ती गाणे देखिल गायलीय….
अमिताभ बच्चन जे जे करायचा ते मॅडम रेखाने ही करणे यात आश्चर्य नव्हतेच आणि यशस्वी माणसाला “फाॅलो” करायचे नाही तर मग कोणाला करायचे? त्यात भर सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात त्या दोघांच्या घनिष्ठ मैत्रीच्या कथा, दंतकथा, गप्पा, गोष्टी, गाॅसिप्स फार रंगल्या (त्या अजूनही संपलेल्या नाहीत. सिनेमाने सिंगल स्क्रीन थिएटर्सकडून ओटीटीपर्यंत प्रवास केला तरी गाॅसिप्स म्हटलं की रेखा (Rekha) अमिताभ हे घट्ट समीकरण)
अमिताभ ॲन्ग्री यंग मॅन म्हणून रेखाने ही राकेश रोशन दिग्दर्शित “खून भरी मांग” (१९८८) मध्ये सूडनायिका साकारली आणि पिक्चर सुपर हिट. रेखाने ही डॅशिंग भूमिका सडेतोड साकारली. समिक्षक व चित्रपट रसिक अशा दोघांचीही वाहव्वा मिळवली.
खरं तर असेच मानले गेले, रेखा म्हणजे काहीही अशक्य नाही, रेखा (Rekha) म्हणजे आकर्षक फोटो सेशन, रेखा म्हणजे अष्टपैलूत्व, रेखा म्हणजे बातमी, रेखा म्हणजे चर्चा असे का एकदा तुम्ही मान्य केले की रेखाबाबत अनेक प्रकारच्या गोष्टी जाणून घेण्यातील तुमची उत्सुकता आपोआपच वाढेल आणि रेखाच्या तब्बल चौपन्न वर्षांच्या रुपेरी वाटचालीत हे काही अनपेक्षित (धक्का तंत्र) गोष्टी तिची खासियत राहिली आहे.
अशीच रेखा (Rekha) चक्क गाणेही गायलीय. आजच्या यू ट्यूब डिजिटल युगात कोणीही कसेही केव्हाही आणि काहीही गातेय ते ऐकू नका आणि पाहू देखिल नका. पण ऐशीच्या दशकापर्यंत स्टारने गाणे हे अपवादात्मक होते. ती आश्चर्याची बातमी होती. पण रेखा गायली. कोणते गाणे गायली ते नक्कीच सांगतोय. तोपर्यंत अमिताभ बच्चन गायक म्हणूनही ओळखला जाऊ लागला म्हणूनच रेखाला सूर सापडला का? असा प्रश्न का बरे पडला? तिचा आवाज लागला का? हा ही अनावश्यक प्रश्न. राकेशकुमार दिग्दर्शित ‘मिस्टर नटवरलाल‘ (१९७९) साठी अमिताभ मेरे पास आयो मेरे दोस्तो हे गाणे गायला आणि हे गाणे हिट झाल्याने अमिताभ सिलसिला, पुकार इत्यादी चित्रपटासाठी गायला. त्याचे हिंदी अतिशय उत्तम नि स्वच्छ आहे. त्याच्या यशात स्पष्ट शब्दोच्चाराचाही वाटा.
आता अमिताभ जे जे काही चांगले करतोय ते आपणही करायला काय हरकत आहे असा स्फूर्ती घेणारा प्रश्न नक्कीच पडू शकतो आणि चांगल्या यशस्वी गोष्टीचा आदर्श ठेवण्यात चूक काहीही नाही. रेखाने लेख टंडन दिग्दर्शित ‘अगर तुम न होते‘ (१९८३) या चित्रपटासाठी गायली. हे गुलशन बावरा याने लिहिलेल्या गाण्याला राहुल देव बर्मनचे संगीत आहे. या गाण्याचा मुखडा आहे, कल तो संडे की छुट्टी… रेखा आणि शैलेन्द्रसिंग हे गाणे गायले. पडद्यावर हे गाणे राज बब्बर आणि रेखावर आहे. रेखाला प्रामुख्याने लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी पार्श्वगायन केले. त्या एक्प्रेशन मेलडीच्या उत्तम जाणकार. गाण्याचे व कलाकाराचे व्यक्तिमत्व नेमके पकडणार.
पडद्यावर गाणे पाहताना खुद्द रेखाच ते गाते आहे असे वाटते हे तर मंगेशकर भगिनींचे कौशल्य आहे. पण आपणही गायला काय बरे हरकत आहे असा सकारात्मक विचार रेखाच्या मनात येऊ शकतो. व्यावसायिक कलाकार म्हणून कारकिर्द साकारताना लहान मोठ्या अनेक गोष्टी जमायला हव्यात हे पुन्हा वेगळे सांगायला नकोच. आजच्या ग्लोबल युगात तर तुम्ही अष्टपैलू असाल तर टिकाल अशी स्थिती आहे. अमिताभ काय नि रेखा काय हे तर केव्हापासूनच गुणी, अष्टपैलू व मेहनती.
=============
हे देखील वाचा : अशी ही बनवाबनवी ३६ पूर्ण !
=============
रेखा (Rekha)ने तेच अष्टपैलुत्व दाखवले आणि स्वतःसाठी गायली आणि ते दखिल अतिशय हसत खेळत गायलीय. अगदी पद्यातच गायला हवे असे काही नसतेच म्हणा. रेखा गायलीय हीच मोठी बातमी. रेखाच्या वाढदिवसानिमित्त काही वेगळे सांगू यात असाच विचार केला आणि तिचं “गायिका” म्हणून रुप सांगितले. तिने रुपेरी पडद्यावर साकारलेल्या गाण्यात सर्वोत्कृष्ट गाणे मात्र मुजफ्फर अली दिग्दर्शित “उमराव जान” (१९८२) मधील आशा भोसले यांनी पार्श्वगायन केलेली इन ऑखो की मस्ती के मस्ताने हजारो है…. शहरयार लिखित आणि खय्याम यांचे संगीत. कितीदाही ऐका/ पहा/ आठवा/ गुणगुणा/ ओठांवर आणा तोच तजेलदारपणा आणि तीच उर्जा. आणखीन हवे तरी काय?