Amitabh Bachchan : “जाण्याची वेळ झाली…”, पोस्टचा बिग बींनी केला

Kiran Mane : ‘नथूरामी नटाच्या दैवतानं’ म्हणत किरण माने यांची शरद पोंक्षेवर टीका
छावा (Chhaava) सिनेमा पाहून जिथे आजच्या पिढीला आणि संपूर्ण जगाला आपल्या पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची, त्यागाची ओळख होताना दिसत आहे. तिथे दुसरीकडे या सिनेमावरून सोशल मीडियावर शाब्दिक वाद आणि आरोप प्रत्यारोप देखील जोरदार होत आहेत. विकी कौशल अभिनित छावा सिनेमा कमाईच्या बाबतीत दररोज नवनवीन उंची गाठत आहे. या सिनेमाने कमालीची लोकप्रियता मिळवली आहे. सामान्य लोकांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांचा सिनेमाबद्दल अनुभव सांगत प्रेक्षकांना ‘छावा’ बघण्याचे आवाहन करत आहे. (Kiran Mane)
आतापर्यंत अनेक मराठी कलाकारांनी हा सिनेमा पाहिला आणि सोशल मीडियावर त्याबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या. अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी देखील हा चित्रपट पाहिला आणि सिनेमाचं, दिग्दर्शकांचं भरपूर कौतुक केलं. मात्र यावरून आता अभिनेते किरण माने यांनी शरद पोंक्षेवर जोरदार टीका केली आहे. किरण माने यांनी शरद पोंक्षे यांना ‘नथूरामी नट’ म्हणत पोस्ट शेअर केली आहे. (Kiran Mane Post)
किरण माने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “तुकोबाराया म्हणतात :
हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ।।
तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ।।
…ऐरणीवर ठेऊन, त्यावर घणाचा घाव घातला तरी जो भंग पावत नाही – फुटत नाही तोच खरा ‘हिरा’ !
…घाव सोसूनही टिकणारा तोच मौल्यवान ठरतो. हिर्यासारख्या दिसणार्या काचेचा मात्र जागेवर चुरा होतो.
…हा अभंग आठवायचं कारण म्हणजे आज छ. संभाजीराजेंसारखा शूरवीर, बदनामीच्या घणाचे घाव खाऊनसुद्धा अनमोल हिर्यासारखा तेजाने लखलखत उभा आहे, त्यांचं सत्त्व भंगलं नाही ! याउलट त्यांना बदनाम करू पहाणार्यांच्या एका दणक्यात फुटून ठिकर्या उडाल्या आहेत.
… ‘छावा’सारख्या सुंदर सिनेमाचा भक्तपिलावळीनं प्रोपोगंडा म्हणून वापर करण्याचा हैदोस घातला आहे. पण त्याचवेळी काही अशा गोष्टी उघडकीला आल्या की भक्तांचा पर्दाफाश झाला. एका मराठी नटानं हंबरडा फोडलावता, “औरंग्यानं शंभूराजांचा किती छळ केलाय ते पहाण्यासाठी हा सिनेमा बघा रे”… औरंग्या तर नीच होताच… पण याच नटाच्या दैवतानं मात्र छ. संभाजीराजांच्या चारित्र्याचे वाभाडे काढलेले आहेत हे समोर आलं !
थोर साहित्यिक आणि कवी सावरकरांनी ‘हिंदूपदपादशाही’ या पुस्तकामध्ये संभाजीराजांची शिवरायांचा ‘शूर पण नाकर्ता पुत्र’ अशा शब्दांत बदनामी केलीय… याच पुस्तकात संभाजीराजांबद्दल ते पुढे म्हणतात, “…. नेतृत्व चालविण्याच्या अयोग्यतेच्या जोडीला संभाजीमहाराजांमध्ये रागीट स्वभाव नि मदिरा आणि मदिराक्षी ह्यांच्याविषयी अत्यंत आसक्ती ह्या दुर्गुणांची भर पडली होती.”… आता यावर त्या नथूरामी नटाचं काय म्हणणं आहे??? आणि एक… ’छावा’ पाहून ‘धर्मवीर धर्मवीर’ करत छाती बडवणाऱ्या भक्त पिलावळीचे एक ‘गुरुजी’ होते ते. सरसंघचालक गोळवलकर.
तर हे गोळवलकरजी आपल्या ‘Bunch of thoughts’ या पुस्तकात लिहीतात – “Sambhaji was addicted to women and wine’… पुढे अजूनही बराच बदनामीकारक मजकूर आहे. नाटककार राम गणेश गडकरीने तर ‘राजसंन्यास’ नाटकात छ.संभाजीराजेंची अशीच भरपूर बदनामी केलेली आहे. म्हणूनच छ.संभाजी उद्यानातनं त्याचा पुतळा उखडून टाकला होता. अशा काही औरंग्याच्या अवलादी होत्या ज्यांनी शंभूराजांवर क्रूर घाव घातलेत…(Marathi Entertainment News)
=======
हे देखील वाचा : Varsha Usgaonkar : मराठी मनोरंजनविश्वातील चिरतरुण सौंदर्य वर्षा उसगांवकर
=======
आता मला सांगा, हे जे ‘छावा’ बघुन रागाने डोळे लाल करताहेत… रडून ओरडून धिंगाणा घालताहेत… ते या बदनामीवर गिळून का गप्प आहेत?असो. पण या तिघांनाही देव मानणार्यांना आज बळेबळे का होईना छ. संभाजीराजांवर प्रेम दाखवावं लागतंय. भक्तुल्ल्यांच्या दैवतांनी पुस्तकांत लिहीलेल्या शंभूराजांच्या बदनामीच्या सुरळ्या करून त्यांच्या दैवतांच्या तोंडात घुसवाव्या लागत आहेत, हे ही नसे थोडके !”
दरम्यान किरण माने यांच्या पोस्टवर अनेकांनी टीका देखील केली आहे, तर काहींनी त्यांना पाठिंबा दिला आहे. आता त्यांच्या या पोस्टवर शरद पोंक्षे यांचे काय उत्तर येईल ते पहाणे महत्वाचे असेल.