Hum : एका सिनेमासाठी रेकॉर्ड केलेले गाणे वापरले दुसऱ्या सिनेमाला
Mela : मेला चित्रपटाची पंचवीशी ना धड “कारवा”, ना “शोले”
रिमेक ही देखील एक चित्रपट निर्मितीतील रुळलेली गोष्ट. असंख्य उदाहरणे आहेत.
कोणाची रिमेक घोषणेपासूनच समजते, काहींची चित्रपट पडद्यावर पाहिल्यावर लक्षात येते. काहीजण ‘आपण मूळ चित्रपटापासून प्रभावित होऊन आपला नवीन चित्रपट घडवला’ असे म्हणत रिमेकच्या मुद्द्यालाच बगल देण्याचा प्रयत्न करतात. तर कोणी विदेशातील एखाद्या चित्रपटाचा गाभा अथवा जर्म तेवढा घेतात आणि आपल्या शैलीतील चित्रपट बनवून रिमेकच्या आरोपातून आपली सुटका करुन घेतात. अमक्या तमक्या चित्रपटाची रिमेक एवढ्यावरच हे नसते. (Mela)
रमेश सिप्पी दिग्दर्शित “शोले” (१९७५) ची रिमेक करण्याचा मोह अनेकांना का बरे झाला असा प्रश्न बी. सुभाष दिग्दर्शित “आंधी तुफान” (१९८३) पासून अनेक चित्रपट पाहताना झाला. गुणवत्ता (याबाबत आजही म्हणजेच “शोले” चे पन्नासावे वर्ष सुरु असतानाही उलटसुलट वाद आहेत) आणि लोकप्रियता (भारतीय चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीत एखाद्या चित्रपटाचा पन्नासाव्या वर्षातील विशेष खेळ हाऊसफुल्ल गर्दीत एन्जाॅय केला जातो हे “शोले”बद्दल घडल्याचे मी स्वतः काही दिवसांपूर्वीच रिगल चित्रपटगृहात अनुभवले). (Mela)
यात कायमच चर्चेत असलेल्या चित्रपटाला आपण गाठू शकत नाही याचे भान रिमेक करताना असू नये? असा “Sholay” ( जो पुन्हा होणे शक्यच नाही) आणि Nasir Hussain दिग्दर्शित “कारवां” (१९७१) यांची युती अथवा आघाडी करुन आणखीन एक चित्रपट पडद्यावर येवू शकतो? दोन अथवा तीन चित्रपटातील गोष्टी एकत्र करुन आणखीन एक चित्रपट निर्माण करण्याला काही फिल्मवाले मारामारी म्हणतात. कधी ती जमूनही जाते… (Bollywood masala)
पण धर्मेश दर्शन दिग्दर्शित “मेला” (Mela) (मुंबईत रिलीज ७ जानेवारी २०००) मध्ये ते जमले नाही हो. कारवां आणि शोले यांचा मसाला मिक्स बिघडण्यास पंचवीस वर्ष पूर्ण झालीदेखील. विशेष उल्लेखनीय गोष्ट, चित्रपट निवडीबद्दल अतिशय चोखंदळ असलेल्या आमिर खानला (Aamir Khan) ही या “मेला” (Mela) चित्रपटात काम करावेसे का बरे वाटले? धर्मेश दर्शन दिग्दर्शित “राजा हिन्दुस्तानी” (१९९६) ज्युबिली हिट ठरला म्हणून त्याच दिग्दर्शकाच्या चित्रपटातून भूमिका साकारावी असा व्यावसायिक दृष्टिकोन की काय? (राजा हिन्दुस्तानी हा चित्रपट Shashi Kapoor व नंदा यांची भूमिका असलेल्या “जब जब फुल खिले“ची रिमेक होता. रिमेक चित्रपटातील आमिर खान हादेखील एक फंडा). (entertainment mix masala)
अर्धा कारवां आणि अर्धा शोले मिळून ‘मेला‘ (Mela) चित्रपट ही कल्पनाच कशी सुचली हेच समजत नाही. कारवां हा एका गावातून दुसर्या गावात जात असलेल्या नृत्याच्या कार्यक्रम मंडळींचा गीत संगीत व नृत्यमय प्रवास (ट्रॅव्हल सिनेमा) आणि त्यात नाट्य, प्रेम, रहस्यरंजकता. तर ‘शोले‘ सूडकथा. त्यात मसालेदार मनोरंजक चित्रपटासाठीचा सर्व प्रकारचा मसाला खचाखच भरलेला. (शोलेइतकं जगभरातील कोणत्याच चित्रपट कलाकृतीवर लिहिलं, बोलले गेले नसेल.)
