‘हम साथ साथ है’ला २५ वर्ष पूर्ण
घर कसं असावं?
राजश्री प्राॅडक्सन्सच्या चित्रपटातील घरासारखे. अतिशय ऐसपैस, खेळकर, खोडकर. आखीव रेखीव. तसेच किंमती छान वस्तूने भरलेले. छानशी गच्ची असलेले. “मैने प्यार किया” या चित्रपटातील सुखासीन घरासारखे. (तो तर सेट होता असे लगेचच “तिरकी चाल” घेत सांगू नका. अंधेरीतील नटराज स्टुडिओतील याच सेटवर मुंबईतील आम्हा सिनेपत्रकारांना शूटिंग रिपोर्टींगसाठी बोलावले असता या घरात मला जाता आले.) (Hum Saath Saath Hain)
कुटुंब कसे असावे?
राजश्री प्राॅडक्सन्सच्या चित्रपटातील कुटुंबासारखे. एकत्र कुटुंब पध्दतीनुसार असावे. सगळेच सण एकत्र येऊन आनंदाने साजरे करणारे. लग्न देखिल एखाद्या सणासारखे साजरे करणारे. रोजच सण आहे असे मानतच घरात सकाळ संध्याकाळ सजूनधजून वावरणारे असावे. “हम आपके कौन है” सारखे. एकाच घरात एवढी माणसे हे आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला कदाचित पटणार नाही. पण अशीही मोठी कुटुंबे सुखात असतात. (Hum Saath Saath Hain)
चित्रपटातील गीत संगीत व नृत्य कसे असावे?
राजश्री प्राॅडक्सन्सच्या चित्रपटातील गीत संगीतासारखे सहज सोपे नि गुणगुणावे असेच. आपला पहिला चित्रपट “आरती” (१९६२) पासूनच है वैशिष्ट्य त्यांनी जपले. गीत संगीत नृत्य ही भारतीय चित्रपटाची जगभरातील ओळख आहे हे अनेक चित्रपट निर्मिती संस्थांचे खास वैशिष्ट्य. आजही साठ, सत्तरचे दशक झालेच पण ऐंशी नव्वदच्या दशकातील अनेक चित्रपटांतील गाणी आज यू ट्यूबवर ऐकली वा पाहिली जातात. “दोस्ती”, “चितचोर”, “गीत गाता चल” अशा राजश्री प्राॅडक्सन्सच्या अनेक चित्रपटांतील गाणी सर्वकालीन लोकप्रिय.
याच राजश्री प्राॅडक्सन्सचा सूरज कुमार बडजात्या दिग्दर्शित “हम साथ साथ है” (Hum Saath Saath Hain) ( मुंबईत रिलीज ५ नोव्हेंबर १९९९) च्या प्रदर्शनास पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत. राजश्री प्राॅडक्सन्सची अनेक वैशिष्ट्ये एकाच चित्रपटात हे याचे वैशिष्ट्य. सूरज कुमार बडजात्या आपल्या दोन चित्रपटांच्या दिग्दर्शनात आवर्जून काही वर्षांचे अंतर ठेवणारा आणि मग नवीन चित्रपटाची अगदी भरपूर पूर्वतयारी करुन मगच चित्रीकरण करणारा दिग्दर्शक. भरपूर पेपरवर्क, कलाकारांच्या निवडीवर सखोल लक्ष, थीमनुसार दीर्घकाळासाठी भले मोठे देखणे, आकर्षक सेट, गीत संगीताच्या निर्मितीवर गीतकार व संगीतकारासोबत अगणित बैठका (अर्थात सिटींग्ज), भरपूर वेळ देणारे तंत्रज्ञ आणि कसलीही घाई न करताच शूटिंग…. सूरज कुमार बडजात्याची शैलीच वेगळी. मैने प्यार किया ( १९८९), हम आपके है कौन ( १९९४) यानंतर हम साथ साथ है. (त्याचा नंतरचा दिग्दर्शनीय प्रवास उल्लेखनीय असाच).
मला आठवतय, गोरेगावच्या फिल्मीस्थान स्टुडिओत हम साथ साथ है साठी लागलेल्या भव्य दिमाखदार सेटवर मी दोनदा गेलो होतो. एकदा सोनाली बेन्द्रेच्या तर नंतर सदाशिव अमरापूरकरच्या मुलाखतीसाठी गेलो असता राजश्री प्राॅडक्सन्सच्या सेटवरचे कौटुंबिक मैत्रीपूर्ण वातावरण अनुभवले. विशेष उल्लेखनीय गोष्ट, राजश्रीच्या सेटवर शुध्द शाकाहारी नाश्ता व जेवण हुकमी.
आपल्या चित्रपटाची पोस्टर्स कशी असावीत, होर्डिग्ज कुठे लागावीत, ट्रेलर कसा असावा, प्रभादेवीतील आपल्या प्रशस्त कार्यालयातील मिनी थिएटरमध्ये ट्रायलला कोणा निवडकांना आमंत्रित करायचे, चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीसाठी नेमके कोणते फोटो निवडावेत, चित्रपटाचे मेन थिएटर कोणते असावे (हम साथ साथ लिबर्टीत होता), समिक्षकांना कोणत्या खेळास बोलवायचे असे प्रत्येक गोष्टीत नियोजन. उगाच कोणी यशस्वी होत नसतो. त्यामागे अशा अनेक गोष्टींसह प्रवास सुरु असतो.
