खुबसुरतला २५ वर्ष पूर्ण
खुबसुरत (khoobsurat) म्हणताच चित्रपट रसिकांच्या डोळ्यासमोर एव्हाना रेखा नक्कीच आली असणार. बरं जे एकदा रेखाचे चाहते होतात ते कायमच रेखाचेच चाहते असतात.
काही चित्रपट व त्याचे कलाकार यांचे नाते असे घट्ट असते की दामिनी म्हणताच मीनाक्षी, शेषाद्री आणि सत्या म्हणताच भिखू म्हात्रेच्या गाजलेल्या भूमिकेतील मनोज वाजपेयी आठवणारच. ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित “खुबसुरत” (khoobsurat)(१९८०) पडद्यावर आला आणि फर्स्ट शोपासूनच रेखाला “अभिनेत्री” म्हणून जास्त गंभीरपणे घेतले जावू लागले (तोपर्यंत एकादा ‘घर’ वगळता रेखा म्हणजे गाॅसिप्स मॅगझिनमधून प्रेम प्रकरणात उलटसुलट गाजत असलेली, ग्लॅमरस फोटो सेशनने लक्षवेधक ठरणारी आणि जणू पडद्यावर शोभेची बाहुली असणारी ही ठळक ओळख). रेखा अष्टपैलू, मेहनती, अभिनयनिपुण अभिनेत्री आहे हे “खुबसुरत”ने दाखवून दिले ते कायमचेच. याच “खुबसुरत”ची २०१४ साली आलेली रिमेक फार कोणाच्या लक्षात नसेल. विसरुन जावेत असेही चित्रपट बरेच असतात. शशांक घोष दिग्दर्शित या चित्रपटात सोनम कपूर ‘खुबसुरत’ होती आणि फवाद खान तिचा नायक होता.
आणखीन एक “खुबसुरत” (khoobsurat) रुपेरी पडद्यावर आला, २६ नोव्हेंबर १९९९ रोजी प्रदर्शित झाला. त्याला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत. हा खुबसुरत लक्षात राहिलाय तो संजय दत्तने श्रध्दा पंडितसोबत गायलेल्या ए शिवानी तू लगती है नानी या खेळकर खोडकर लोकप्रिय गाण्यामुळे. या चित्रपटाचा लेखक व दिग्दर्शक संजय छेल यांनीच हे गाणे लिहिले असून संगीत जतिन ललितचे आहे. पडद्यावरचा संजय दत्त शिवानीला (उर्मिला मातोंडकर) उद्देशून हे गाणे गातो.
मला आठवतय, रामगोपाल वर्मा दिग्दर्शित “सत्या” (१९९८) यशस्वीपणे वाटचाल करत असतानाच जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील एका गार्डनमध्ये या गाण्याचे शूटिंग असतानाच मी उर्मिला मातोंडकरच्या मुलाखतीसाठी गेलो होतो आणि मुलाखतीत हा संदर्भ दिला होता. मोबाईल अतिशय नवीन व दुर्मिळ (नि महाग) असतानाचा तो काळ होता. कलाकार कितीही लहान मोठा असू देत, सकाळी लवकर त्याच्या घरी लॅण्डलाईन फोनवर फोन करुन आपण मुलाखतीचे विचारताच अनेकदा तरी सकारात्मक प्रतिसाद मिळे. खुद्द कलाकारच सांगे, मी अमूकतमूक ठिकाणी शूटिंग करतोय वा करतेय. (आज कलाकार व आम्ही सिनेपत्रकार यांच्यात कलाकारांची मॅनेजर वगैरे फौज अथवा टीम आणि शक्तीशाली बाऊन्सर यांची भिंत निर्माण झाली आहे. चित्रपट कलाकारांच्या दिलखुलास मुलाखतीबाबत पूर्वीचे दिवस “थेट वन टू वन” संवादाचे होते. खुबसुरत होते. विषयांतर झाले पण यानिमित्त आठवले.)
संजय छेल या मुळचा पटकथाकार. लिहिता लिहिता त्याला निर्माता राहुल सुगंध याने चित्रपट दिग्दर्शनाची संधी दिली. “खुबसुरत” (khoobsurat) नावावरुन वाटले, रेखामय खुबसुरतची रिमेक असावी. पण तसे नव्हतेच. हलके फुलके मनोरंजन होते. नव्वदच्या दशकात संजय दत्त मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील एक आरोपी म्हणून वादग्रस्त ठरलेला, दोनदा जेलवारी झालेला. त्याला सावरायला काहीशा सोबर भूमिकेची आवश्यकता होती.
उर्मिला मातोंडकर “रंगिला“( १९९५) च्या यशाने एकदम “मस्त” फाॅर्मात होती. रामगोपाल वर्मा दिग्दर्शित चित्रपटांप्रमाणेच अन्य दिग्दर्शकांच्या चित्रपटातही आपण उत्तम काम करु शकतो हे तिला “दाखवून” द्यायचे होते. ही संधी खुबसुरत होती. ( याच जोडीचा रामगोपाल वर्मा दिग्दर्शित “दौड” पडद्यावर आला पण जराही धावला नाही. १९९७ ची गोष्ट. ) “खुबसुरत”(khoobsurat) मध्ये परेश रावल, ओम पुरी, फरिदा जलाल, अंजन श्रीवास्तव, हिमानी शिवपुरी, जतिन कनकिया, जाॅनी लिव्हर यांच्या भूमिका आहेत. महत्वाचे म्हणजे अशोक सराफची भूमिका आहे. त्याने महेश चौधरी साकारला.
गुलजार लिखित बहुत खुबसुरत (khoobsurat) हो हे गाणे त्यांच्या चित्रपट गीत लेखनात साहित्यिक टच शैलीची आठवण करुन देते. अभिजीत व निरजा पंडित यांनी ते गायलयं. संजय छेल लिखित घुंगट मे चांद होगा (पार्श्वगायक कुमार शानू व कविता कृष्णमूर्ती) व ए शिवानी ही गाणी लोकप्रिय ठरली. ध्वनिफीतीच्या काळाकडून उपग्रह वाहिनीवरील चित्रपट गीत संगीताच्या कार्यक्रमाकडे अशा बदलाचा तो काळ होता.
=============
हे देखील वाचा : दिल्लगीला २५ वर्ष पूर्ण
=============
संजय दत्तला नव्याने खेळी सुरु करताना एका सुपर हिट चित्रपटाची असलेली अपेक्षा “खुबसुरत” ने पूर्ण केली. उर्मिला मातोंडकरला “रंगिला” इमेजबाहेर येण्यास नि दौड, मस्तचे अपयश झाकण्यास सत्या, खुबसुरत (khoobsurat) या चित्रपटांच्या यशाची सपोर्ट सिस्टीम मिळाली. (सुपरहिट चित्रपट एकादी इमेज चिकटवतो हे अनेकदा मिडियाचे खेळ मेळ असतात तर काही कलाकार त्याच स्वरुपाच्या भूमिकेत अडकणे पसंत करतात. उर्मिला मातोंडकर अशी कोणत्याच चौकटीत अडकणारी नाही.)
“खुबसुरत” (khoobsurat) उपग्रह वाहिनीवर अनेकदा असतो/ दिसतोय. एक छान विरंगुळा म्हणून आपण हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहू शकतो तर आणखीन काय हवे? खुबसुरतला पंचवीस पंचवीस वर्ष कधी बरे झाली हे समजले मात्र नाही.