दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
अनुपम खेर यांना वडिलांनी कोणता कानमंत्र दिला होता?
दोन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, तब्बल वीस वेळा फिल्मफेअरचं नामांकन आणि त्यापैकी नऊ वेळेला पुरस्कार, ब्रिटिश ॲकॅडमी टेलिव्हिजन ॲवॉर्ड तसेच पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित झालेले अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी मागच्या ४० वर्षात रुपेरी पडदयावर आपल्या अभिनयाचे विविध रंग रसिकांना दाखवले. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेतून अभिनयाची पदवी घेतल्यानंतर त्यांना स्वत:ला बॉलीवूडमध्ये सिद्ध करण्यासाठी मायावी नगरीत भरपूर संघर्ष करावा लागला. त्या सर्व संघर्षाला सक्षमपणे तोंड देत खचून न हरता त्यांनी आपली वाटचाल पुढे चालू ठेवली. (Anupam Kher)
गुणवत्ता तर त्यांच्यात होतीच पण ती सिद्ध करण्यासाठी ते पूर्ण ताकदीने उतरले आणि यशाची एक घवघवीत अशी मालिका निर्माण केली. अनुपम खेर (Anupam Kher) यांना जेव्हा त्यांच्या या संपूर्ण कालखंडाविषयी विचारलं त्यावेळी याच संपूर्ण श्रेय त्यांनी आपल्या वडिलांना दिलं. वडिलांनी लहानपणी त्यांना दिलेला मोलाचा संदेश आयुष्यभर त्यांच्या उपयोगी ठरला. अनुपम खेर (Anupam Kher) यांनी एका मुलाखतीत हा सर्व प्रसंग सांगितला होता. तो सल्ला नेमका कोणता जाणून घ्या !
७ मार्च १९५५ या दिवशी सिमला येथे जन्मलेल्या अनुपम खेर (Anupam Kher) यांचे बालपण एका सर्वसामान्य कुटुंबात गेले. त्यांचे वडील हिमाचल प्रदेशच्या जंगल खात्यामध्ये क्लर्क होते तर आई गृहिणी होती. अभ्यासातही त्यांना तशी फारशी गती नव्हती. पण त्यांच्या पालकांनी मुलांना वाढवताना ॲकॅडमिक यशापेक्षा सामाजिक जीवनातील यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला.
अनुपम सिमलाच्या डी.ए.व्ही या स्कूलमध्ये दहावीला असताना त्यांचे वडील शाळेत त्यांना भेटायला आले. अनुपमला (Anupam Kher) घेऊन ते सिमल्यातील एका मोठ्या नामांकित हॉटेलमध्ये गेले. हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी अनुपमला सांगितले, ”आज तुझ्या आवडीचे जे पदार्थ आहेत ते सर्व सांग. आज आपल्याला मस्त पार्टी करायची आहे!” अनुपमला कळेचना आपले वडील आपल्यावर एवढे मेहरबान का झालेत?
अर्थात वडलांशी त्यांचे मित्रत्वाचे सबंध होते. त्यांनी वडिलांना विचारले, ”क्या बाबूजी आपका प्रमोशन हुआ है क्या?” वडील हसून म्हणाले, ”नही.” मग त्यांनी विचारले, ”बाबूजी क्या कोई लॉटरी लग गई क्या?” वडील पुन्हा हसून म्हणाले, ”नही, बेटा.” मग अनुपमने (Anupam Kher) विचारलं, ”मग एवढे तुम्ही माझ्यावर मेहरबान का झालात? मला पार्टी का देत आहात?” त्यावर वडील म्हणाले, ”ऐक. आज तुमच्या शाळेच्या प्रिन्सिपलने मला बोलावले होते. मागच्या आठवड्यात तुमची जी दहावीची सराव परीक्षा झाली होती त्याचा रिझल्ट सांगण्यासाठी. या परीक्षेत तू फेल झाला आहेस!”
अनुपमचा (Anupam Kher) चेहरा एकदम पडला. तो म्हणाला, ”मग फेल झाल्याचं तुम्ही सेलिब्रेशन का करता आहात?” त्यावर वडील म्हणाले, “त्यासाठीच मी मुद्दाम तुला घेऊन आलो आहे. आयुष्यात अपयशाचे असे अनेक प्रसंग येतात. तुझ्याही येतील. त्यावेळी त्या अपयशाने कधीही खचून जायचं नाही. दुःखी व्हायचं नाही. अपयश माणसाला नेहमी काहीतरी धडा शिकवत असते. तुझी ही सराव परीक्षा होती यात फेल झाला ठीक आहे. पण आता मेहनत करून तू अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवू शकतोस. ही तर दहावीची परीक्षा आहे. आयुष्यात तुला खूप मोठ्या मोठ्या परीक्षा द्यायच्या आहेत. प्रत्येक वेळी तर यश मिळणे शक्य नाही. अपयश आल्यानंतर खचून जायचं नाही. दुःखी तर अजिबात व्हायचं नाही. हे अपयश का आलं याचा अभ्यास करायचा. त्यातून खूप काही नव्याने शिकता येतं. आणि अपयशात चे सेलिब्रेशन करायचे. आयुष्यात आनंदाने हरखून जायचं नाही आणि दुःखाने खचून जायचं नाही. यश आणि अपयश दोन्हीकडे सारख्याच नजरेने पाहायचं. तरच तू पुढे जाऊ शकशील!”
==============
हे देखील वाचा : फेशियल पॅरॅलिसिस असताना अनुपम खेर यांनी हा शॉट शूट केला…
==============
छोट्या अनुपमसाठी हा फार मोठा कानमंत्र होता. जो त्याने आयुष्यभर लक्षात ठेवला. मुंबईला आल्यानंतर अनुपम खेर (Anupam Kher) यांना खूप संघर्ष करावा लागला पण प्रत्येकवेळी त्यांना बाबूजींचे शब्द आठवत होते. त्या संघर्षाच्या काळात एकदा बाबूजींनी त्यांना पत्र पाठवले होते त्यात त्यांनी लिहिले होते, ”जो लोग भीगे हुये होते है उन्हे बरसात का डर नही लगता.”