‘व्यक्ती आणि वल्ली’साठी खुद्द पु. ल. देशपांडेनीच केली होती अतुल यांची निवड
अतुल परचुरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अतिशय हुशार, हरहुन्नरी, बहुआयामी अभिनेता अशी ओळख कमावलेल्या अतुल यांनी आपल्या अभिनयाने सर्वांचे भरभरून मनोरंजन केले. रंगभूमीवरील खरा रंगकर्मी म्हणून देखील त्यांना ओळखले जायचे. विनोदी अभिनेता अशी ओळख असलेल्या अतुल यांनी कधीच कोणत्याही एका भूमिकेत किंवा एक सारख्या भूमिकांमध्ये न अडकता विविधांगी भूमिका साकारल्या.
जवळपास चार दशकं या क्षेत्रात काम करणाऱ्या अतुल यांना खरी ओळख मिळाली ती पु. ल. देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या नाटकामुळे. या नाटकासाठी खुद्द पु. ल यांनीच अतुल यांची निवड केली होती. याबद्दल त्यांनी एका मुलाखतीमध्ये देखील भाष्य केले. अतुल यांना या नाटकामध्ये काम करण्याची संधी कशी मिळाली जाणून घेऊया.
‘ब्रँड अँबॅसिडर ऑफ पु.ल.देशपांडे’ अशी ओळख असलेल्या अतुल परचुरे यांनी १९९५ साली एकदा वृत्तपत्रामध्ये वाचले होते की, ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे नाटक रंगभूमीवर येत आहे. अतुल हे पु ल यांचे खूप मोठे चाहते होते. त्यातही पु ल यांचे ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे पुस्तक तर त्यांना तोंडपाठ होते. त्यांना जेव्हा समजले या पुस्तकावर नाटक येते तेव्हा त्यांना मनोमन वाटले की यात आपण एक भूमिका करावी. किंवा या नाटकात आपल्याला एक भूमिका मिळावी. अतुल यांनी या नाटकात मुख्य भूमिकेसाठी विक्रम गोखले किंवा दिलीप प्रभावळकर यांच्यापैकी एकाची निवड होईल असा विचार केला होता. त्यांना या नाटकातील भूमिका भूमिकेसाठी विचारणा होईल असे त्यांना कधीच वाटले नव्हते.
मात्र एक दिवस अतुल यांना निर्मात्याचा फोन आला आणि त्यांनी अतुल यांना ”तू व्यक्ती आणि वल्लीमधील पु.लं. रोल करशील का?” अशी विचारणा केली. यातली सर्वात महत्वाची बाब म्हणजे खुद्द पु ल यांनी देखील व्यक्ती आणि वल्ली नाटकासाठी अतुल यांच्या नावाला होकार दिला होता.
अतुल यांनी पुढे सांगितले होते की, त्याकाळी त्यांची पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व किंवा त्यांचे बाह्य व्यक्तिमत्व तरुण काळातील पु.ल. यांच्याशी मिळते जुळते होते. अतुल यांना विचारण्यापूर्वीच नाटकाच्या निर्मात्यांनी पु.ल. ना विचारले होते की अतुल परचुऱ्यांना ही भूमिका द्यायची का? त्यावर पु.ल. यांनी देखील लगेच होकार सुद्धा दिला होता. मात्र तेव्हा अतुल यांची पु.ल. यांच्याशी ओळख नव्हती. नेमका त्याच काळात पु. ल यांच्या आजारपणाला सुरुवात झाली होती.
=============
हे देखील वाचा : तब्बल अठरा वर्षाचा काळ लागला ‘हे’ गाणे बनायला
=============
मुख्य गोष्ट म्हणजे पुलंसमोर पु.ल साकारणारे अतुल परचुरे एकमेव अभिनेते होते. कारण, ९५ साली व्यक्ती आणि वल्ली नाटक आले आणि ते साधारण दोन-तीन वर्ष चालले आणि त्यानंतर ते नाटक थांबले गेले. २००१ मध्ये दुर्दैवाने पुलं यांचे निधन झाले. त्यानंतर पुन्हा हे नाटक रंगभूमीवर आले मात्र तेव्हा ते नाटक आणि त्या नाटकातील पुलं पाहायला स्वतः पुलं समोर नव्हते.
दरम्यान अतुल परचुरे यांचे १४ ऑक्टोबर २०२४ रोजी निधन झाले. त्यांनी मराठीमध्ये नाटक, मालिका, चित्रपट अशा सर्वच माध्यमांमध्ये काम करत रसिकांचे मनोरंजन केले. यासोबतच त्यांनी अनेक हिंदी शो आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. अतुल यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे,