अलिशा चिनॉयला किशोरकुमार सोबत गाण्याची संधी कशी मिळाली?
भारतीय पॉप सिंगर अलिशा चिनॉय (Alisha Chinai) हिला तिचे पहिले फिल्म फेअर अवार्ड तिचे करिअर सुरू झाल्यापासून तब्बल वीस वर्षांनी मिळाले. गाणं होतं ‘बंटी और बबली’ सिनेमातील ‘कजरारे कजरारे…’ अलिशाला (Alisha Chinai) पारितोषिक मिळायला जरी वीस वर्ष लागली असली तरी तिच्या गायकीची सुरुवात ऐंशीच्या दशकात झाली होती. १९८५ साली तिने मॉडेलिंग आणि जिंगल्स गायला सुरुवात केली होती.
तिचा पहिला पॉप अल्बम ‘जादू’ १९८५ साली आला. तिच्या मादक स्वराची जादू रसिकांच्या लक्षात आली. त्यानंतर सातत्याने ती इंडियन पॉप गाणी गाऊ लागली. एच एम व्हीला तिचा आवाज खूप आवडला. त्या काळात पाकिस्तानच्या नाझीया हसनचे मोठे नाव होते. इंडियन पॉप सिंगर म्हणून अलिशाला (Alisha Chinai) उभे केले जात होते. अलिषा पॉप जरी गात असली तरी तिला हिंदी सिनेमात गायचे होते. त्या पद्धतीने तिचे प्रयत्न चालू होते.
‘जादू’ ची कॅसेट घेऊन ती संगीतकार बप्पी लहरी यांना भेटली. बप्पी दा म्हणाले,” तुझ्या आवाजामध्ये जादू आहे.” त्या काळात ‘एडवेंचर ऑफ टारझन’ या चित्रपटाला बप्पी संगीत देत होते. सिनेमाचे दिग्दर्शक होते बी सुभाष. या सिनेमातील टायटल सॉंग आणि अलीशाला (Alisha Chinai) अगदी योगायोगाने मिळाले कारण हे गाणे खरं तर सलमा आगा गाणार होती. पण रेकॉर्डिंगच्या दिवशी सलाम आगा लंडनमध्येच अडकल्यामुळे हे गाणं अलिशाच्या आवाजात रेकॉर्ड झालं आणि अलिशा सिनेमातील पहिले गाणे आले. गीताचे बोल होते ‘टारजन माय टारजन’
या सिनेमात बप्पी सोबत तिचं आणखी एक गाणे होते ‘जिले ले जिले ले आयो आयो जिले ले…’ पुण्याचा हेमंत बिर्जे आणि किमी काटकर यांचा हा सिनेमा होता. किमी काटकरचा देखील हा पहिलाच सिनेमा होता. आलीशाचा (Alisha Chinai) आवाज सिनेमाच्या माध्यमातून सगळीकडे लोकप्रिय झाला. ‘एडवेंचर ऑफ टारझन’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू जरी शकला नसला तरी अलीशाच्या स्वराची जादू सर्वदूर पोचली. तिच्या आवाजात एक लाडिक मादकता होती, एक नशा होती. एडवेंचर ऑफ टारझन चित्रपट चालला नाही पण अलिशा बिझी स्टार झाली. तिचे पॉप अल्बम येताच होते.
तिला पहिला बिग बजेट सिनेमा मिळाला ‘मिस्टर इंडिया’. या चित्रपटातील ‘काटे नही कटते ये दिन रात …’ हे गाणे तिच्या करिअरच्या सुरुवातिचे बम्पर हिट गाणे होते. हे गाणं तिला कसं मिळालं हे असं देखील एक मनोरंजक किस्सा आहे. ‘टारझन’ चित्रपटातील गाणे गायल्यानंतर एकदा दिग्दर्शक शेखर कपूर बप्पी लहरी यांना भेटायला आले. बप्पी आणि शेखर कपूरची खूप जुनी मैत्री. शेखर कपूर नायक असलेल्या १९७८ सालच्या ‘टूटे खिलौने’ या चित्रपटातील ‘माना हो तुम बेहद हंसी‘ हे गाणे बप्पी लहरी यांनी स्वरबद्ध केले होते.
बप्पी लहरीने शेखर कपूरला अलिशाचे टारजन चे टायटल गाणे ऐकवले. शेखर कपूरला तो आवाज खूपच आवडला आणि तो म्हणाला,” मी माझ्या चित्रपटात स्वर वापरतो!” योगायोगाने शेखरच्या बायकोने देखील आलिशा च्या नावाचे रेकमेंडेशन केले होते. शेखर कपूर केव्हा मिस्टर इंडिया या चित्रपटाचे निर्मितीत व्यस्त होते. या चित्रपटातील किशोर कुमार सोबत चे ‘काटे नही कटते ये दिन ये रात…’ हे युगल गाणं आलिशाला गायला मिळाले! मि. इंडिया ए ग्रेड चा सिनेमा आणि गायले चक्क किशोर कुमार सोबत. (Alisha Chinai)
===============
हे देखील वाचा : गायक कुमार सानूला रेकॉर्डिंग पासून पंचमने का रोखले?
===============
त्या काळात लाईव्ह रेकॉर्डिंग होत असे. किशोर कुमारने अलिशाला (Alisha Chinai) धीर दिला आणि एका टेक मध्ये हे गाणे रेकॉर्ड झाले. सिनेमात हे गाणे श्रीदेवी आणि अनिल कपूर यांच्यावर चित्रित होते. नव्वदच्या दशकामध्ये अलीशा चिनॉयने ‘मेड इन इंडिया‘ हे गाणे गाऊन संपूर्ण देशात प्रचंड मोठी लोकप्रियता हासील केली. या गाण्याचा देखील एक भन्नाट किस्सा आहे पुन्हा कधीतरी!