मिथुन चक्रवर्तीच्या ‘डिस्को डान्सर’ सिनेमाची यशोगाथा !
अलीकडच्या काळात सिनेमाच्या मार्केटिंगचे तंत्र पूर्णता बदलून गेले आहे. त्यामुळे एखाद्या सिनेमाने शंभर कोटी रुपये कमवणे ही काही फार मोठी गोष्ट राहिली नाही. पण एकेकाळी या गोष्टीच खूप अप्रूप होतं. भारतातील चित्रपटांमध्ये शंभर कोटी रुपये कमवणारा पहिला चित्रपट कोणता? असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर बऱ्याच जणांचे उत्तर शोले, मदर इंडिया, किंवा मुगल-ए-आझम हे असेल पण ही तिन्ही उत्तर चूक आहेत. भारतात ज्या सिनेमाने शंभर कोटी कमावण्यामध्ये पहिला नंबर मिळवला तो चित्रपट होता मिथुन चक्रवर्तीचा ‘डिस्को डान्सर’. (Disco Dancer)
१० डिसेंबर १९८२ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतातच नाही तर संपूर्ण जगात मोठी खळबळ उडून दिली होती. या म्युझिकल हिट सिनेमाने भारतीय चित्रपटाच्या नायकाची प्रतिमा देखील बदलली. या सिनेमाच्या मेकिंगची गोष्ट देखील तितकेच भन्नाट आहे. दिग्दर्शक बी सुभाष यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ‘डिस्को डान्सर’ (Disco Dancer) बद्दल काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या होत्या. अभिनेता मिथुन चक्रवर्तीला खऱ्या अर्थाने स्टार या चित्रपटाने बनवले होते. बी सुभाष या दिग्दर्शकासोबत मिथुन १९८१ साली ‘तकदीर का बादशहा’ हा चित्रपट करत होता.
त्यावेळी एकदा वैतागून तो दिग्दर्शकाला म्हणाला,” काही समजत नाही. वीस चित्रपट केले. नॅशनल अवॉर्ड देखील मिळाले. पण अजूनही मला स्वतंत्र ओळख मिळालेली नाही.” त्यावर बी सुभाष म्हणाले,” मी लवकरच तुला घेऊन तुझ्या डान्स स्किलवर एक सिनेमा काढणार आहे.” मिथुन डान्स करण्यामध्ये माहीर होताच. आपल्या या स्किलचा उपयोग घेऊन चित्रपट येतोय म्हटल्यावर त्याच्या डोळ्यात चमक आली. तो बी. सुभाष यांना म्हणाला,” जर तसं असेल तर खरोखरच मी तुमचा खूप आभारी आहे. लवकरच तुम्ही या चित्रपटाची घोषणा करा!”
बी. सुभाष यांनी लगेच आपले पीआरओ जगदीश औरंगाबादकर यांना एक्स्प्रेस गृपच्या ‘स्क्रीन’ या लोकप्रिय चित्रपट साप्ताहिकात जाहिरात द्यायला सांगितली. यात चित्रपटाचे नाव ‘डिस्को डान्सर’ (Disco Dancer) मिथुन चक्रवर्ती, बी सुभाष, संगीतकार बप्पी लहरी आणि गीतकार अंजान यांचे फोटो होते. भारतात त्यावेळी डिस्को चा जमाना नुकताच सुरू झाला होता. चित्रपटाचे नावच इतके कॅची होते की भारतातले अनेक डिस्ट्रीब्युटर्स पैशाच्या थैल्या घेऊन मुंबईला बी सुभाष यांना भेटायला आले. या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद राही मासूम रजा यांनी लिहिले होते. एका गरीब डांसरची ती सक्सेस स्टोरी होती.
या चित्रपटात मिथुनची नायिका किम ही अभिनेत्री होती. त्यावेळी ती अभिनेता डॅनीची गर्लफ्रेंड होती. डॅनी आणि बी सुभाष चांगले मित्र होते. एकदा डॅनीने बोलताना सुभाष यांना विचारले,”तुमच्या ‘डिस्को डान्सर’ (Disco Dancer)ची नायिका तुम्हाला मिळाली का?” तेव्हा बी सुभाष म्हणाले ,”नाही. तिच्याच शोधात आहे.” डॅनीने लगेच आपली गर्लफ्रेंड किमचे नाव पुढे केले आणि तिचे काही फोटो त्यांच्याकडे पाठवले. दिग्दर्शकाला अशीच मॉडर्न लूक असलेली मुलगी हवी होती. त्यांनी तिला नायिका म्हणून साइन केले.
या चित्रपटात कल्पना अय्यर या अभिनेत्रीची देखील महत्त्वपूर्ण भूमिका होती. ती स्वतः उत्तम वेस्टर्न डान्सर होतीच. करण राजदान याचा हा पहिलाच चित्रपट होता. यात त्याने एका डान्सर ची भूमिका केली होती. खरं तर ही भूमिका बी सुभाष यांनी जावेद जाफरीला ऑफर केली होती. परंतु त्याने ही भूमिका या कारणासाठी नाकारली की दिग्दर्शकाने त्याला,” तू मिथुन चक्रवर्ती पेक्षा कमी दर्जाचा डान्स कर!” असे सांगितले होते. ज्यावेळेस जाफरीने ते नाकारले आणि ही भूमिका करण राजदान याला मिळाली. या चित्रपटात ओम पुरी या अभिनेत्याची देखील महत्त्वाची भूमिका होती. खर तर तो देखील एक स्ट्रगलर होता. तो केवळ पाच हजार रुपयांमध्ये ही भूमिका करायला तयार झाला. परंतु बी सुभाष यांनी सांगितले इतके कमी पैसे घ्यावी अशी काही तुझी लायकी नाही तू जास्त डीझर्व्ह करतोस. ओम शिवपुरी, गीता सिद्धार्थ यांच्या देखील या चित्रपट भूमिका होत्या.
