साहिर लुधियानवी यांच्यामुळे मिळाली गीतकारांना स्वतंत्र ओळख!
हिंदी सिनेमाच्या गोल्डन इरामधील गीत संगीताने रसिकांना आज देखील मोहून टाकलेले आहे. जगभरात भारतीय सिनेमाची ओळख हा संगीतमय सिनेमा अशीच आहे. पन्नासच्या दशकामध्ये जेव्हा भारतीय चित्रपट संगीत मेलडीच्या चरम सीमेवर होतं तेव्हा मात्र भारतातील रेडिओवर चित्रपट संगीत प्रसारण करण्याला बंदी होती! त्यामुळे भारतीय रसिकांची मोठी कुचंबना होत होती. कारण घरी ग्रामोफोन असणं ही गोष्ट सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरची गोष्ट होती. रेडिओ हेच खरं तर स्वस्त आणि सहज उपलब्ध होईल असं माध्यम होतं. (Sahir Ludhianvi)
अर्थात रेडीओ असणं हे सुध्दा श्रीमंती चैन होती. परंतु रेडीओ या माध्यमातून आपल्या देशात भारतीय चित्रपट संगीत गायब झाले होते. याचा फायदा शेजारच्या रेडिओ सिलोनने उचलला. जेव्हा आपल्या देशातील जाहिरातीचा स्त्रोत तिकडे जाऊ लागला तेव्हा सरकारचे डोळे उघडले आणि भारतात विविध भारती सुरु झाले. विविध भारतीवर मग भारतीय चित्रपट संगीत नित्यनेमाने सुरू झाले. परंतु त्यात देखील गंमत झाली. गीतकाराचे नाव कधीच सांगितले जात नसायचे. ही गोष्ट गीतकार साहिर लुधियानवी (Sahir Ludhianvi) यांना खूप खटकत होती. कारण कोणतेही गाणे तयार होण्यामध्ये गीतकार संगीतकार आणि गायक या तिघांचेही ‘इक्वल कॉन्ट्रीब्युशन’ असते.
गीतकार आणि संगीतकार हे दोघे तर एकत्र बसून काम करत असतात. परंतु जेव्हा गाणे त्या काळात रेडिओवर प्रसारित व्हायचे; तेव्हा फक्त संगीतकार आणि गायक यांचे नाव जाहीर केले जायचे. गीतकारांची कामगिरी मात्र दुर्लक्षित रहायची. त्या काळात चित्रपटाच्या पोस्टरवर देखील फक्त दिग्दर्शक, कलावंत आणि संगीतकार यांचीच नावे असायची. गीतकाराला कुठेही तिथे जागा नसायची. ही सावत्रपणाची भावना का? हा पंक्ती प्रपंच कशासाठी? असा प्रश्न साहीर यांना नेहमी पडायचा. परंतु इतर गीतकार मात्र याबाबत तितकेसे गंभीर नव्हते. साहिर लुधियानवी (Sahir Ludhianvi) यांनी याबाबत मोठ्या प्रमाणावर जागरूक ता निर्माण केली.
साहीर लुधियानवी (Sahir Ludhianvi) तर आपल्या चित्रपटातील संगीतकारापेक्षा एक रुपया जास्त मानधन घेत असे.कोणताही चित्रपट साइन करताना साहीर लुधियानवी ही अट पहिल्यांदा टाकत असे. यामुळे त्याचे अनेक संगीतकारांसोबत मतभेद देखील झाले. सचिन देव बर्मन, ओपी नय्यर तर यामुळे दुखावले देखील होते. पण साहीर लुधियानवी यांना आपल्या लेखणीचा अभिमान होता. त्यांना या लेखणीची ताकत माहिती होती. फक्त या लेखणीला व्यवस्थित आयडेंटिटी मिळत नाही हे त्यांचे दुःख होते.
साठच्या दशकाच्या प्रारंभी फिल्म रायटर्स असोसिएशन ही एक संघटना होती. चित्रपटात लेखक म्हणून काम करणारे तसेच गीते लिहिणारे गीतकार या सर्वांची ही संघटना होती. या संघटनेचे प्रमुख होते ख्वाजा अहमद अब्बास. या संघटनेच्या उपाध्यक्षपदी साहीर लुधियानवी (Sahir Ludhianvi) यांची नेमणूक झाली आणि त्यांनी आता ठरवले की या पदाचा आपण लेखक मंडळींना स्वतंत्र ओळख मिळवून देण्यासाठी वापर करू! ख्वाजा अहमद अब्बास आणि साहीर यांनी याचा एक व्यवस्थित प्रोग्राम तयार केला. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, त्याचप्रमाणे मीडिया हाऊसेस, आणि आकाशवाणी या सर्वांच्याकडे ते गेले आणि आपला मुद्दा पटवून सांगितला.
शेवटी ते डायरेक्टर जनरल ऑफ ऑल इंडिया रेडिओ यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले. साहीर यांनी त्यांना आपली भूमिका स्पष्टपणे सांगितले. तेव्हा डीजी म्हणाले, ”अहो आम्हाला अनेक नावे सांगावे लागतात. सगळ्यांचीच नावे सांगू लागलो. तर गाणं कोण ऐकणार?” त्या त्यावर साहीर म्हणाले, ”तुम्ही फर्माईशी कार्यक्रमात दोन नावे कमी सांगितली चालतील पण ज्या व्यक्तींनी गाणी लिहिली आहेत त्याचे नाव का सांगत नाही? ज्याचे त्याला क्रेडिट दिलेच पाहिजे.
रेडिओ हे जनसामान्यांपर्यंत पोहोचणारे प्रभावी माध्यम आहे तिथून व्यवस्थित माहिती पोहोचायलाच हवी!” साहिर (Sahir Ludhianvi) यांचा तर्कशुध्द मुद्दा डीजी साहेबांना पटला आणि लगेच त्यांनी तसा जीआरच काढला. या जीआरमध्ये भारतातील सर्व नभोवाणी केंद्रात जिथे जिथे सिनेमातील गाणी प्रसारित होत तिथे संगीतकाराच्या सोबतच गीतकार आणि गायकाचे नाव जाहीर करणे बंधनकारक असल्याचे नमूद केले.
===========
हे देखील वाचा : ‘कस्मे वादे निभायेंगे हम…’ गाण्याच्या मेकिंगची भन्नाट गोष्ट!
===========
साहीर (Sahir Ludhianvi) यांच्या या कृतीने खऱ्या अर्थाने गीतकार या कम्युनिटीला न्याय मिळाला. त्यांना त्यांची स्वतःची ओळख मिळाली. सर्व गीतकार त्यामुळे साहीर लुधियानवी यांचे कायमचे ऋणी राहिले. नंतर फिल्म रायटर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी देखील साहिर यांनी काम केले. साहिर यांचे चित्रपटातील कॉन्ट्रीब्युशन फार मोठे आहे. १९७१ साली त्यांना पद्मश्री या पुरस्काराने गौरवण्यात आले होते!