‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
सुभाष घई नायक, सहनायक
शीर्षक हे लेखाची ओळख स्पष्ट करते याची तुम्हा जाणकार रसिक प्रेक्षकांना कल्पना आहेच. अशा वेळी “सुभाष घई नायक, सहनायक” असे वाचून दचकलात ना? शीर्षक साफ चुकलयं अशीच एव्हाना तुमची प्रतिक्रिया असेल. सुभाष घई ‘शोमन’ निर्माता आणि दिग्दर्शक असे हवे असे तुम्ही म्हणाल. पटकथेची उत्तम जाण असलेला, रुपेरी पडद्यावर गीत संगीत व नृत्याचे बेहतरीन सादरीकरण करणारा सुभाष घई (Subhash Ghai) असे तुम्ही अधिक तपशीलात जात म्हणाल. पण कदाचित तुम्हाला कल्पना नसेल दिग्दर्शक होण्यापूर्वी सुभाष घई हिंदी चित्रपटात अभिनय करायचा, मग पटकथा लेखक झाला, पण एकदम “पिक्चरचा हीरो?” कसे शक्य आहे? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात घोळत असतीलच.
पुणे शहरातील चित्रपट व दूरदर्शन अभिनय संस्थेतून (एफटीआयआय) अभिनय प्रशिक्षण घेतल्यावर सुभाष घईनी अभिनेता म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणे स्वाभाविक होतेच. त्याने फिल्मफेअर आणि युनायटेड प्रोड्युसर यांच्या टॅलेंट हंट स्पर्धेत भाग घेतला, त्यात राजेश खन्ना, धीरजकुमार, सुभाष घई हे सर्वोत्तम तिघे निवडून आले. या निवडीने सुभाष घई (Subhash Ghai)ला काही चित्रपट मिळाले देखिल.
राजश्री प्राॅडक्सन्सचा “तकदीर” (१९६७) हा नवा नायक म्हणून सुभाष घईचा पहिला चित्रपट. फरिदा जलाल त्यात नवीन नायिका होती. तर शक्ती सामंता दिग्दर्शित “आराधना” (१९६९)मध्ये दुहेरी भूमिकेतील राजेश खन्नापैकी मुलगा पायलट बनतो त्याच्या मित्राच्या भूमिकेत सुभाष घई (Subhash Ghai) आहे. सुभाष घई “गुमराह” नावाच्या चित्रपटात रिना रॉयचा नायक होता. या चित्रपटात डॅनी डेन्झोपा, केश्तो मुखर्जी, इफ्तेखार आणि शीतल यांच्याही भूमिका आहेत. सत्तरच्या दशकातीलच हा चित्रपट आहे आणि मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर ताडदेव नाक्यावरचे जमुना हे होते.
अर्थात, हा चित्रपट प्रदर्शित झाला हेच पुरेसे आहे. अन्यथा असे अनेक चित्रपट पूर्ण होऊनही कायमचे डब्यात पडून आहेत. या चित्रपटाला अजिबात यश मिळाले नाही अन्यथा सुभाष घई (Subhash Ghai) अॅक्टींगमध्येच करियर करत राहिला असता. सहनायक, कदाचित व्हीलन, मग चरित्र भूमिका अशी वाटचाल त्याने सुरु ठेवली असते. त्यापेक्षा तो यशस्वी निर्माता आणि दिग्दर्शक झाला ते फारच बरे झाले. त्यात त्याचा ठसा उमटवलेला आपण पाहतो आहोतच आणि दबदबा तर आहेच आहे. त्याला स्वतःलाच आपला हा ‘गुमराह’ चित्रपट आठवत असेल का हा मात्र प्रश्नच आहे आणि तो अजिबात चुकीचा नाही.
सुभाष घईने “ग्रहण” नावाच्या चित्रपटात नूतनचा नायक साकारला. पण हा चित्रपट जेमतेम आठवडाभर थिएटरमध्ये टिकला. सोहनलाल कंवर दिग्दर्शित “नाटक” या चित्रपटात विजय अरोरा नायक आणि मौशमी चटर्जी नायिका असतानाच सुभाष घई (Subhash Ghai) सहनायक होता. याच सुभाष घईचा “हिरो“वाला आणखीन एक चित्रपट “उमंग“. हा चित्रपट मुंबईत ९ ऑक्टोबर १९७० रोजी प्रदर्शित झाला. (मेन थिएटर अलंकार). म्हणजेच या चित्रपटाच्या प्रदर्शनास तब्बल चोपन्न वर्ष पूर्ण झाली देखिल. बलदेव खोसा आणि अर्चना असे आणखीन दोन नवीन चेहरे या चित्रपटात होते. (बलदेव खोसाने कालांतराने राजकारणात प्रवेश करुन अंधेरीतील आंबोली विधानसभा मतदारसंघात दोनदा “भारी वोटों” से जिंकून आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले.)
