दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
रजनीगंधा @ ५० वर्ष
ते दिवस खूपच वेगळे होते…
पडद्यावरच्या चित्रपटाला, त्यातील गोष्टीला, रसिकांच्या आवडीनिवडीला, संवेदनशीलतेला होते.
प्रमोशन, मार्केटिंग, निर्मितीचे भले मोठे आकडे, चित्रपट यशाचे तसेच अवाढव्य आकडे (पण मुव्हीज पाह्यला फार कोणी नाही असा अनुभव) असे युग येण्यापूर्वीच ते दिवस होते. चित्रपट रसिकांच्या आवडीनिवडीवर यशस्वी ठरत असे. (प्रमोशनच्या बातम्यांवर नव्हे.)
रसिकांच्या संवेदनशीलतेचा आदर ठेवला जात असे आणि त्यातील एक तजेलदार चित्रपट असे, “रजनीगंधा” (Rajnigandha). चित्रपटाचे नाव ऐकताच रसिकांच्या किमान तीन पिढ्या एव्हाना रजनीगंधा फुल तुम्हारे… या गाण्यात हरखून गेल्या असतील. दर्जेदार चित्रपटाचे हेही एक वैशिष्ट्य.
हा चित्रपट मुंबईत १३ सप्टेंबर १९७४ रोजी प्रदर्शित झाला (त्याला पन्नास वर्ष पूर्ण झाली देखिल) राजश्री वितरण हे त्याचे वितरक (पण बराच काळ या चित्रपटाला कोणी वितरकच मिळत नव्हता.) तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत एक स्वच्छ मनोरंजक चित्रपट (क्वालिटी चित्रपट) असे युग येईल अशी कोणी कल्पना केली नव्हती. तत्पूर्वी आणि त्यानंतरही स्वच्छ मनोरंजक चित्रपट पडद्यावर आले. पण सुरेश जिंदाल निर्मित “रजनीगंधा” प्रदर्शित व्हायचे दिवस काही वेगळे होते. राजेंद्रसिंग बेदी दिग्दर्शित “दस्तक“, बी. आर. इशारा दिग्दर्शित “चेतना” ( धाडसी कथानक आणि तशा थीमनुसार दृश्य झालंच, पण पोस्टरवरही “ए” मोठा), प्रकाश मेहरा दिग्दर्शित “जंजीर” (सूडनायक) अशा चित्रपटांच्या यशाने हिंदी चित्रपट कूस बदलत होता.
मृणाल सेन दिग्दर्शित “भुवन शोम“ने हिंदीत समांतर चित्रपटाची बीजे रुजवली आणि श्याम बेनेगल दिग्दर्शित “अंकूर“ने ती वाढवली, यात आणखीन एका प्रवाहाने आपली एक वाट निर्माण केली, स्वच्छ मनोरंजक चित्रपट. जो क्लिष्ट नसेल आणि सवंग(ही) नसेल, याचा मध्यममार्ग म्हणजेच स्वच्छ चित्रपट.
बासू चटर्जी त्याचे एक प्रकारचे फाऊंडर मेंबर. “रजनीगंधा” (Rajnigandha) मुंबईत आकाशवाणी चित्रपटगृह (चर्चगेट, मंत्रालय परिसरात होते. ऐंशीच्या दशकात बंद झाले), जेमिनी (वांद्रा) आणि मायनाॅर (अंधेरी. तेही बंद. अंबर, ऑस्कर व मायनाॅर अशी तिळी चित्रपटगृह होती, त्याजागी शाॅपर्स स्टाॅप आले आहे) अशा मोजून तीन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि तीनही ठिकाणी पंचवीस आठवड्यांचा मुक्काम केला. मुंबईत रौप्य महोत्सवी आठवडा सुरु होताच अहमदाबाद येथील नटराज चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्या काळात असेच टप्प्याटप्प्याने चित्रपट प्रदर्शित होताना त्याची महती आणि माहिती मुद्रित माध्यमातून आणि रेडिओ, लाऊडस्पीकीवरील गाण्यातून दूरवर पोहचत असे.
‘रजनीगंधा’ (Rajnigandha) ची गोष्ट अमोल पालेकर, विद्या सिन्हा, दिनेश ठाकूर या तिघांभोवतीची. बासूदांनी सुरुवातीस या चित्रपटासाठी शशी कपूर, शर्मिला टागोर व अमिताभ बच्चन यांच्या नावाचा विचार केला होता (अमिताभचा हा सुरुवातीचा काळ होता), पण ते शक्य न झाल्याने समित भांजा व अपर्णा सेन यांच्या नावाचा विचार केला. अशातच मुंबईत एका भेटीत त्यांनी अमोल पालेकरना मनू भंडारी यांचे १९६० साली प्रकाशित झालेले “यही सच है” हे पुस्तक वाचावयास दिले. अमोल पालेकरनी एकाच बैठकीत हे पुस्तक वाचले आणि बासूदांना या चित्रपटांसाठी होकार दिला आणि अमोल पालेकरनी मराठीतून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. (त्या काळात अमोल पालेकर आमच्या गिरगावातील गावदेवीत राह्यचा. )
“रजनीगंधा” (Rajnigandha) नावावरुनच नायिकाप्रधान. या सिनेमाचे संवादलेखन आणि दिग्दर्शन बासू चटर्जी यांचे. कथा साधारण अशी दीपा कपूर (विद्या सिन्हा) आणि संजय (अमोल पालेकर) या दोघांची ओळख आणि मग त्याचे हळूहळू रुपांतर प्रेमकथा व मग त्या नात्याचा लग्नापर्यंत पोहचण्याचा हा प्रवास आहे. दीपा संजयच्या मागे लग्न करूया म्हणून लागलीय आणि संजय नोकरीत स्थिरसावर झाल्यावर, प्रमोशन झाल्यावर लग्न करूयात या मताचा अर्थात मध्यमवर्गीय मानसिकतेचा. दररोज सायंकाळी भेटत राहणे हा त्यांचा उपक्रम. लहान मोठ्या खेळकर, खोडकर गोष्टींतून चित्रपट रंगतो. गोष्ट आकार घेते.
