‘जाती हू मै जल्दी है क्या…’ हे गाणे कुणाला व्हल्गर वाटले होते?
संगीतकाराने बनवलेली चाल त्यालाच आवडली नसेल तर? आणि जर हीच चाल दिग्दर्शकाला आवडली तर? असा गंमतीशीर पेच प्रसंग एकदा नव्वदच्या दशकामध्ये झाला होता. गंमत म्हणजे संगीतकाराने थोडं नाराजीतच ते गाणं तयार केलं कारण त्याला ते गाणं अजिबातच आवडलं नाही पण दिग्दर्शक आणि अभिनेत्याला मात्र हे गाणे जाम आवडलं होतं. दिग्दर्शकाने हे गाणे इतके अफलातून चित्रित केलं की गाण्यामुळेच सिनेमा सुपरहिट झाला. पण गंमत म्हणजे हे गाणे एका व्यक्तीला कमालीचे व्हल्गर देखील वाटले होते! कोण होती ती व्यक्ती? कोणता होता तो चित्रपट आणि काय होत हा नेमका किस्सा? (Rakesh Roshan)
१९९५ साली दिग्दर्शक राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी शाहरुख खान आणि सलमान खान यांना घेऊन एक मसाला सिनेमा बनवला होता. चित्रपटाचं नाव होतं ‘करण अर्जुन’. या चित्रपटांमध्ये शाहरुख खान , सलमान खान, काजोल, ममता कुलकर्णी, राखी, अमरीश पुरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचे संगीत राकेश रोशन (Rakesh Roshan) यांचे बंधू राजेश रोशन यांनी दिले होते. राकेश रोशन यांच्या सर्व सिनेमांचे संगीत त्यांचे बंधू राजेश रोशन करत होते.
दिग्दर्शक राकेश रोशन यांनी चित्रपटातील गाण्यांच्या ट्युन्स फिक्स केल्या होत्या. त्या पद्धतीने संगीतकार आणि गीतकार यांच्या मीटिंग सुरू झाला. अनेक ट्युन्स तयार झाल्या. त्या सर्व ट्युन्स टेप करून दिग्दर्शकाकडे पाठवण्यात आल्या. राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी प्रत्येक ट्यून वाजवून पाहिली. त्यातील काही सिलेक्ट देखील केल्या. नंतर राकेशच्या असे लक्षात आले की संगीतकार राजेश रोशन यांच्याकडे याच सिनेमासाठी बनवलेल्या पण रिजेक्टेड ट्यून्सच्या भरपूर कॅसेट्स आहेत. त्यांनी त्या देखील मागवून घेतल्या आणि त्या देखील वाजवून बघितल्या.
त्यातील एक ट्यून त्यांना प्रचंड आवडली त्याने राजेश रोशनला सांगितले की यावर गाणं तयार करा. तेव्हा राजेश रोशन म्हणाले ही ट्यून अजिबात चांगली नाही. यावर गाणं अजिबात चांगलं होणार नाही. पण राकेश रोशन (Rakesh Roshan) याला तीच ट्यून आवडली होती. त्यामुळे त्याने त्यावरच गाणे बनवायला सांगितले. आता दिग्दर्शकच सांगतो म्हटल्यावर ते तयार झाले. गीतकार इंदीवर यांच्याकडून त्या ट्यूनवर शब्द लिहून घेतले. राजेश रोशन यांनी नाखुशीनेच गाणं केलं आणि त्याला संगीत देताना हि ते फारसे खूष नव्हते. गाणं पूर्ण झाल्यानंतर देखील त्यांचे समाधान झाले नाही ते पुन्हा पुन्हा हे गाणे चित्रपटातून डिलीट करा, वापरू नका असेच सांगत होते.
पण राकेश रोशन (Rakesh Roshan) यांना ते गाणं प्रचंड आवडलं. त्यानंतर हे गाणे शाहरुख खान आणि काजोल यांच्यावर चित्रीत झाले आणि या गाण्यामुळेच हा सिनेमा सुपर डुपर हिट झाला हे गाणे होते ‘जाती हू मै जल्दी है क्या…’ या गाण्याचे पिक्चरायाजेशन शाहरुखची पत्नी गौरी खान हिला अजिबात आवडले नव्हते. तिला हे गाणे खूप व्हल्गर वाटले होते. प्रीमियर नंतर तिने शाहरुखला तसे बोलून दाखवले होते. खरं तर या सिनेमात आधी सलमानच्या जागी अजय देवगन ची निवड झाली होती. पण अजयला शाहरुखचा रोल हवा होता. तो न मिळाल्याने त्याने सिनेमा सोडला आणि सलमानची एंट्री झाली.
===============
हे देखील वाचा : ‘जंगली’ मधील शम्मी कपूरचा रोल जगदीपला ऑफर झाला होता ?
===============
याच काळात सलमानच्या ‘हम आपके है कौन?’ चे शूट चालू होते त्यामुळे त्याचा प्रिफरेन्स पहिल्यांदा ‘हम आपके है कौन? ला होता. एका क्षणी तर सलमान देखील ‘करण अर्जुन ‘ सोडणार होता पण सूरज बडजात्याने त्याला “ हा सिनेमा सोडू नको.” असे सांगितले. राकेश रोशनच्या (Rakesh Roshan) मनात या सिनेमात सनी आणि बॉबी या दोन सख्ख्या भावांना घ्यायचे होते. पण बॉबी तेंव्हा त्याच्या पहिल्या ‘बरसात’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त होता तर सनी प्रचंड बिझी होता. १९९६ साली शाहरुख खान आणि काजोल या जोडीचे दोन सिनेमे प्रदर्शित झाले आणि दोन्ही सुपरहिट झाले त्यापैकी एक होता ‘करण अर्जुन’ आणि दुसरा होता ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’! (Rakesh Roshan)