर नियोजन सोपे जाई.
मी सेटवर गेल्यावर रिमा लागू यांची भेट झाली. सलमानच्या आईची भूमिका यात त्यांनी केली यात एक विशेष उल्लेखनीय गोष्ट, तरुण आई हे वळण या चित्रपटापासून आले. याच सेटवर दीड महिन्याच्या शूटिंगमध्ये दोन गाण्यांसह अनेक महत्वाची दृश्य चित्रीत करण्यात आली.
राजश्री प्राॅडक्सन्स आपल्या चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीत कमालीचे उदार असे. भरपूर माहिती व फोटो मिडियाला देण्यात उत्साही. ते देखील त्यांचा प्रतिनिधी वृत्तपत्राच्या कार्यालयात येई. (त्या काळात रहाटे नावाचा त्यांचा भरपूर सहकार्य करणारा प्रतिनिधी होता). हे ध्वनिफितीचे (कॅसेट) युग होते. राजश्री प्राॅडक्सन्सचा चित्रपट म्हणजे पारंपरिक गीत संगीत व नृत्य यांची भरपूर लयलूट. या चित्रपटाची गीते असद भोपाली व देव कोहली यांची तर संगीत राम लक्ष्मण यांचे. चित्रपटाची गाणी ऐकता ऐकता गुणगुणली जावू लागली, गाणी लोकप्रिय होताना ध्वनिफीतीची विक्री वाढत राहिली.
कबुतर जा जा जा, दिल दीवाना बिन सजना के, आया श्याम होने आयी, मेरे रंग मे रंगने वाली…. सिल्व्हर डिस्क, गोल्डन डिस्क असा विक्रम होत असतानाच चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख आली, २९ डिसेंबर १९८९. मेन थिएटर मेट्रोत मॅटीनी शो. आम्हा चित्रपट समीक्षकांना वरळीतील सत्यम चित्रपटगृहात रसिकांसोबत चित्रपट दाखवला…. सेन्सॉर प्रमाणपत्र झाल्यावर श्रेयनामावली सुरु होताच आश्चर्याचा धक्काच बसला. चक्क इंग्लिशमध्ये टायटल्स. राजश्री प्राॅडक्सन्सचा चित्रपट म्हणजे आवर्जून हिंदीत श्रेयनामावली हे त्यांचे दीर्घकालीन वैशिष्ट्य. पण आता बडजात्या कुटुंबातील पुढील पिढी चित्रपट क्षेत्रात आली होती. नवीन दृष्टिकोन व बदलता काळ यांचे समीकरण साध्य केले होते…. चित्रपट सुपरहिट ठरायला वेळच लागला नाही. सगळीकडेच चित्रपटाची जबरदस्त क्रेझ वाढत वाढत राहिली….
=========
हे देखील वाचा : सनी देओलचा रुद्रावतार “अर्जुन पंडित”ची पंचवीशी
=========
ओटीटीच्या दिवसांत ( की विळख्यात?) मल्टीप्लेक्सच्या मोठ्याच पडद्यावर एखादा जुना चित्रपट एन्जाॅय करावासा वाटतो ना? पुन्हा प्रदर्शित होत असलेला “मैने प्यार किया” (Maine Pyar Kiya) चांगलीच संधी. खुद्द भाग्यश्री आपला हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होतोय म्हणून आनंदलीय. आणखीन काय हवे?