अशातच दीपा मुंबईमध्ये प्राध्यापक पदाच्या नोकरीसाठी अर्ज करते आणि तिला मुलाखतीसाठी संधी मिळते. संजयही या गोष्टीवर खुश होतो आणि तुला मुंबईत नोकरी मिळाली तर मी बदली करून मीही येतो असे सांगतो. संजय दीपाला सोडायला नेहेमीप्रमाणे “रजनीगंधा” (Rajnigandha)ची फुले घेऊन रेल्वेस्टेशनवर येतो. हा खास दिग्दर्शक टच.
मुंबईत पोहचल्यावर तिला रिसिव्ह करायला येतो तो नेमका तिचा भूतपूर्व प्रेमी नवीन (दिनेश ठाकूर). दीपाच्या मैत्रिणीने इराने (रंजिता ठाकूर) त्याला तिथे पाठवलेले असते. नवीन तिला तिच्या मैत्रिणीच्या घरी सोडतो, एवढंच नाही तर अतिशय मैत्रीत तिला तिथे कॉफीही करुन देतो. दीपा यामुळे अवघडलेली असते. थोडी आठवणीत जाते. तिला वाटू लागते, नवीन किती बदलल्यासारखा वाटतोय. तरीही तो असा अनपेक्षित आलेला नि भेटलेला तिला आवडत नसते. तिला ते खटकते. कधी काळी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे हे युगुल नवीनच्या हेकेखोर स्वभावामुळेच दुरावलेले असते. ही या गोष्टीची दुसरी बाजू.
नातेसंबंधाची ही हळुवार गोष्ट. बासूदा ती अनेक छोट्या गोष्टींसह खुलवतात. प्रियकर आणि अचानक भेटलेला पूर्वायुष्यातील प्रियकर, आणि प्रेयसीची झालेली घुसमट हे रंगलेय. अशा प्रकारचे नायिकेचे व्यक्तिमत्व हे त्या काळात हिंदी चित्रपटात काहीसे नवीन होते. चित्रपटात हेलन व विश्वजीत पाहुणे कलाकार आहेत. योगेशच्या गीतांना सलिल चौधरी यांचे संगीत याने चित्रपटाच्या तरलतेत भर घातलीय.
==========
हे देखील वाचा : जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित, हा खेळ खूपच जुना
==========
रजनीगंधा फूल तुम्हारे (पार्श्वगायिका लता मंगेशकर), कहीं बार यू भी देखा है…( मुकेश) दोन्ही गाणी क्लासिक. कहीं बार यूं ही गाण्यात पन्नास वर्षांपूर्वीच्या मुंबईचे दर्शन घडते. चित्रपटातील जुनी मुंबई हाही एक अभ्यासाचा विषय. “चित्रपटातून बदलते मुंबई दर्शन”. एक दीर्घकालीन प्रवास.
अमोल पालेकर यांची भूमिका असलेले पहिले तीन चित्रपट दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे आणि तीनही रौप्य महोत्सवी हिट. रजनीगंधा, छोटी सी बात ( मुंबईत मेन थिएटर अप्सरा मॅटीनी शो) आणि चितचोर ( ऑस्कर चित्रपटगृहात रौप्य महोत्सवी) हे ते चित्रपट. आणि स्वच्छ मनोरंजक चित्रपट रुजण्यात ते पूरक ठरले. त्यात गुलजार दिग्दर्शित “आंधी“, ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित “गोलमाल“, बासू भट्टाचार्य दिग्दर्शित “गृहप्रवेश” अशा आणखीन अर्थपूर्ण चित्रपटांची भर पडली. रजनीगंधाची कालांतराने म्हणजेच २०१२ साली बंगालीत “होथन शेडिंग” या नावाने रिमेक आली.
===========
हे देखील वाचा : “निशांत” पन्नाशीत….
===========
आज मल्टीप्लेक्समध्ये अनेक जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित होत असतानाच “रजनीगंधा” पुन्हा दरवळावा असे मनापासून वाटणे स्वाभाविक. काही चित्रपट कधीच जुने होत नाहीत, पडद्याआड जात नाहीत, ते कायमच ताजे नि आजचे राहतात. “रजनीगंधा” (Rajnigandha) अगदी तसाच. कालचा आणि आजचाही. इतकेच नव्हे तर उद्याचाही.