
Ambat Shoukin: निखिल वैरागर आणि अक्षय टंकसाळेची जोडी पुन्हा प्रेक्षकांच मनोरंजन करण्यास सज्ज!
Ambat Shoukin: मराठी सिनेमाला आज नवे विचार, नवे चेहरे आणि नवी ट्रीटमेंट मिळत आहे, याचं एक सशक्त उदाहरण म्हणजे लवकरच प्रदर्शित होणारा ‘आंबट शौकीन’. ही केवळ एक विनोदी गोष्ट नाही, तर दोन नव्या दमाच्या कलाकारांची प्रयोगशीलता आणि त्यामागचा सामाजिक दृष्टिकोन असलेली एक कलाकृती आहे. या सिनेमाची खासियत म्हणजे निखिल वैरागर आणि अक्षय टंकसाळे ही जोडी या आधी ‘गॅटमॅट’सारख्या चित्रपटात एकत्र झळकली होती. तसेच निखिलने लेखकाची धुरा सांभाळली होती. मात्र यावेळी या दोघांनी एक पाऊल पुढे टाकत, अभिनयासोबतच लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळली आहे. (Ambat Shoukin Marathi Movie)

निखिल वैरागर दिग्दर्शकाच्या भूमिकेत पहिल्यांदाच झळकतो आहे आणि त्याचा विश्वास आहे की, ‘आंबट शौकीन’ हे एकसंध विचारातून तयार झालेलं प्रोजेक्ट आहे. त्याच्या मते, हसत-हसत जर काही गंभीर विचार सांगता आले, तर प्रेक्षक ते अधिक सहजतेने स्वीकारतात.दुसरीकडे, अक्षय टंकसाळे म्हणतो की, “आजच्या काळात तरुणांपर्यंत पोहोचायचं असेल, तर संवाद ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आम्ही या चित्रपटात हसवताना काही गोष्टी सांगायचाही प्रयत्न केला आहे.” या सिनेमाच्या निर्मितीमागेही एक मजबूत टीम उभी आहे.

Hexvision Entertainment, SS & KL Brothers Productions, Labros Entertainment आणि Big Brain Productions यांनी मिळून हा सिनेमा साकारला आहे. यामध्ये पूजा सावंत, प्रार्थना बेहेरे, किरण गायकवाड, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अमेय वाघ, मोनालिसा बागल, चिन्मय संत, अभिजीत खांडकेकर आणि राहुल मगदूम यांसारख्या अनुभवी आणि लोकप्रिय कलाकारांचा सहभाग आहे. (Ambat Shoukin Marathi Movie)
================================
================================
‘आंबट शौकीन’ हा सिनेमा १३ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ट्रेलर आणि पोस्टर पाहता, प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. ही केवळ एक “कॉमेडी फिल्म” नसून, हसत-हसत काही सांगून जाणारी कलाकृती आहे.