
Raj Kapoor : वर्तमानपत्रातील एका छोट्या बातमीवरून बनवला हा भव्य सिनेमा!
कलावंताच्या मनात काही घटना काही प्रसंग असे कोरलेले असतात की ते आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहतात आणि या प्रसंगाचा उपयोग भविष्यात कधीतरी नक्की करू अशी ते खूणगाठ मनाशी बांधतात. अभिनेता दिग्दर्शक राज कपूर (Raj Kapoor) यांच्या मनात देखील अशीच एक घटना अनेक वर्ष वास्तव्य करीत होती. या घटनेवर एक चांगला चित्रपट बनू शकतो असं त्याना त्यावेळी वाटलं होतं. ही कृती प्रत्यक्षात घडायला तब्बल तीस – बत्तीस वर्ष लागली आणि जेव्हा ही कलाकृती रुपेरी पडद्यावर त्यांनी साकारायला सुरुवात केली त्यावेळी मात्र ती पूर्ण होण्याचे स्वप्न ते स्वत: मात्र पाहू शकले नाहीत त्या पूर्वीच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. कोणता होता तो चित्रपट आणि काय होती ती घटना?

त्यावेळी १९५८ साली Raj Kapoor मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘छलिया’ या चित्रपटाचे शूटिंग करत होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत नूतन आणि प्राण यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मनमोहन देसाई यांचा दिग्दर्शनातील हा पहिलाच प्रयोग होता. हा चित्रपट देशाच्या फाळणीवर आधारित असल्यामुळे साहजिकच राज कपूर त्या अनुषंगाने काही साहित्य वाचत होते. याच काळात त्यांना वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी वाचायला मिळाली. बातमी छोटी होती पण राज कपूरचे लक्ष त्या बातमीकडे गेले.
या बातमीत असं लिहिलं होतं की ‘काश्मीरमध्ये एका रस्ते अपघातात एक भारतीय तरुण जखमी झाला आणि तो सिंधू नदीमध्ये पडला आणि तसाच नदीतून वाहत वाहत पाकिस्तानात जाऊन पोहोचला. पाकिस्तानात काही कबीलेवाल्यांनी त्याचे प्राण वाचवले. सहा सात महिने त्यांची सेवा करून त्याला पुन्हा ठणठणीत बरे केले आणि नंतर लष्कराच्या मदतीने त्यांनी पुन्हा त्याला भारतात आणून सोडलं!’ राज कपूर (Raj Kapoor) यांना ही बातमी प्रचंड आवडली. या बातमीत त्यांना सिनेमाची बीजे दिसली आणि यावर एक चांगला चित्रपट बनू शकतो असं त्यांना वाटू लागलं.

त्यांनी ताबडतोब त्यांचे मित्र Khwaja Ahmad Abbas यांना बोलावले आणि त्यावर एक चांगली कथा लिहायला सांगितले. ख्वाजा अहमद अब्बास यांनी त्यामध्ये रोमान्सचा अँगल घेऊन एक चांगली प्रेम कथा तयार केली. जी दोन्ही देशातील नागरिकांनी मध्ये परस्परांबद्दल असलेल्या सौहार्द, आदर आणि प्रेमाची भावना देखील व्यक्त करणारी होती. हे कथानक राज कपूर (Raj Kapoor) खूप आवडलं परंतु त्या काळात राज कपूर आपल्या अन्य चित्रपटाच्या निर्मितीमध्ये व्यस्त असल्याने हा प्रोजेक्ट मागे मागे पडत गेला.
साठच्या दशकामध्ये राज कपूरने ‘जिस देश मे गंगा बहती है’, ‘संगम’, ‘मेरा नाम जोकर’ सत्तरच्या दशकामध्ये ‘कल आज और कल’, ‘बॉबी’, ‘धरम करम’ हे चित्रपट बनवले. ऐंशीच्या दशकामध्ये ‘प्रेम रोग’ आणि ‘राम तेरी गंगा मैली’ हे चित्रपट बनवत असताना राज कपूर (Raj Kapoor) यांना कायम आपल्या त्या कथेची आठवण होत होती आणि आपल्याकडून हा चित्रपट बनवायचाच आहे हे पुन्हा पुन्हा आपल्या मनाला बजावून सांगत होते. १९८५ साली ‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपट हिट झाल्यानंतर मात्र त्यांनी सिरीयसली त्या कथानकार विचार सुरू केला.
=============
हे देखील वाचा : Madhumati : मधील हे गाणे बिमल रॉय यांनी का अर्धवट चित्रित केले?
=============
या स्टोरीवरील डायलॉग त्यांना खरं तर ख्वाजा अहमद अब्बास यांच्याकडूनच लिहून घ्यायचे होते. पण तोवर त्यांचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांनी त्याची पटकथा जैनेन्द्र जैन यांच्याकडून लिहून घेतली. तर चित्रपटाचे डायलॉग लिहिण्यासाठी त्यांनी खास पाकिस्तानातून लेखिका हसीना मोईन हिला निमंत्रित केले. राज कपूर (Raj Kapoor) यांनी झपाटल्यासारखे या चित्रपटावर काम सुरू केले. या चित्रपटाची गाणी रवींद्र जैन यांनी संगीतबद्ध केली होती. चित्रपटाचे काही गाणी रेकॉर्ड देखील झाली. पण त्यानंतर मात्र राज कपूर यांचा अस्थमाचा आजार बळावत गेला.

१९८८ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते दिल्लीला गेले आणि त्या कार्यक्रमातच ते कोसळले आणि दिल्लीतच त्यांचे निधन झाले. राज कपूर (Raj Kapoor) यांचा हा चित्रपट बंद पडतो की काय असे वाटू लागले. परंतु कपूर फॅमिलीला राज कपूर यांना या चित्रपटाबद्दल असलेले प्रेम माहीत होते. तब्बल ३०-३५ वर्षे त्यांनी हे कथानक सांभाळून ठेवले होते आणि त्यावर काम देखील सुरू केले होते. राज कपूर यांचे पुत्र रणधीर कपूर यांनी जबाबदारी स्वीकारली आणि पुढील सर्व सूत्र आपल्या हातात घेऊन या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.
हा चित्रपट होता हीना (Henna). ऋषी कपूरची नायिका होती पाकिस्तानी कलावंत झेबा. चित्रपट अतिशय सुंदर बनला होता. राज कपूर (Raj Kapoor) यांनी तब्बल ३५ वर्षांपूर्वी पाहिलेली वाचलेली वर्तमानपत्रातील कोपऱ्यात आलेली एक बातमी आणि त्यातून तयार झालेला चित्रपट पडद्यावर यायला ३५ वर्षाचा काळ गेला पण जेव्हा चित्रपट तयार झाला तेव्हा राज कपूर मात्र या दुनियेत नव्हते!