Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

Dharmendra : धर्मेंद्रच्या तीन दशकातील तीस नायिका!
धर्मेंद्र (Dharmendra) यांचे रुपेरी पडद्यावर १९६० साली अर्जुन हिंगोरानी यांच्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून आगमन झाले. या चित्रपटात त्यांची नायिका कुमकुम होती. यानंतर धर्मेंद्र यांनी तब्बल ५८ वर्ष रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवले. या काळात ३० हून अधिक अभिनेत्रींसोबत त्यांनी नायक भूमिका केल्या. धर्मेंद्र खरोखरच भाग्यवान म्हटले पाहिजे कारण ‘गोल्डन इरा’ मधील नायिकांसोबत त्यांनी साठच्या दशकात रुपेरी पडदा शेअर केला. या साठच्या दशकात धर्मेंद्रंची इमेज ही त्या काळाशी सुसंगत अशा रोमँटिक हिरोची होती. सिनेमातील या हँडसम हिरोसोबत काम करायला नायिका उत्सुक असायच्या!

धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या नायिकांचा आपण जेव्हा विचार करू लागतो पहिल्यांदा नाव डोळ्यापुढे ते मीना कुमारींचे. मीना कुमारी आणि धर्मेंद्र साठच्या दशकात सहा चित्रपटातून रसिकांपुढे आले. मीना यांच्या भावस्पर्शी अभिनयाला धरम यांच्या त्या काळातील कवी मनाच्या हळव्या नायकाला रसिकांनी स्वीकारले. ही जोडी लोकप्रिय ठरली. मै भी लडकी हू, फूल और पत्थर, मझली दीदी, चंदन का पलना, बहारों की मंजिल… ‘काजल’ या सिनेमात मात्र ते दोघे बहिण भावाच्या भूमिकेत होते. हा कालखंड धर्मेंद्र यांच्यासाठी प्रस्थापित नायक बनण्यापूर्वीचा होता. धर्मेंद्र आणि मीना यांची ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रिन केमिस्ट्री चांगलीच जोडी होती. त्या दोघांच्या भावनांचे प्रतिबिंब पडद्यावर दिसत होते. मीना धरममध्ये पुरती गुंतली होती. साठच्या दशकाच्या उत्तरार्धात ‘पाकीजा’ चित्रपटाचे शूट पुन्हा सुरू करण्यात आले त्यावेळी देखील राज कुमार यांच्या जागी धर्मेंद्र यांचा विचार झाला होता.
याच दशकात महान अभिनेत्री नूतन सोबत धर्मेंद्र (Dharmendra) यांनी बंदिनी, दुल्हन एक रात की, दिल ने फिर याद किया या चित्रपटात काम केले. बिमल रॉय सारख्या प्रतिभावान दिग्दर्शकाने ‘बंदिनी’ साठी धर्मेंद्रला नूतनच्या समोर उभे केले यातच धर्मेंद्रच्या गुणवत्तेची खात्री पटली. ‘दिलने फिर याद किया’ हा म्युझिकल हिट सिनेमा होता. वहिदा रहमान या अभिनेत्रीसोबत खामोशी, मन की आंखे, फागुन, बाजी आणि सनी हे वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट धर्मेंद्र यांनी केले. याच काळात माला सिन्हासोबत त्यांनी केलेले अनपढ, पूजा के फूल, नीला आकाश, बहारे फिर भी आयेगी, जब याद किसीकी आती है आणि आंखे हे सर्व सिनेमे गाजले.
या दशकातील आणखी एक सौंदर्यवती शर्मिला टागोर आणि धरम यांचा जन्मदिवस (८ डिसेंबर) एकच होता. या दोघांचे आठ सिनेमे आले आणि बहुतांशी लोकप्रिय ठरले. ऋषिकेश मुखर्जी यांच्या दिग्दर्शनातील ‘अनुपमा’ या चित्रपटातील धर्मेंद्र (Dharmendra) यांनी साकारलेला कवी मनाचा नायक अजून लक्षात आहे. हृषिदांच्या ‘सत्य काम’, ’चुपके चुपके’ मध्ये हीच पेअर होती. मेरे हमदम मेरे दोस्त, देवर, यकीन, एक महल हो सपनोका आणि सनी हे त्यांचे अन्य चित्रपट. शर्मिला धर्मेंद्रसोबत खूप खुलून दिसायची. सुचित्रा सेन या बंगाली अभिनेत्री सोबतचा ‘ममता’ (१९६६) सिनेमा अप्रतिम अभिनयाने नटला होता.

