
Anjaan : डिस्को डान्सरची गाणी लिहिताना गीतकार अंजान का नर्व्हस होते?
मिथुन चक्रवर्तीला (Mithun Chakraborty) या सिनेमाने खऱ्या अर्थाने स्टार बनवले तो सिनेमा १९८२ साली आला होता ‘डिस्को डान्सर’. या चित्रपटाचे दिग्दर्शन बी सुभाष यांनी केले होते. सिनेमाला संगीत बप्पी लहरी यांचं होतं तर गाणी अंजान यांनी लिहिली. या सिनेमातील सर्वच गाण्यांनी प्रचंड लोकप्रिय हासील केली होती. भारतातच नाही तर परदेशात देखील हा प्रचंड यशस्वी झाला होता. ‘डिस्को डान्सर’ हा सिनेमा पहिला सिनेमा होता ज्याने फर्स्ट रिलीजला एक कोटी रुपये कमावले. या सिनेमाचे हे रेकॉर्ड आहे. या सिनेमातील गाणी लिहिताना गीतकार अंजान (Anjaan) मात्र सुरुवातीला खूपच नर्वस होते. कारण तोवर त्यांनी अशा प्रकारची गाणी कधी लिहिलीच नव्हती.

जेव्हा दिग्दर्शक बी सुभाष यांनी ‘डिस्को डान्सर’ सिनेमातील टायटल सॉंग लिहायला सांगितलं तेव्हा ते तीन चार दिवस खूप प्रयत्न करत होते पण जमत नव्हतं. कारण अशा प्रकारची गाणी त्यांनी यापूर्वी कधी लिहिलीच नव्हती. शेवटी कंटाळून ते (Anjaan) दिग्दर्शकाला म्हणाले, ”मला खरं तर कामाची खूप गरज आहे. पण तुमच्या या सिनेमाची गाणी मला लिहिता येतील असे वाटत नाही. मला माफ करा.” त्यावर दिग्दर्शक बी सुभाष म्हणाले, ”थांबा आताच कुठला ही निर्णय घेऊ नका. आज निवांत घरी जा आराम करा. उद्या आपण भेटू या.” त्यानंतर दिग्दर्शक बी सुभाष मुंबईच्या फाउंटन भागामध्ये गेले. जिथे इंटरनॅशनल सिंगीग स्टार्स त्यांचे bands यांच्या काही रेकॉर्ड्स आणि बुकलेट्स मिळत असायचे. त्या काळात बोनी एम, एल्विस प्रिसले, मायकल जॅक्सन यांच्या रेकॉर्ड प्रचंड लोकप्रिय होत्या. तिथे त्यांना त्यांच्या गाण्याचे काही बुकलेट्स देखील मिळाले. त्यांनी काही बुकलेट्स खरेदी केले आणि रात्री ते वाचू लागले.

मायकल जॅक्सनच्या एका बुकलेट्स मध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की “माय मदर से आय वॉज सिंगिंग व्हेन आय वॉज नॉट एबल टू टॉक, आय वॉज डान्सिंग व्हेन आय वॉज नॉट एबल टू वॉक!” दिग्दर्शक बी सुभाष यांना ह्या ओळी खूप आवडल्या. त्यांनी दुसऱ्या दिवशी ते बुकलेट आणि त्या ओळी गीतकार अंजान यांना दिल्या. गीतकार अंजान (Anjaan) यांना या लाईनमधून संपूर्ण डिस्को डान्सरचे चित्र स्पष्ट झाले आणि त्यांनी लिहिले ‘ये लोग कहते है मै तब भी गाता था जब बोल पाता नही था… मेरे पाव तब भी थिरकते थे जब चलना आता नही था….’ बस या ओळींमधून डिस्को डान्सरचे चित्र तयार झाले आणि गाणे लिहून झालं ‘आय अम अ डिस्को डान्सर….’
============
हे देखील वाचा : Sadashiv Amrapurkar यांना ‘सडक’मधील ‘महारानी’ चा रोल कसा मिळाला?
============
यानंतर अंजान (Anjaan) यांना वेगळे काही सांगायची गरज पडली नाही. झरझर त्यांची लेखणी चालू लागली आणि त्यांनी या सिनेमातील सर्व गाणी काही दिवसांमध्ये लिहून काढली. हे गाणे त्या काळातील पॉप सिंगर विजय बेनेडिक्ट याने गायले. बप्पी लहरी यांनी सर्व जबरदस्त म्युझिक दिले. ‘जिमी जिमी आजा आजा’ या गाण्याला तर आंतरराष्ट्रीय लोकप्रियता लाभली. याद आ रहा है तेरा प्यार, गोरो की ना कालो की दुनिया है दिलवालो की, कोई यहा नाचे नाचे कोई वहा नाचे नाचे, कृष्णा धरती पे आजा तू… ही डिस्को डान्सरची सर्वच गाणी प्रचंड गाजली सिनेमा जगभर गाजला. मिथुन चक्रवर्ती खऱ्या अर्थाने स्टार या चित्रपटामुळे झाला.