
Chhaava : चित्रपटातील एका गाण्यात दिसले प्रभू श्रीराम आणि मारुतीराय
“हे स्वराज्य व्हावे हि श्रींची इच्छा…” छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न पुर्णत्वास नेण्याचे काम छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत केले. मराठ्यांचा इतिहास हा शौर्य, पराक्रमांनी ओतप्रोत भरला आहे. आजवर शाळेत शिकलेल्या इतिहासाची पाठ्यपुस्तकातील प्रत्येक लढवय्याची गोष्ट आपल्याला लक्षात आहेच. पण चित्रपटांमूळे तो काळ आपल्या डोळ्यांसमोर जीवंत करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांत फिल्म मेकर्सने केले आहे. (Chhaava)

आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा मांडणारे अनेक ऐतिहासिक चित्रपट आले. पण आजतागायत हिंदी चित्रपटसृष्टीत छत्रपतींचे व्यक्तिमत्व, त्यांचे पराक्रम दाखवणारा एकही भव्य चित्रपट तयार केला नव्हता. आणि ते पाऊल एका मराठी दिग्दर्शकाने उचललं आणि खरंच छत्रपती संभाजी महाराज २१व्या शतकात अगदी प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर आणून उभे केले. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या लेखनातून आणि दुरदृष्टीतून तयार झालेला छावा हा चित्रपट.
‘छावा’ हा चित्रपट आजवर शंभु राजांबद्दल ऐकलेल्या अनेक गोष्टींची खरी उत्तरं देऊन जाणारा आणि प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलवणारा आहे. औरंग्याने केलेला जाच सहन करत त्याच्यासमोर मान न झुकवता मरणाच्या दारात असूनही त्यांनी हिंदू धर्म बदलणार नाही हे ठामपणे सांगत पुन्हा एकदा आपली मनं जिंकली. ‘छावा’ चित्रपटात एकाच गाण्यातून शंभू महाराजांची हिंदुत्वाची व्याख्या किंवा हिंदुत्व कसं दाखवलं आहे जाणून घेऊयात… (Chhaava)

‘छावा’ चित्रपटाला सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक ए.आर.रेहमान यांनी संगीत दिलंय. यातील प्रत्येक गाणी आणि BGM अंगावर काटा आणतं. यातील ‘तुफान’ हे गाणं तर विशेष असल्याचं जाणवतं. औरंगजेबाचं सैन्य छत्रपती संभाजी महाराजांच्या मागावर असताना त्यांच्यासाठी लाखोंच्या संख्येने मुघल सैनिक मराठ्यांच्या दिशेला येत असतात असा प्रसंग एका गाण्यातून दाखवलाय आणि ते गाणं म्हणजे तुफान.
या गाण्यात स्वत: छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) प्रत्येक लढाईत शत्रुंशी दोन हात करताना दिसतात. एका प्रसंगात शंभु राजांच्या हातात मारुतीरायाची गदा दाखवण्यात आली असून यातून मारुतीसारखे ते बलदंड होते हे सांगण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न कौतुकास्पद वाटतो. तर दुसऱ्या एका प्रसंगात पाण्यातून संभाजी महाराज मुघलांवर हल्ला करतात असं दाखवलंय ज्यात त्यांच्या हातात धनुष्यबाण दाखवून तिथे प्रभू श्रीरामाची आठवण किंवा त्यांचं रुप त्या प्रसंगात डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहात नाही. आणखी एक प्रसंग म्हणजे ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दाखवला आहे त्यातही प्रभू श्रीरामाचा भास त्यांच्या रुपातून जाणवतो.
===============
हे देखील वाचा : Chhaava विकी कौशलने सोडले ‘छावा’मधील विवादित लेझीमच्या सीनवर मौन
===============
छावा (Chhaava) या चित्रपटातून खरं तर केवळ छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रमच नाही तर वैयक्तिक जीवनात ते कसे होते? हिंदु धर्माप्रती त्यांची आस्था काय होती? ते माणूस म्हणून कसे होते असे वेगवेगळे पैलु उलगडण्याचा प्रयत्न दिसून येतो. शिवाय, २१व्या शतकातील आजच्या तरुण पिढीला हॉलिवूडमधले सुपरहिरोच खरे वाटतात; त्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या या रिअल हिरोबद्दलची माहिती सांगणारा छावा (Chhaava) चित्रपट एक उत्तम कलाकृती आहे यात शंकाच नाही. (Hindutva)
-रसिका शिंदे-पॉल