तब्बूने साकारलेल्या भूमिकेसाठी माधुरी दीक्षितने नाही म्हटल्यावर (याच काळात तिने लग्न केले तेच तर कारण असावे का?) मनिषा कोईरालाला विचारले, ती “मन”च्या शूटिंगमध्ये बिझी असल्याने तिने नाही म्हटले. मोहनीश बहेलने साकारलेली भूमिका अगोदर अनिल कपूरला मग ऋषि कपूरला ऑफर झाली. पण काहीना काही कारणास्तव त्यांनी नाही म्हटले. सोनाली बेन्द्रेने साकारलेली भूमिका रविना टंडनने मल्टी स्टार कास्ट चित्रपटातील आपणास स्कोप तो किती या प्रशाने नाकारली. मल्टी स्टार कास्ट चित्रपट आणि तोही राजश्री प्राॅडक्सन्सचा त्यामुळेच अनेक कलाकारांची निवड, त्यांच्या तारखा, त्यांची भरजरी किंमती वस्रे हे सगळेच जमवणे कसोटीचेच. (चित्रपट कसा बनतो याला नेमके मेजरमेंट नाही. पण तो खरंच कसा विविध पातळ्यांवर बनतो हे जाणून घेणे आवश्यक)
हम साथ साथ है (Hum Saath Saath Hain) मध्ये सलमान खान, सोनाली बेन्द्रे, सैफ अली खान, करिश्मा कपूर, तब्बू, मोहनीश बहेल, सदाशिव अमरापूरकर, रिमा लागू, महेश ठाकूर, नीलम, आलोकनाथ, शक्ती कपूर, सतिश शहा, राजीव वर्मा, अजित वाच्छानी, हिमानी शिवपुरी, शम्मी, दिलीप धवन, शीला वर्मा, कुनिका, जयश्री टी., कल्पना अय्यर, दिनेश हिंगू, अच्युत पोतदार वगैरे अशी बरीच कलाकार मंडळी. त्यात एक गोष्ट. तुम्ही हा चित्रपट नक्कीच पाह्यला असणार म्हणून ती गोष्ट वेगळी सांगायलाच नको.
मुंबईबरोबरच राजस्थानात याचे भरपूर चित्रीकरण रंगले. विशेषत: जोधपूरमधील मंडोर गार्डन, मेहरानगढ किला, जसवंत धडा, सोमनाथपुरा येथील चेन्नकिशन मंदिर हे सगळेच या चित्रपटात दिसते. (चित्रपट पाहणे एक प्रकारचे पर्यटनही असते) देव कोहलीच्या गीतांना राम लक्ष्मणचे संगीत आणि अर्थातच गाणी आजही लोकप्रिय. मैया यशोदा, म्हारे हिवाडे मे नाचे मोर, एबीसीडी, छोटे छोटे भाईयों के, ये तो सच है की, हम साथ साथ है, सुनोजी दुल्हन ही गाणी यू ट्यूबवर पाहून फ्रेश व्हावे. छायाचित्रणकार राजन किनगी आणि संकलक मुख्तार अहमद यांचा उल्लेख हवाच.
राजश्री प्राॅडक्सन्सचा चित्रपट म्हणजे भारतीय परंपरा, मूल्य, संस्कृती, संस्कार याचे दर्शन. त्यांच्या चित्रपटातील जगणे वेगळे, माणसं वेगळी. आपण मध्यमवर्गीयांसाठी ही सगळीच स्वप्नांची दुनिया. त्यात रमायला मात्र आवडते. काही प्रसन्न, दिमाखदार, थाटामाटातील गोष्टी पहावाश्या वाटल्या तर सूरज कुमार बडजात्या दिग्दर्शित चित्रपट पाहवेत. एक वेगळीच स्वप्ननगरी.
सत्तरच्या दशकातील राजश्री प्राॅडक्सन्सचा चित्रपट वेगळा होता. त्यात गोष्ट महत्वाची होती. दोस्ती, उपहार, सौदागर, गीत गाता चल, दुल्हन वही जो पिया मन भाये, अखियों के झरोखो से अशा अनेक चित्रपटांत ते दिसले… स्वच्छ मनोरंजक चित्रपट सहकुटुंब पहावा तो राजश्री प्राॅडक्सन्सचा हे विश्वासाचे घट्ट नाते. ही मोठीच मिळकत. समजायला सोपे ( ते पाहून सांगायलाही सोपे) असेच चित्रपट ही राजश्री प्राॅडक्सन्सची ताकद. म्हणूनच त्यांचे चित्रपट समाजातील तळागाळापर्यंत पोहचले.
=============
हे देखील वाचा : दिवाळीतील बीग फाईट : मोहब्बते विरुद्ध मिशन कश्मीर
=============
हम साथ साथ है (Hum Saath Saath Hain) एका वेगळ्याच कारणास्तव गाजतोय हे तुम्हालाही माहित्येय , सलमान खानने जोधपूरजवळच्या कांकाणी गावाच्या बाहेर केलेली काळवीटाची शिकार…
हा विषय वेगळा आणि हम साथ साथ हैचा प्रवास व प्रभाव वेगळा…