अभिनेत्री स्मिता पाटील का खुश होती या दिग्दर्शकावर ?
अगदी मोजक्याच चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाच्या द्वारे जागतिक पातळीवर प्रशंसा प्राप्त करणारी आपली मराठी कलाकार म्हणजे स्मिता पाटील (Smita Patil). अवघे ३१ वर्ष आयुर्मान लाभलेल्या स्मिताने शंभर वर्षात करता येणार नाही इतकं मोठं काम करून ठेवलं आहे. आज स्मिताला आपल्यातून जाऊन चाळीस वर्षाचा कालावधी झाला असला तरी तिच्याबाबतचे अनेक किस्से, अनेक अनटोल्ड स्टोरीज वाचायला ऐकायला मिळतात. स्मिता पाटील हिने पॅरलल आणि कमर्शियल अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटातून भूमिका केल्या. परंतु ती प्रामुख्याने आठवली जाते पॅरलल सिनेमासाठीच.
ऐंशीच्या दशकात तिने काही कमर्शियल चित्रपटात भूमिका मिळवल्या आणि त्या चांगल्या पद्धतीने साकार केल्या. त्यातलीच एक भूमिका होती बी सुभाष दिग्दर्शित ‘कसम पैदा करने वाले की’ या १९८४ साली प्रदर्शित चित्रपटातील. या चित्रपटात तिच्यासोबत मिथुन चक्रवर्ती, सलमा आगा, अमरीश पुरी, करण राजदान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचा क्लायमॅक्स म्हैसूरला शूट होणार होता. या क्लायमॅक्समध्ये सर्व कलाकारांना एकत्र येण्याची गरज होती. काही फाईट सिक्वेन्स तिथे शूट करायचे होते. नेमकं त्याच वेळी इकडे मुंबईला स्मिता पाटीलच्या पायाला फ्रॅक्चर झाले आणि तिच्या पायाला प्लास्टर लावले गेले!
बी. सुभाष तिला भेटायला मुंबईला गेले तेव्हा तिच्या पायाचे प्लास्टर पाहून त्यांना खूप वाईट वाटले. मिथुन त्याकाळी खूप बिझी स्टार होता. सलमा आगा भारतात कमी आणि भारताबाहेर जास्त असे. अमरीश पुरी यांच्या देखील डेट्स मिळणे अवघड होते. हे सर्व एकत्र आणणे तसे कठीण होते आणि स्मिता पाटीलच्या पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे ती शूटिंगला येऊ शकते की नाही असे त्यांना वाटले. स्मिता(Smita Patil)ला बी सुभाष यांच्या चेहऱ्यावरची चिंता लक्षात आली. ती म्हणाली, ”तुमचे खूप मोठे आर्थिक नुकसान होणार आहे ना?” त्यावर बी. सुभाष म्हणाले, ”प्रश्न पैशाचा नाही. डेट्सचा आहे. कारण तुम्ही सर्व कलाकार प्रचंड बिझी आहात आणि यांच्या डेट्स जर मिळाल्या नाहीत तर सिनेमा आणखी साताठ महिने पुढे जाऊ शकतो!” त्यावर स्मिता म्हणाली, ”तुम्ही प्लीज काळजी करू नका. शेड्युल तेच ठेवा. मी तिथे पोहोचते.”
बी. सुभाष यांनी म्हैसूरला शूटिंग शेड्युल ठेवले. स्मिताने डॉक्टरकडे जाऊन आपले प्लास्टर काढून घेतले. डॉक्टरांनी याला आधी नकार दिला परंतु स्मिताने सांगितले मी काळजी घेइन परंतु आता हे प्लास्टर काढणे गरजेचे आहे. फक्त क्रेप बँडेज लावून स्मिता म्हैसूरला रवाना झाली. क्लायमॅक्सच्या सीनमध्ये काही फाईट सिक्वेन्स देखील होते. त्यात स्मिताला देखील काम करायचे होते. बी. सुभाष यांनी त्यासाठी स्मिताची बॉडी डबल वापरायचे ठरवले. परंतु स्मिताने त्याला विरोध केला. ती म्हणाली की “ते खूपच नकली वाटते आहे” तिने ते सीन देखील स्वत: केले.
बी. सुभाष शूटिंग संपल्यानंतर स्मिताला भेटायला गेले आणि तिला म्हणाले की, ”तुमच्यामुळे हे शूटिंग पूर्ण होऊ शकले. मी तुमचा मनापासून आभारी आहे.” त्यावर स्मिता म्हणाली, ”खरं तर मीच तुमचे आभार मानायला पाहिजे. कारण मला सर्वजण एक टाईपच्या भूमिका देतात. ॲक्शन, कॉमेडी मुव्हीमध्ये मला कोणी घेतच नाही. ग्लॅमरस रोल माझ्या वाट्याला कधी येतच नाही. मला हलक्या फुलक्या भूमिका देखील करायला आवडतात. तुमच्या सिनेमात मला असा रोल मिळाला. मीच तुमची आभारी आहे. भविष्यात मला असा टाईपची भूमिका असेल तर नक्की सांगा!”
=========
हे देखील वाचा : एका सुपर फ्लॉप सिनेमाचा सुपर हिट रिमेक गुलजार यांनी बनवला.
=========
बी. सुभाष यांनी स्मिताला आश्वासन दिले की नक्की “मी आपल्याला माझ्या सिनेमात भूमिका देईन.” बी सुभाषने आश्वासन पाळले. स्मिता(Smita Patil)ला ‘डान्स डान्स’ सिनेमात घेतले यात तिने मिथुनच्या बहिणीची भूमिका साकारली होती. सिनेमाची नायिका मंदाकिनी होती. स्मिता खूप आनंदात होती. पण या सिनेमाचा क्लायमॅक्स ती शूट करू शकली नाही. कारण त्या पूर्वीच १३ डिसेंबर १९८६ ला तिचे निधन झाले. ‘डान्स डान्स’ चित्रपट १५ मे १९८७ ला प्रदर्शित झाला. दिग्दर्शक बब्बर सुभाष यांनी अलीकडेच एका प्रकाश वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.