सायरा बानो (Saira Banu) सोबत देखील धरमची जोडी चांगली जमली होती. आदमी और इंसान, ज्वार भाटा, इंटरनॅशनल क्रूक, साजीश, रेशम कि डोरी, पॉकेटमार आणि चैताली यात ही दोघे एकत्र होती. या काळातील हीट सिनेमांची नायिका आशा पारेख यांनी धरम सोबत ‘आया सावन झूम के’, ‘आये दिन बहार के’, शिकार, मेरा गाव मेरा देश हे सिनेमे केले. या दशकातील मुमताज ( लोफर, झील के उस पार) साधना (इश्क पर जोर नही), नंदा(मेरा कसूर क्या है), पद्मिनी (काजल), निम्मी (आकाश दीप), राजश्री (मुहोब्बत जिंदगी है), तरला दलाल (शोला और शबनम) सुप्रिया चौधरी (आप की परछाइया), तनुजा (दो चोर, बहारे फिर भी आयेगी) बबिता (कब क्यू और कहां) आणि वैजयंतीमाला (प्यार हि प्यार) यांच्या सोबत धर्मेंद्रने सुपर हिट सिनेमांची मालिका निर्माण केली.
सत्तरच्या दशकात धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ही जोडी तरुणांची लाडकी जोडी होती. या दशकाच्या अखेरीस त्यांनी लग्न केले. ही जोडी तब्बल २४ चित्रपटातून रसिकांपुढे आली. १९६९ सालचा ‘तुम हंसी मै जवा’ हा त्यांचा पहिला चित्रपट. या दोघांच्या दिलात प्रेमाचे बीज इथेच रोवले गेले. शराफत, नया जमाना, सीता और गीता, राजा जानी, जुगनू, पत्थर और पायल, दोस्त, प्रतिज्ञा, शोले, चरस, मां, किनारा, ड्रीम गर्ल, दिल्लगी, आजाद, दिल का हिरा, द बर्निंग ट्रेन, अलीबाबा और चालीस चोर, आस-पास, दो दिशाये, बगावत, राजपूत, आणि रजिया सुलतान या सिनेमातून ही दोघे प्रेक्षकांना भेटत होती. अगदी राज-नर्गीस सारखी त्यांची जोडी गाजली. धर्मेंद्र (Dharmendra) यांची इमेज या दशकात बदलली. ‘हि मॅन,मॅचो मॅन’ अशी त्याची पडद्यावरची प्रतिमा झाली.

मारधाड, ॲक्शन पटाचा तो नायक असू लागला. झीनत अमानसोबत धर्मेंद्र (Dharmendra) यांनी धरम वीर, प्रोफेसर प्यारेलाल, शालीमार, राम बलराम, कातीलों के कातील हे सिनेमे केले. हे सर्व मारधाड सिनेमे होते. रेखा – अमिताभ ही जोडी हिट असताना धर्मेंद्रसोबत रेखाने कहानी किस्मत की, कर्तव्य, गजब, बाजी, झूठा सच हे सिनेमे केले. अभिनेत्री राखी यांच्यासोबत जीवन मृत्यू, ब्लॅक मेल हे सुपर हिट सिनेमे केले. ‘पल पल दिल के पास’ हे सर्वांग सुंदर प्रेम गीत त्याने राखीसोबत साकार केले. या दशकातील मौसमी चटर्जी (फांदेबाज, सिक्का), शबाना आजमी (खेल खिलाडी का), रीना रॉय (मै इंतकाम लूंगा) जया भादुरी (समाधी), अनिता राज (करिश्मा कुदरत का), जयाप्रदा (धरम और कानून, पापी देवता, कयामत) या नायिकांसोबत त्यांचे चित्रपट आले.
=================
हे देखील वाचा : Ankhen : या सिनेमाचे पोस्टर एका सिगारेटच्या जाहिरातीवरून बनवले होते!
=================
ऐशीच्या दशकात धर्मेंद्र चरित्र अभिनेत्याच्या भूमिकात दिसू लागले पण या काळातील त्यांचा एक विक्रम ‘लय भारी’ आहे. सनी देओल सोबत ‘बेताब’ (१९८३) मधून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलेल्या ‘अमृता सिंग’ सोबत नायक म्हणून धर्मेंद्र यांनी ‘सच्चाई की ताकत’ (१९८९) काम केले! असाच काहीसा प्रकार डिंपल कपाडियांसोबत झाला. डिंपलने सनी सोबत ‘मंजिल मंजिल’ (१९८४) आणि ‘अर्जुन’ (१९८५) या सिनेमात भूमिका केली व त्यानंतर धर्मेंद्र सोबत ‘मस्त कलंदर’ आणि ‘दुश्मन देवता‘ (१९९१) मध्ये भूमिका केली. अभिनेत्री श्रीदेवीने सनी सोबत ‘चालबाज’ (१९८९) चित्रपट केला व नंतर धर्मेंद्र (Dharmendra) सोबत ‘नाकाबंदी’ (१९९१) हा सिनेमा केला. म्हणजे आधी मुलाची नायिका बनल्यानंतर या अभिनेत्री बापाच्या नायिका बनल्या. बापरे बाप!