==============
हे देखील वाचा : Deva : शाहिद कपूरचा आणि अमिताभ बच्चनचा
==============
‘मेला’ (Mela) ची कथा सुनील दर्शनची. या दोन चित्रपटांचा मेळ घालण्याचा त्यात प्रयत्न. पटकथा लेखन नीरज वोरा, संजीव दुग्गल व धर्मेश दर्शन यांची. त्यात एक नवा आकार देण्याचा प्रयत्न. तर संवाद Neeraj Vora आणि धर्मेश दर्शनचे. हिंदीत “मेला” म्हणजेच मराठीत जत्रा आणि याच जत्रेच्या पाश्र्वभूमीवर “शोले” घडतो असा मिलावट करण्याचा प्रयत्न म्हणजे “मेला” चित्रपट. दोन सर्वकालीन सुपर हिट चित्रपट एकात मिसळले तर यशाची हमी निश्चित असे वाटले असेल तर त्यात आश्चर्य ते काय? सगळ्यांनाच हिट पिक्चर बनवायचा असतो… पण त्याचे हुकमी माप वा मेजरमेंट नाही. क्या समझे?
शोले म्हटल्यावर गब्बरसिंग आलाच. मेला (Mela) चित्रपटात गुज्जर सिंग होता. ती भूमिका टीनू वर्माने साकारलीय. वीरु व जय हवेत, ते किशन प्यारे (आमिर खान) व शंकर साने (Faisal Khan) झाले. शोलेमध्ये बसंती तर कारवांतील कबिल्यात दोन नृत्य तारका (आशा पारेख व अरुणा इराणी). मेलामध्ये हे फिट्ट करताना रुपा सिंग (ट्विंकल खन्ना) आणि विशेष भूमिकेत चंपाकली ( खास भूमिकेत ऐश्वर्या राय) .
शोलेच्या या व्यक्तिरेखांना कारवाच्या गोष्टीत बसवायची धडपड म्हणजेच ‘मेला’ (Mela) चित्रपट. प्रयत्न अवघड होता. म्हणूनच चित्रपटात रंगत आली नाही. अयूब खानने राम सिंग साकारलाय. मनोरंजनासाठी जाॅनी लिव्हर (इन्स्पेक्टर पकौडा सिंग), नवनीत निशान (बुलबुल), तसेच कुलभूषण खरबंदा, असरानी, टिकू ताल्सानिया, अर्चना पुरणसिंग, तन्वी सिंग, विजू खोटे इत्यादी.
चित्रपटातील दोन गाणी लोकप्रिय. कमरिया लचके रे (पार्श्वगायक अनुराधा पौडवाल, Udit Narayan, अभिजित भट्टाचार्य), मेला दिलो का (Sonu Nigam, अलका याज्ञिक, रुपकुमार राठोड, हेमा सरदेसाई, Shankar Mahadevan व जसपिंदर नरुला) ही गाणी समीरने लिहिली असून संगीत राजेश रोशनचे आहे. हा (Mela) चित्रपट पाहणे हे केवळ छायाचित्रणकार राजन किणगी यांच्यामुळे सुकर झाले.
=============
हे देखील वाचा : sequel movie : २०२५ : मराठी, हिंदीत सिक्वेल फार
=============
दोन वा तीन चित्रपटातील मध्यवर्ती कथासूत्रला एकत्र करण्याची कल्पना वाईट नाही. एक तर ती पेलायला हवी आणि दुसरे म्हणजे मूळ चित्रपटांचे अस्तित्व झाकता यायला हवे. तेच जर जमले नसले तर? खिचडी कच्चीच राहणार. आमटीत पाणी जास्त असणार.
२००० चा पहिलाच शुक्रवार चित्रपट रसिकांसाठी निराशाजनक ठरला. तेही आमिर खान या चित्रपटात असताना ठरलाय… या चित्रपटाला चक्क पंचवीस वर्ष पूर्ण झालीदेखील. मुंबईत मेन थिएटर मेट्रोत फर्स्ट शोपासूनच पब्लिक रिपोर्ट नरम. मग काय होणार? चित्रपटाचे लोकप्रियता ओसरायला लागली. दोन गाणी मात्र उपग्रह वाहिन्यांवर दिसत राहिली…हा “Mela” (Mela) एन्जाॅय करायला पब्लिकची जत्रा भरली नाही.