“उमंग” या चित्रपटाबाबत आणखीन काही विशेष आहेच, हा चित्रपट गुरुदत्त फिल्म या बॅनरचा होता (गुरुदत्तच्या निधनानंतर त्याचा भाऊ आत्माराम यानी या बॅनरखालील चित्रपट निर्मिती व दिग्दर्शन कायम ठेवले.) आत्माराम यांनी नवीन युवकांना संधी मिळेल म्हणून “उमंग”ची निर्मिती केली तर विशेष म्हणजे या चित्रपटाचे लेखन गुलजार यांचे आहे. गुलजार आणि कलाकार सुभाष घई (Subhash Ghai) अशी जोडी या चित्रपटापुरती जमली, त्यानंतर ते कधीच एकत्र आले नाहीत. याचं कारण, दोघांची चित्रपट संस्कृती वेगळी. त्यांची नुसती नावे घेतली तरी हे वेगळेपण अधोरेखित होतेय अशी व ऐवढी झक्कास प्रगती केलीय. ही दोन स्वतंत्र व्यक्तिमत्त्वे.
नायक वा सहनायक म्हणून वाटचाल करणे अवघड झाल्याने सुभाष घईनी बी. बी. भल्लासोबत पटकथा लेखक म्हणून लेखणी हाती धरली आणि दुलाल गुहा दिग्दर्शित खान दोस्त (प्रमुख भूमिकेत राज कपूर, शत्रुघ्न सिन्हा व मिठू मुखर्जी), प्रकाश मेहरा दिग्दर्शित “आखरी डाकू” (रणधीर कपूर रेखा, विनोद खन्ना, रिना रॉय व सुजीतकुमार) अशा काही चित्रपटांच्या पटकथा लेखनानंतर एन. एन. सिप्पी निर्मित “कालीचरण” ( १९७६) पासून सुभाष घई (Subhash Ghai)नी दिग्दर्शक म्हणून वाटचाल सुरु केली ती सतत पुढील पावले टाकणारी…
सुभाष घईची नायक बनण्याची दोनदा हुकलेली संधी राजेश खन्नाच्या पत्थावर पडली याची कल्पना आहे? जी. पी. सिप्पी निर्मित “राज” (१९६७) मधील एका नवीन चेहर्याच्या कामाबद्दल दिग्दर्शक दवे खुश नव्हते. अशातच सुभाष घईची जी. पी. सिप्पी यांच्याशी भेट झाली असता, ऑफिसला येवून भेटायला सांगितले. काही दिवसांनी सुभाष घई (Subhash Ghai) सिप्पी फिल्मच्या खारच्या ऑफिसमध्ये जाईपर्यंत “राज” चित्रपटासाठी राजेश खन्नाची निवड झाली….
============
हे देखिल वाचा : एक दिवसाचे नाटक आहे का हो?
============
नासिर हुसेन यांच्या निर्मिती संस्थेसाठी दिग्दर्शक विजय आनंद “तिसरी मंझिल” मध्ये गुंतला असतानाच आपण एक छोटा आणि बजेट वाचवण्यासाठी ब्लॅक अँड व्हाईट अर्थात कृष्ण धवल चित्रपट निर्माण करावा म्हणून नासिर हुसेन यांनी “बहारों के सपने” या चित्रपटाची तयारी सुरु केली. सुभाष घई (Subhash Ghai) तेव्हा नवीनच असल्यानेच अनेक निर्माता व दिग्दर्शकांची भेट घेत होता. नासिर हुसेन यांच्याशीही भेट झाली आणि पंधरा दिवसांनी ये असेही म्हटले. सुभाष घई पंधरा दिवसांनी नासिर हुसेन यांच्या भेटीसाठी जाईपर्यंत याही चित्रपटात राजेश खन्ना आला…
सुभाष घई नायक सहनायक खेळीतील असेही काही रंग “उमंग“च्या निमित्ताने…