पाकिस्तानी शायर कतील शिफई लता मंगेशकरांचे कायम ऋणी का राहिले?
पाकिस्तानी शायर कतील शिफई लता मंगेशकरांचे कायम ऋणी का राहिले?
समाजात व्यक्तीने कितीही मोठी यशाची गुढी उभारली, कर्तृत्वाचे शिखर गाठले तरी त्याचे पाय मात्र जमिनीवरच असायला पाहिजे असं म्हटलं जातं. याचं कारण असं आहे की यश, कीर्ती, मान व्यक्तिला अहंकारी बनवते त्यातूनच त्या व्यक्तीचा मुळापासून असलेला कनेक्ट तोडण्याचा प्रयत्न करते. पण समाजात अशाही अनेक व्यक्ती आहेत ज्या यशाच्या अगदी शिखरावर जरी पोहोचल्या तरी त्यांनी आपल्या समाजाशी कनेक्ट संपर्क कायम ठेवला. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) त्यापैकीचे एक.
लताने आपल्या स्वराने जगभर नाव कमावले पण त्यांची राहणी, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं हे पूर्वीसारखंच साधं आणि सात्विक राहिलं. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची ही इमेज केवळ भारतातच नाही तर जगभर आहे. पाकिस्तानी शायर कतील शिफई यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये एक मोठे प्रकरणच लता मंगेशकर यांच्या या पैलूवर लिहिले आहे.
१९६१ साली कतील शिफई स्वातंत्र्यनंतर भारतात पहिल्यांदा आले होते. त्यावेळी त्यांनी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. गीतकार इंदीवर यांनी या दोघांची भेट घडवून आणली. कल्याणजी आनंदजी यांच्या एका गाण्याचे रेकॉर्डिंग होते. त्यावेळी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये त्यांनी कतील शिफई यांना बोलावले. लता मंगेशकर आणि कतील यांच्यात भरपूर गप्पा झाल्या. विचारांचे आदान प्रदान झाले. दोघांना परस्परांच्या कलेचा आदर होता. लता मंगेशकर यांना जेंव्हा कळाले की कतील शिफई यांची पत्नी देखील भारतात आलेली आहे; तेंव्हा त्यांनी या संपूर्ण कुटुंबाला आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले.
कतील यांच्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण होता. लता सारख्या दिग्गज कलावंताने इतके आदरातिथ्य केले कि ते भारावून गेले. त्यांनी लताला पाकिस्तानला यायचे निमंत्रण दिले. यानंतर १९-२० वर्षाचा कालखंड निघून गेला. १९८० साली कतील शिफई पुन्हा एकदा भारतामध्ये आले होते. यावेळी ते मनोज कुमार यांच्या ‘पेंटर बाबू’ या चित्रपटासाठी गाणी लिहित होते. त्यातील एक गजल ‘कब तलक शम्मा जली याद नही’ लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि महेंद्र कपूर यांनी गायली होती. या रेकॉर्डिंगच्या वेळेला लताची पुन्हा एकदा कतील यांची भेट झाली.
रेकॉर्डिंगच्या दुसऱ्या दिवशी एचएमव्हीने लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या सन्मानार्थ एक पार्टी हॉटेल ताज मध्ये ठेवली होती. या पार्टीला लताने कतीलल शिफई यांना देखील आमंत्रित केले. पार्टीतील स्वागत समारंभानंतर लता उपस्थित व्यक्तींशी बोलत होती. लता तेंव्हा सर्वांची सेंटर ऑफ अट्रॅक्शन होती. सर्व जण लताला भेटण्यासाठी उत्सुक होते. लताचे लक्ष मात्र दूरवर एका टेबलकडे गेलं. जिथे कतील शिफई यांची पत्नी बसली होती. लता मंगेशकर यांना खूप आश्चर्य वाटलं कारण त्यांना माहीतच नव्हतं की कतील आपल्या पत्नीसोबत भारतात आले आहेत.
लता (Lata Mangeshkar) ताबडतोब कतील यांच्या पत्नीकडे गेली आणि त्यांना म्हणाली, ”भाभीजी, तुम्ही आला आहात हे मला माहीतच नाही. कतील भाई यांनी तसे सांगितलं नाही!” नंतर लताने त्यांना समोर आणून सर्वांची ओळख करून दिली. कतील शिफई यांच्या डोळ्यात पाणी आलं. जगभरात ज्यांच्या स्वराला पहिल्या क्रमांकाचं स्थान आहे ती व्यक्ती आपल्या एका साधारण कवीच्या पत्नीची २० वर्षानंतर आठवण ठेवते आणि त्यांना सन्मानाने स्टेजवर बोलावते. कतील यांच्यासाठी हा फार इमोशनल प्रसंग होता. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लता मंगेशकर वर एक प्रकरण लिहून या सर्व घटनांचा आढावा घेतला आहे.
===========
हे देखील वाचा : कहाणी कैफी आझमीच्या शौकत वरील प्रेमाची आणि निकाहची!
===========
जाता जाता : थोडंस कतील शिफई यांच्याबाबत. २४ डिसेंबर १९१९ चा जन्म.(म्हणजे आपल्या संगीतकार नौशाद यांच्या एक दिवस आधी यांचा जन्म झाला.) पाकिस्तानी सिनेमा , साहित्यातील मोठं नाव. ऐंशी नव्वद च्या दशकात काही हिंदी सिनेमात गाणी लिहिली. तेरे दर पर सनम चले आये (फिर तेरी कहानी याद आयी), संभाला है मैने बहुत अपनी दिल को (नाराज), तेरे दर पर सनम चले आये (बी माय लव्ह) ,मोहे आई न जग से लाज (एक ही मक्सद), बादलो में छिप रहा है चांद क्यू (फिर तेरी कहानी याद आयी) कतील शिफई यांनी अनेक अल्बम्स करीता गाणी लिहिली. जगजीत सिंग-लता च्या सजदा मधील गाणी त्यांचीच होती. त्यांच्या मृत्यू नंतर (२००१) त्यांचे आत्मचरित्र ‘घुंगरू टूट गये’ प्रसिध्द झाले.