या चित्रपटाचे चित्रीकरण फिल्मीस्तान आणि नटराज स्टुडीओ मध्ये झाले. सेटवर मोठे डान्सिंग फ्लोअर बनवले होते. अनेक लोक हे डान्सिंग फ्लोअर पाहायला येत असत. खरं तर दिग्दर्शकाला हॉलीवुड चित्रपटासारखे लाईट इफेक्ट हवे होते. परंतु तेवढे पैसे त्यांच्याकडे नव्हते. म्हणून त्यांनी जुगाड केला. स्कूटरच्या टायरला चमकीचे कागद वापरून त्यातून लाईट्स सोडले आणि तो इफेक्ट मिळवला! आज ‘डिस्को डान्सर’ (Disco Dancer)आपल्याला आठवतो आणि आवडतो तो त्यातील गाण्यांमुळे. या चित्रपटात विजय बेनेडीक्ट या पॉप सिंगर ने ‘आय एम अ डिस्को डान्सर…’ हे सुपरहिट गाणे गायले. यातील ‘जिमी जिमी आजा आजा’ हे पार्वती खान यांनी गायलेले गाणे प्रचंड लोकप्रिय ठरले. पार्वती खान ही गायिका लेखक राही मासूम रजा यांची सून होती.
या चित्रपटात राजेश खन्नाने एक कॅमिओ अपिअरन्स करून ‘गोरों कि ना कालो की दुनिया है दिलवालो की…’ या गाण्यात अभिनय केला. ‘याद आ रहा है तेरा प्यार’ हे गाणं खरंतर किशोर कुमार गाणार होता. रिहर्सल वगैरे सर्व झाले. परंतु ज्या दिवशी गाण्याचे रेकॉर्डिंग होती. त्याच दिवशी रेकॉर्डिंग स्टुडिओची लिफ्ट बंद होती आणि किशोर कुमारला नुकताच हार्ट अटॅक येऊन गेल्यामुळे त्याला जिना चढायल मनाई होती तेव्हा त्याने बप्पी लहरीला सांगितले की ,” तू गाणे रेकॉर्ड करून टाक. नंतर गरज पडली तर मी डब करेन!” अशा पद्धतीने ते गाणे बप्पी लहरीनेच गायले. (Disco Dancer)
गाणे पूर्ण झाल्यानंतर बी सुभाष, मिथुन चक्रवर्ती आणि किशोर कुमार यांना हे गाणे इतके आवडले की हे गाणे किशोर कुमार च्या आवाजात पुन्हा रेकॉर्ड करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. आणि बप्पी च्या आवाजातील गाणे कायम राहिले. या सिनेमात उषा उथप आणि बप्पी लाहिरी यांनी गायलेले ‘कोई यहा नाचे नाचे कोई वहा नाचे नाचे अव्वा अव्वा’ गाणे जबरदस्त गाजले होते. यात नंदू भेंडे यांनी गायलेले देखील एक गीत होते ‘कृष्णा धरती पे आ जा तू..’ हा चित्रपट भारतासोबतच रशिया, चीन या देशांमध्ये प्रचंड गाजला. रशियामध्ये तर राज कपूरच्या चित्रपटाला जितकी लोकप्रियता मिळते तशीच लोकप्रियता डिस्को डान्सरला मिळाली.
असे सांगतात एकदा मिथुन चक्रवर्ती रशियामध्ये गेलेला असताना तिथल्या पंतप्रधानांना त्यांची रॅली रद्द करावी लागली होती. कारण रशियन लोक मिथुनच्या शोला त्यावेळी गेले होते! अर्थात यात सत्यंश किती माहिती नाही पण मिथुन ची लोकप्रियता जबरदस्त होती हे नक्की. ‘जिमी जिमी आजा आजा…’ हे गाणं त्यावेळी नॅशनल क्रश बनले होते. रशियात देखील या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. रशियन लोक भारतीय लोकांना ‘जिमी’ म्हणूनच त्या काळात बोलवत होते!
================
हे देखील वाचा : राजकपूर यांनी चायनाचे निमंत्रण का नाकारले?
================
चीनमध्ये देखील या गाण्याची लोकप्रियता एवढी होती की नर्सरी राईम्स मध्ये याचा समावेश केला गेला. लहान मुलांना लवकर बोलण्यासाठी खूप सोपे आणि कॅची ट्यून असे याचे शब्द होते. या चित्रपटाने त्या काळात पहिल्या स्ट्रोकला तब्बल १०० कोटीचा बिजनेस केला. या सिनेमाचे बजेट होते अवघे ८२ लाख. यानंतर मिथुन रातोरात स्टार झाला आणि त्याचा झंजावात सुरू झाला. नंतर बी सुभाष सोबत त्याने अन्य काही चित्रपट केले पण डिस्को डान्सरची (Disco Dancer) सर कशाला आली नाही!